उन्हाळा सुरु होताच वन फोर सेव्हन, लोकवन गहू बाजारपेठेत दाखल

    27-Mar-2018
Total Views |

चंदोसी, शरबती पुढच्या आठवड्यात येणार, आवक साधारण

 
 
जळगाव:
उन्हाळा सुरु होताच सर्वांची धान्य खरेदीसाठी धावपळ सुरु झाली आहे. हा काळ धान्य साठवणीसाठी योग्य असल्याने गृहिणींकडून गहू, विविध दाळी तसेच तांदुळ यांची खरेदी आणि साठवणूक करण्याला सुरुवात झाली आहे.
 
 
सध्या बाजारपेठेत नवीन गहू येण्याची सुरवात झाली असून वन फोर सेव्हन, लोकवन हे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. कारण या दोन्ही प्रकारांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असते, अशी माहिती धान्याचे व्यापारी जितेंद्र वाणी यांनी तरूण भारतला दिली.
 
 
जळगाव ही मोठी बाजारपेठ असल्याने येेथे आजूबाजूचे खेडे तसेच मध्यप्रदेश, पंजाब या राज्यातून गव्हाची आवक होते.
सध्या गव्हाची आवक चांगली असून चंदोसी आणि शरबती हा गहू येत्या आठवड्यात बाजारात येईल, अशीही माहिती वाणी यांनी दिली.
 
 
नागरिकांची वन फोर सेव्हन या प्रकारासोबतच चंदोसी, शरबतीला अधिक मागणी असते. इतर गव्हापेक्षा याचे दर थोडे अधिक असले तरी हा गहू दर्जेदार असल्याने त्यापासून बनविण्यात येणारे पदार्थही अधिक दर्जेदार आणि चविष्ट होतात, असेही वाणी यांनी सांगितले.
 
 
अशी करा साठवणूक
दोन ते तीन दिवस गहू कडक उन्हात वाळवून घ्यावा. स्वच्छ करून एक थर गव्हाचा आणि एक निंबाच्या पाल्याचा द्यावा. यामुळे धान्यास कीड लागत नाही. याशिवाय अख्खी हळद, तुरटी, कापडात जाड मीठ घालून ते बांधून धान्यात ठेवल्यास धान्य चांगले राहते.
 
 
दर्जाप्रमाणे गव्हाचे दर
वन फोर सेव्हन- दोन हजार ते चोवीसशे रु. पर्यंत , लोकवनः दोन हजार ते चोवीसशे रु. पर्यत विक्रीस आहेत. येत्या आठवड्यात चंदोसीचे दर साधारण तीन हजार ते तीन हजार सातशे असे राहतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.