एल्गार मोर्चाला सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीचे रेल्वे रोको आंदोलन स्थगित

    26-Mar-2018
Total Views |

 
(प्रातिनिधिक छायाचित्र) 
 
नाशिक : शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मनमाड येथे पूर्वनियोजित रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु मुंबई येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाने मंत्रालयावर निघणाऱ्या एल्गार मोर्चाला रेल्वेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हे रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
 
एल्गार मोर्चा हा सरकारच्या विरोधात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे रोको आंदोलन देखील सरकारच्याच विरोधात आहे. त्यामुळे एल्गार मोर्चाला सहकार्य करण्यासाठीच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही पगार यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
 
 
 
शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांदा, टोमॅटोसह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी आज मनमाड येथे रेल्वे रोको करण्यात येणार होते.
 
टोमॅटोला अगदीच किरकोळ भाव मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला आहे. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी करण्यात येणारे रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे पगार यांनी पत्रकात म्हटले आहे.