श्रीराम भक्तांची भरगच्च उपस्थिती, लहान-थोरांच्या उत्साहाला उधाण
जळगाव :
अहाहा, त्या अनुपम सोहळ्याचे वर्णन काय करावे... शब्दांचे भांडारही अपुरे पडावे... निसर्गात ‘सृजना’ची पालवी फुटलेली, चैतन्याला बहर आलेला... नगरजन उत्कंठीत झालेले... लहान-थोर सुवार्ता ऐकण्यासाठी व जयजयकार करण्यासाठी अधीर झालेले... चैत्रमासे, शुध्द (सीते) पक्षे, नवम्यां तिथौ, कर्क लग्ने, मध्यान्हे द्वादश वादने अशा समुहूर्तावर जोरदार पुष्पवृष्टी झाली... ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’, अशी सुवार्ता कानी पडताच नगरजनांमध्ये आनंदाला उधाण आले... नगारा जोरजोराने दणाणू लागला... शंखध्वनीने वातावरण भारून निघाले... ‘राम राम जय श्रीराम’ अशा जयघोषाने आकाशही निनादून गेले... रामजन्माचा देखणा सोहळा रविवारी ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात रंगला.
शहरात सकाळपासूनच उत्साह होता. आजचा रविवार विशेष होता. ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीराम जन्मसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. रथ चौकात मोठ्या आकारातील भगवा ध्वज डौलाने फडकत नगरजनांचे स्वागत करीत होता.
श्रीराम मंदिर संस्थानाच्या बाहेर आकर्षक रांगोळी काढून, भगवे ध्वज रोवून, पताका बांधून सजावट करण्यात आली होती. मंदिराचा सभामंडप फुले व आंब्याच्या पानांचे तोरण, विद्युत दीपमाळा व सप्तरंगांची उधळण करणारे झुंबर, केळीचे खांब, भगवे ध्वज, केशरी व जांभळ्या रंगातील पडदे लावून सुभोभित करण्यात आला होता. महिला-पुरुष, लहान-थोर अशा सगळ्यांनीच खच्चून गर्दी केली होती.
सभामंडपात प्रभू श्रीरामरायाच्या साक्षीने हभप गंगाधर महाराज यांचे रामजन्माचे कीर्तन रंगले होते. तबल्यावर नीळकंठ कासार, तर हार्मोनियमवर गिरीश मोघे साथसंगत करीत होते. श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश जोशी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तन रंगात आले होते, श्रोतृवर्ग श्रवणभक्तीत दंग होता. रामजन्माचे औवघत्या शैलीत वर्णन करताना गंगाधर महाराज सांगत होते.
‘तो चैत्राचा महिना होता. आकाशात देव आणि गंधर्वांनी गर्दी केली होती. ऋषीमुनी अयोध्येत राजप्रासादाभोवती जमले होते...’ हे वर्णन ऐकताना सभामंडपातील प्रत्येक जण अधीर झाला.
होता. वेळ जवळ येत चाललेली आणि बरोबर मध्यान्हीला रामजन्म होताच पुष्पवृष्टी झाली. टाळ्यांचा एकच गजर झाला. नगारा व झांज वाजू लागले. शंखध्वनी होऊ लागला. बाहेर फटाके फुटू लागले. ‘सियावर रामचंद्र की जय’च्या नामघोषाने आसमंत निनादून गेले. रामभक्त धन्य धन्य झाले.
विमल खारोळे यांनी ‘राम जन्मला गं सखी...’ हा पाळणा म्हटला. ह.भ.प. गंगाधर महाराज यांनी रामनाम जपाचे महत्त्व सांगितले. श्रीधर जोशी व श्रीरंग शुक्ल यांनी आरती म्हटली. प्रसाद वाटप होऊन रामजन्म सोहळ्याची सांगता झाली. दुपारी श्रीकृष्ण भजनी महिला मंडळ यांची भजनसेवा झाली.
रामरायाच्या साक्षीने वाढदिवस
कजगाव (ता.भडगाव) येथून ज्ञानेश्वर अमृतकार रामरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी १०८ वाती प्रज्वलित केल्या. औरंगाबाद येथून आलेले पंकज देशपांडे यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस श्रीरामाचे दर्शन घेऊन साजरा केला.
आ. सुरेश भोळे, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी प्रभू रामरायाचे दर्शन घेतले. जन्मसोहळ्यास वसंतराव जोशी, मुकुंद धर्माधिकारी, आशा फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष अशोक वाघ, ब्रह्मश्री परिवाराचे चंद्रकांत पाठक, सुजित पाटील, घनश्याम चौधरी, ला. ना. शाळेचे निवृत्त शिक्षक शरद जोशी, संस्कृत भाषा प्रचारक
देवनारायण झा, भवानी मंदिराचे लक्ष्मीकांत त्रिपाठी उपस्थित होते. श्रीराम मित्र मंडळ, बाजीप्रभू मित्र मंडळ, अचानक मित्रमंडळ व इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शहरातील मध्यवर्ती भागातील नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता मंगल आरती, ६ वाजता अभिषेक, साडेसात वाजता आरती, सकाळी १० वाजता हभप दादा महाराज यांचे रामजन्मावर तर ‘पुरोहितांची परंपरा’ या विषयावर ऋषिकेश जोशी, राजेश जोशी, हेमंत धर्माधिकारी यांचे कीर्तन झाले. यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते आरती झाली. जन्मोत्सवानंतर पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आ. सुरेश भोळे यांनीही भेट देऊन दर्शन घेतले.
मंदिराची आकर्षक सजावट
श्रीराम जन्मोत्सवासाठी केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांच्या माळा व आकर्षक रोशणाईने मंदिर सजविण्यात आले होते. पाळणा पाने, फुले, फुगे यांनी सुशोभित करण्यात आला होता. राम नामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला निघाला होता.