एका छताखाली अनुभवता येणार ‘बॉलीवूड’चा इतिहास !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
 
मुंबईत अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य पर्यटन विभागाने ‘बॉलीवूड संग्रहालय’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमाविषयी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी केलेली ही खास बातचित...
 
नुकतीच मुंबईत ‘बॉलीवूड संग्रहालय’ उभारण्याची घोषणा आपण केलीत. तेव्हा, या अनोख्या संकल्पनेविषयी काय सांगाल?
 
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि त्याचं आकर्षण देशातल्या लोकांना तर आहेच, पण देशाबाहेरील लोकांनाही आहे. हेरिटेज वास्तू असोत किंवा मुंबईला लाभलेला समुद्र किनारा, गेट वे ऑफ इंडिया, खाऊगल्ल्या, या ठिकाणी असलेली मंदिरं अशा अनेक गोष्टींनी देशातल्याच नाही, तर जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आपल्याकडे आकर्षित केलं आहे. यातच त्यांच्या प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे बॉलीवूड. आज असा क्वचितच एखादा देश असेल जिथे बॉलीवूडच्या चित्रपटांविषयी कोणाला माहिती नसेल किंवा त्याचं आकर्षण नसेल. त्यातच आपलं बॉलीवूड म्हणजे जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारं स्थळ. अशा या मुंबईस्थित बॉलीवूडमध्ये केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच नाही, तर दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार म्हणून आपलं नशीब आजमावण्यासाठी आणि आपली कल्पकता दाखवण्यासाठी देशभरातून अनेक लोक या मायानगरीत दाखल होतात. अभिनेत्यांच्या घराबाहेर त्यांचे चाहतेही त्यांची एक झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. म्हणूनच पर्यटन विभागाने हे अनोखे ‘बॉलीवूड संग्रहालय’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईचा जो विकास आराखडा तयार होतोय, त्यात जागा आरक्षित करून वांद्रे ते जुहू दरम्यान एका जागेवर ’बॉलीवूड संग्रहालय’ आम्ही उभं करणार आहोत. यामध्ये पर्यटकांना बॉलीवूडचा इतिहास जाणून घेता येईल. अगदी ४०-५०च्या दशकांतल्या लेजंड्‌सपासून ते आताच्या नवख्या कलाकारांपर्यंतच प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे. ‘सुपरस्टार’ म्हणवले जाणारे राजेश खन्ना असो किंवा ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन असो, त्यांच्या काळात सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या त्यांच्या अनेक स्टाईल्स किंवा ‘शोले’सारख्या चित्रपटातील जय-विरूची बाईक किंवा तेव्हापासून ते आतापर्यंतची अनेक छायाचित्रे असो, या सर्वांचा आस्वाद पर्यटकांना एका छताखाली घेता येईल. तसंच या संग्रहालयामध्ये मराठी, हिंदी आणि इतरही भाषांच्या कलांना आम्ही स्थान देणार आहोत.
 
आपली बॉलीवूड चित्रपटसृष्टी ही त्यातील संगीतासाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. तेव्हा, या संग्रहालयात बॉलीवूड संगीताची पर्वणी पर्यटकांना अनुभवायला मिळेल का?
 
हो नक्कीच. बॉलीवूड आणि संगीत यांच अनोखं नातं आहे. या संग्रहालयात बॉलीवूड संगीताचा आस्वाद घेता येईल असा एक स्वतंत्र विभाग आम्ही उभारणार आहोत. यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अष्टपैलू गायक किशोर कुमार यांच्यासोबतच जुन्या-नव्या अनेक गायकांची मंत्रमुग्ध करणारी गाणी पर्यटकांना अनुभवायला मिळतील. अशा सर्व बॉलीवूडशी संबंधित विविध घटकांना एकत्रित करुन आम्ही हे अनोखे संग्रहालय उभारणार आहोत.
 
पण, ‘बॉलीवूड संग्रहालय’ ही नेमकी संकल्पना कोणाची?
 
आमदार अमित साटम यांनी आमच्या समोर असा एक विचार मांडला होता. सर्वांचंच आकर्षण असलेल्या या बॉलीवूड संदर्भात संग्रहालय किंवा काहीतरी अनोखं जे सर्वांच्याच पसंतीस उतरेल असं काही आपणही केलं पाहिजे, असं म्हणणं त्यांनी आमच्यासमोर मांडलं. त्यांचा हा विचार आम्हाला आवडला आणि एकाच छताखाली सर्वांना बॉलीवूडचा मनमुराद आनंद लुटता येईल, अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली. जुन्या पिढीची त्यांच्या काळातील कलाकारांशी, कलेशी जोडलेली नाळ, त्यांच्या आठवणींनाही उजाळा द्यावा आणि नव्या पिढीलाही त्यातून जुन्या काळची कला, संगीत याची माहिती मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही संकल्पना आम्ही साकारली आहे. तसेच आगामी काळात चित्रपटसृष्टीत प्रवेश करु इच्छिणार्‍या भावी कलाकारांनाही यातून प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. हे संग्रहालय उभारल्यानंतर त्याला केवळ देशभरातूनच नाही, तर जगभरातील पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, याबाबतही आम्ही सकारात्मक आहोत. त्यामुळे एक प्रकारचा ‘बॉलीवूड वॉक’ पर्यटकांना या माध्यमातून अनुभवता येणार आहे. यामध्ये अनेक अॅनिमेशन, काही चित्रपटांमधील गाजलेली दृश्ये, दिलखेचक संवाद, स्पेशल इफेक्ट्स, हुबेहुब साकारलेले मेणाचे पुतळे असतील. या सर्व गोष्टी पर्यटकांना बॉलीवूड संग्रहालयात अनुभवता येतील.
 
अशा या वैविध्यपूर्ण ‘बॉलीवूड संग्रहालया’ची रचना करताना या क्षेत्रातील तज्ज्ञ, जाणकार तसेच कलाकार मंडळींची मदत घेण्याचे तुमच्या विचाराधीन आहे का?
 
सध्या ही संकल्पना प्राथमिक पातळीवर आहे. ही संकल्पना पर्यटन विभागाच्या पसंतीस उतरली असून दोन दिवसांपूर्वीच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ही संकल्पना मांडली आणि त्यांच्याकडे या संग्रहालयाला जागा देण्यासाठी विनंतीदेखील केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि विकास आराखड्याच्या सचिवांशीही या उपक्रमासाठी एक भूखंड आरक्षित करून ठेवावा, या संदर्भात पत्रव्यवहारदेखील केला आहे. हे संग्रहालय कुठे उभारण्यात येईल, या संदर्भात सविस्तर चर्चा होईलच. या संग्रहालयासाठी सध्या आम्ही दोन जागा पाहिल्या आहेत, पण त्याबद्दल आताचं सांगणं म्हणजे घाई केल्यासारखं होईल. त्यामुळे निश्चितच या संग्रहालयाची रचना करताना तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. काही बॉलीवूडमधील अभिनेते, जाणकारांची, तसेच वास्तूविशारदांचीही आम्ही नक्कीच मदत घेऊ.
 
या संग्रहालयाच्या उभारणीसाठी मदतीचे हात पुढे आले आहेत का? आणि साधारण हे संग्रहालय पर्यटकांसाठी केव्हा पर्यंत खुले होईल?
 
सध्या ही केवळ संकल्पना आहे आणि पहिल्याच टप्प्यात आहे. ज्यादिवशी आम्ही मदतीचे आवाहन करू, त्या दिवशी नक्कीच मदतीसाठी सर्वजण पुढाकार घेतील. वांद्रे ते जुहू दरम्यान हे संग्रहालय उभारण्यात येणार असलं तरी अद्याप या संग्रहालयाची जागा निश्चित नाही. त्यामुळे एकंदरीत जागा ताब्यात घेऊन हे संग्रहालय पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते साडेतीन वर्षांचा तरी कालावधी लागू शकतो. परंतु, या ठिकाणी मला एक आवाहन करावंसं वाटतं. अभिनेता - अभिनेत्री, मग ते आजच्या काळातील असो वा आधीच्या दशकांतील, ते आपल्यासाठी ‘स्टार’च आहेत. त्यांची जन्मभूमी कोणतीही असली तरी त्यांची कर्मभूमी ही मुंबई आणि बॉलीवूड... आणि आपण या भूमीचं काही देणं लागतो असा विचार करून या मुंबईचा एखाद्याने ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर बनावं असं वाटतं. पैसे घेऊन कामकरणारे अनेक लोक आज सापडतात. पण, या कर्मभूमीचा विचार करून किंवा कर्मभूमीचे आपण देणे लागतो, या भावनेने कलाकारांनी हिचं नाव मोठं करण्यासाठी मानधन न घेता नि:शुल्क ही सेवा केली पाहिजे, असं मला वाटतं. माझ्या या आवाहनाला येत्या काळात कलाकारांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
 
 
- जयदीप दाभोळकर 
 
@@AUTHORINFO_V1@@