मुलगी पाहण्यासाठी जाताना एकाच कुटुंबातील तिघे ठार

    23-Mar-2018
Total Views |
 

राष्ट्रीय महामार्गावर एरंडोलजवळ भरधाव ट्रकची रिक्षाला धडक

रिक्षातील अन्य चौघे गंभीर जखमी
मयत जळगावातील हुडकोतील रहिवासी

 
एरंडोल, २३ मार्च :
भरधाव जाणार्‍या ट्रकने समोरून येणार्‍या रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगी हे तिघे जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोलजवळ पद्मालय हॉस्पिटलपासून काही अंतरावर झाला. या अपघातात रिक्षातील अन्य ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले.
 
 
प्राप्त माहितीनुसार, जळगावातील हुडको परिसरातील शेख कुटुंबीय मुलगी पाहण्यासाठी (एमएच १९ व्ही ७३५६) क्रमांकाच्या रिक्षाने कासोदा (ता.एरंडोल) येथे जात होते. त्यांच्या रिक्षाला राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर समोरून भरधाव येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील शेख गयासोद्दीन शेख अलाउद्दीन (वय ४५), परवीन बी गयासोद्दीन (वय ४०) व त्यांची मुलगी तमन्ना बी गयासोद्दीन (वय ९) हे तिघे जण जागीच ठार झाले. रिक्षातील अन्य ४ जणदेखील गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती होताच, एरंडोल येथील नागरिकांसह महामार्गावरून जाणार्‍या काही वाहन चालकांनी मदतकार्य केले. अपघातातील जखमींना त्वरित जळगावात उपचारासाठी हलविण्यात आले.
 
 
दरम्यान, ट्रकची धडक एवढी जोरात होती की त्यामुळे रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी उशिरापर्यंत एरंडोल पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.