श्रमाची आणि घामाची लाज...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आश्वासित केल्यानुसार रोजगार निर्माण झाले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार केला जातो. हा तसा फार सोयीचा आरोप आहे. सरकारने कितीही आकडेवारी समोर ठेवली, तरी पुढची व्यक्ती ही आकडेवारी सहजतेने नाकारू शकते आणि लोकांचा त्यावर चटकन विश्वास बसतो. झी टीव्हीवर काही दिवसांपूर्वी दाखविलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बेरोजगारीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नाहीत. एखादा व्यवसाय करणे, हा देखील रोजगार असतो. एखाद्याने दिल्लीत पकोड्याचा ठेला लावला आणि त्यातून तो शे-पाचशे रुपये कमवत असेल तर त्यालाही आपण रोजगार मानले पाहिजे.’’ असे सांगून ते म्हणाले, ‘‘मुद्रा योजनेंतर्गत ९ कोटी व्यक्तींना कर्ज वाटप करण्यात आले. त्यातील ३ कोटींनी प्रथमच कर्ज घेतले आहे. त्यामुळे ठोबळमानाने ३ कोटी लोकांनी स्वत:चा उद्योग वा व्यवसाय सुरू केला आहे, असे मानता येईल. ही देखील रोजगारनिर्मिती आहे.’’ या स्पष्टीकरणाने विरोधी पक्षांच्या आरोपाची हवा काढून घेतली. परंतु, विरोधी पक्ष हे मानायला तयार नव्हते. त्यांनी, स्वरोजगाराची थट्टा करणे सुरू केले. ठिकठिकाणी काही तरुण-तरुणींनी दीक्षान्त समारंभातील वेष घालून पकोडे तळणे सुरू केले आणि लोकांपुढे नरेंद्र मोदींची टर उडवायला सुरवात केली. सर्वात किळसवाणा कहर केला तो पी. चिदम्बरम् यांनी. ते म्हणाले की, पकोडे तळणे हा जर रोजगार असेल, तर भीक मागण्यालाही रोजगार समजावे लागेल.
 
चिदम्बरम् यांनी ही असली गरळ ओकून, या देशातील समस्त लहान-मोठ्या व्यावसायिकांचा घोर अपमान केला आहे. परंतु, याचे कुणालाच काही सोयरसुतक दिसले नाही. कसे दिसणार? आमची मानसिकताच चाकरीची झाली आहे ना! कशासाठी शिकायचे? नोकरीसाठी! शिक्षणात प्रचंड यश का मिळवायचे? अधिक चांगल्या नोकरीसाठी! चांगल्यातली चांगली नोकरी का मिळवायची? खूप पगार मिळतो म्हणून. एवढे पैसे मिळवून काय करायचे? चैन करायची. महागातले महाग सुखोपभोग घ्यायचे. पुरुष असेल तर सौंदर्यवती बायको मिळवायची आणि महिला असेल तर देखणा व श्रीमंत नवरा मिळवायचा! याच्या पलीकडे काही विचार असेल असे वाटत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी पकोडे तळण्यास सांगतो, म्हणजे काय? आमच्या चाकरी मानसिकतेचा केवढा हा अपमान! आजच्या तरुण पिढीला तो कसा सहन होणार! आणि त्यामुळे मोदींच्या एका साध्यासुध्या वक्तव्याची टिंगल करणे सुरू झाले. ती आजतागायत सुरूच आहे.
 
विषय फार गंभीर आहे. आम्हाला श्रमाची एवढी लाज का वाटावी? मागे एक जाहिरात येत होती. विमानातील एका प्रवाशाच्या काखेतील घामाचा वास आला म्हणून एक महिला त्याला विमानाबाहेर फेकून देते आणि नंतर घामाचा वास येऊ न देणाऱ्या कुठल्या तरी उत्पादनाची माहिती यायची. मुळात, एखाद्याच्या काखेतील घामाचा वास यावा, इतके जवळ जावेच कशाला? असो. तो महत्त्वाचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की, जितके आम्ही शिकत जाऊ (म्हणजे पदव्या मिळवीत जाऊ) तितका आमचा श्रम आणि घामाचा तिटकारा वाढत जातो. संपूर्ण समाजाची ही मानसिकता भारत देशाला खड्ड्यात नेत आहे. १८६०च्या पूर्वी अक्षरश: हजारो वर्षे भारत जगातील सर्वात श्रीमंत देश होता. जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के उत्पन्न एकट्या भारताचे होते. त्या काळात, श्रम व घामाबाबत लाजेची ही भावना समाजात नसलीच पाहिजे. कारण उद्योगाशिवाय श्रीमंती येत नाही आणि इथे भारत सुमारे तीन हजार वर्षे, आज अमेरिका ज्या स्थानावर आहे, त्या स्थानावर होता. मग ही चाकरीची मानसिकता आणि तिला समाजात प्रतिष्ठा केव्हा आणि कशी आली असावी? यावर खरेतर चर्चा व्हावयास हवी. ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे ही मानसिकता आली असावी, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यात तथ्य नसेलच असे नाही. परंतु, या चाकरी-मानसिकतेचा सर्वाधिक संसर्ग, कम्युनिस्ट विचारधारेच्या कामगार संघटनांमुळे झाला असावा, असे वाटते. कामगार संघटनेची ताकद दाखवून, नोकरी अधिकाधिक आकर्षक करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झालेत. नोकरीतील सुरक्षितता आणि दरवर्षी नेमाने होणारी ठरावीक पगारवाढ यामुळे हळूहळू नोकरी अतिशय आकर्षक झाली. समाजात नोकरदारवर्गाची प्रतिष्ठा वाढायला हीच बाब जास्त जबाबदार आहे, असे वाटते. त्यामुळे येनकेनप्रकारेण चांगल्यातली चांगली नोकरी मिळविण्यासाठीच शिक्षण घ्यायचे, याकडे कल वाढू लागला. पदवी घेतलेली एखादी व्यक्ती स्वरोजगार करीत असेल, तर समाज त्या व्यक्तीला, ‘‘काय! ग्रॅज्युएट असून हे असले काम करतो!’’ असे टोमणे मारून अक्षरश: घायाळ करून टाकतो. मग तोही बिचारा आपला व्यवसाय गुंडाळून एखादी नोकरी मिळते का म्हणून भटकू लागतो. चाकरीची ही मानसिकता आम्हा भारतीयांच्या रक्तात भिनली असल्यामुळेच, मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करून, चौकाचौकात पकोडे तळण्याचे नाटक करण्यात तरुणांना जरादेखील लाज वाटली नाही.
 
 
चाकरीची प्रतिष्ठा शहरांपुरतीच मर्यादित आहे असे नाही, तिने ग्रामीण भारतातही चांगलेच हातपाय पसरले आहेत. ४० एकर शेती असलेल्याला मुलगी मिळत नाही. चपराशी, ग्रामसेवक, पटवारी, प्राथमिक शिक्षक असेल, तर गावातील सुंदर मुली त्याच्याशी विवाह करण्यास एका पायावर तयार होतात. पण शेतकऱ्याशी विवाह करण्यास तयार होत नाहीत, ही आजची ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. शहरात व्यवसाय असेल, उद्योग असेल आणि त्याची कमाई भरपूर असली तरीही त्या तरुणाचे लग्न लांबतच जाते. पण, १५-२० हजाराची नोकरी असेल तर मात्र त्याचे लवकरच लग्न होते, असा अनुभव आपल्या सर्वांनाच असेल. हे दृश्य बदलले पाहिजे. पूर्वी आपल्याकडे एक सूत्र होते- शेती श्रेष्ठ, व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ. ते आता उलटे झाले आहे. पूर्वी व्यापारी व उद्योजक मानसिकतेच्या घराण्यातील कुणीही व्यक्ती नोकरीच्या भानगडीत पडत नसत. आता मात्र या समाजातीलही अनेक तरुण/तरुणी तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रात दिसतील. इतकी ही चाकरीची मानसिकता खोलवर रुजली आहे. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, नोकरी करून (अर्थात् प्रामाणिकपणे) कुणीही संपत्ती निर्माण करू शकत नाही. संपत्ती केवळ उद्योग व व्यवसायामुळेच निर्माण होते. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा संपन्न, समृद्ध आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर भारतीय समाजातील नोकरीची मानसिकता बदलावी लागेल. नोकरी कनिष्ठ दर्जाची कशी होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सोपे नाही. रक्तातच भिनलेली मानसिकता समूळ काढून टाकणे सोपे नाही. पण, तरीही प्रयत्न झाला पाहिजे. नोकरीची आकर्षकता कमी केली तर यात बऱ्यापैकी यश मिळू शकेल, असे वाटते.
 
नोकरीतील सुरक्षितता हा खरा आकर्षणाचा मुद्दा आहे. तोच संपविला तर? स्थायी नोकरी हा प्रकार बंद करून, करारावर नोकरी असा प्रकार सुरू व्हायला हवा. तसे झाले तर तरुण, उद्योग व व्यापाराकडे वळेल. उद्योग व व्यापाराचे क्षेत्र असीम आहे. नवनव्या कल्पना आणि प्रयत्नांची पराकाष्ठा याच्या जोरावर कुणीही यशस्वी होऊ शकतो. पण, यासाठी समाजाकडून प्रोत्साहन हवे. आयआयटी उत्तीर्ण होणाऱ्यापेक्षा आयटीआय करणाऱ्याचे समाजाने अधिक कौतुक केले पाहिजे. अर्थात् हे परिवर्तन एकदम होणार नाही. हळूहळू होईल. पण, त्या दिशेने समाजाने प्रयत्न तर करायला हरकत नाही ना! उत्तुंग गौरीशंकर शिखर गाठायचे असले, तरी पावले दीड फुटाचीच टाकावी लागतात ना! तसेच याही बाबतीत करावे लागेल. समाजानेच आता पुढाकार घ्यायचा आहे. मोदींसारखे सरकार असेल, तर त्यांचाही या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा राहील. पण, ही चाकरीची मानसिकता बदलावीच लागणार आहे. तरच या देशाला आणि तरुणाईला भवितव्य असेल.
@@AUTHORINFO_V1@@