|| महाराष्ट्री रामकथा - सेतुबंध ||

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018   
Total Views |



प्राचीन महाराष्ट्री भाषेतील रामकथेची सुरुवात सम्राट चंद्रगुप्त पासून होते ...


इ.स. ४ थ्या शतकापासून ६ व्या शतकापर्यंत गुप्त राजांनी - माळवा, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागात राज्य केले. या काळातील आर्थिक, साहित्यिक, वैज्ञानिक, कला, स्थापत्य आदी प्रगती पाहता या काळाला भारताचे सुवर्ण युग मानले जाते.


४ थ्या शतकातील समुद्रगुप्त हा एक शूर सेनानी व उत्तम शासक होता. हा राजा स्वत: कवी होता, रसिक होता व तो विणा वादन सुद्धा करित असे. त्याने उत्तर व दक्षिण दिग्विजय करून गुप्त साम्राज्य वाढवले. अश्वमेध आदी यज्ञ केले. गुप्त साम्राज्य याच्या काळात भरभराटीस आले. त्याच्या नंतर, त्याचा पुत्र चंद्रगुप्त (दुसरा) गादीवर आला. सम्राट चंद्रगुप्तने माळवा येथील कार्दामक शकांचा पराभव करून भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत गुप्त साम्राज्य वाढवले. इथल्या बंदरांमधून रोम बरोबर समुद्रमार्गे व्यापार होत असे. चंद्रगुप्तने शकांचा शत्रू म्हणून ‘शकारी’ हे बिरूद मिरवले. तसेच त्याने ‘विक्रमादित्य’ हे बिरूद सुद्धा धारण केले होते. या काळात पूर्वेला पाटलीपुत्र व पश्चिमेला उज्जैन या त्याच्या दोन राजधान्या होत्या. त्याच्या नंतर याचा पुत्र कुमारगुप्तने राज्य केले.
गुप्त काळात विदर्भ मध्ये बलाढ्य वाकाटकांचे राज्य होते. नागपूर जवळील नंदिवर्धन ही त्यांची राजधानी होती. हे राजे शिव भक्त होते. विंध्यशक्ती हा संस्थापक राजा, शंकराप्रमाणे भस्म लावून व सिंहाचे कातडे पांघरून सिंहासनावर आरूढ होत असे. याच्या वंशातील प्रवरसेनने (पहिला) वाजपेय, अश्वमेध आदी अनेक श्रौत यज्ञ केले होते.

वाकाटक वंशातील रुद्रसेन (दुसरा) याचा विवाह चंद्रगुप्तची कन्या प्रभावती गुप्त हिच्याशी झाला होता. प्रभावती गुप्तने माहेरहून वैष्णव भक्ती आणली. रुद्रसेन व प्रभावतीला दोन मुले झाली – दिवाकरसेन व प्रवरसेन (II). दुर्दैवाने रुद्रसेन लवकरच मृत्यू पावला. त्यावर प्रभावतीने मोठ्या मुलाला राज्याभिषेक करवून, त्याच्या वतीने राज्य केले. जवळ जवळ १५ वर्ष प्रभावतीने महाराष्ट्रावर राज्य केले. असे एक मत आहे की, या दरम्यान चंद्रगुप्तने राज्यकारभारात मदतीसाठी कालिदासाला प्रभावतीकडे विदर्भात पाठवले होते. राणी प्रभावतीने पाडलेली नाणी व तिचे ताम्रपट या मधून तिच्या राज्याची माहिती मिळते. तिने रामटेक येथे पती रुद्रसेनच्या स्मरणार्थ बांधलेले रुद्रनरसिंह मंदिर पाहायला मिळते. दिवाकरसेनच्या मृत्यू नंतर इ.स. ४२० मध्ये त्याचा धाकटा भाऊ प्रवरसेन II गादीवर आला. या राजाची कीर्ती दूरदूर पसरली होती असे दिसते, कारण कंबोडिया येथील यशोवर्मा राजाच्या एका शीलालेखात, त्याची तुलना प्रवरसेनशी केली आहे.


आजची कथा आहे, प्रवरसेनच्या रामायणाची ...


|| रामटेक ||


फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राम, सीता व लक्ष्मणाने अयोध्या सोडली व ते दक्षिणेकडे निघाले. गंगा नदी पार करून ते मंदाकिनी नदीच्या तीरावर चित्रकूट येथे आले. या ठिकाणी सती अनसूया व अत्रिमुनी यांचा आश्रम होता. कधी काळी कण्व ऋषींचा आश्रम पण मंदाकिनीच्या काठावर होता, जिथे दुष्यंत-शकुंतलेची भेट झाली होती. या रम्य परिसरात, राम, सीता व लक्ष्मण पर्णकुटी बांधून राहिले होते. चित्रकुट येथील वास्तव्यात भरत रामाचा शोध घेत इथे पोचला. रामाच्या पादुका घेऊन भरत परत गेला. अयोध्येच्या बाहेर नंदीग्राममध्ये संन्यस्थ वृत्तीने राहून, भरताने अयोध्येचा राज्यकारभार पहिला. अशा प्रकारे त्याने जणू आपल्या आईच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले. या बंधूप्रेमाचे ‘भरत – मिलाप’ मंदिर चित्रकुटमध्ये पाहायला मिळते.

काही काळाने, राम, सीता व लक्ष्मण चित्रकुट सोडून दक्षिणेला आले. तेंव्हा त्यांचा मुक्काम नागपूर जवळील रामटेक येथे होता. गोदावरी काठी, पंचवटीला जायच्या आधी, ते या पर्वतावर राहिले. रामटेक येथे फार पूर्वी पासून रामाचे किंवा रामाच्या पादुकांचे मंदिर असावे. ५ व्या शतकात वाकाटकांनी बांधलेली काही मंदिरे रामटेक येथे पाहायला मिळतात. त्यानंतर यादवांनी व त्यांच्या नंतर भोसले राजांनी येथे मंदिर बांधले. रामटेक (रामटेकडी) हे रामगिरी या नावाने सुद्धा ओळखले जाते. कालिदासाच्या मेघदूत मधील यक्ष, रामगिरी पर्वतावर एक वर्षाचा काळ घालवत असतो.


वाकाटक राजे रामगिरीला वारंवार जात असावेत. प्रभावती गुप्तच्या एका ताम्रपटावरील लेखात ती ‘रामगिरिस्वामी’ ला वंदन करते.


|| रावणवहो || 

प्रभावती गुप्तचा पुत्र प्रवरसेन हा सुद्धा रामाचा भक्त होता. याने रामटेक जवळ, प्रवरपूर नावाची नवीन राजधानी स्थापन केली. इथे त्याने रामाचे मंदिर बांधले होते असे म्हटले जाते. साधारण ३० वर्ष याने उत्तम राज्य केले. प्रवरसेनाचे एक अनमोल कार्य म्हणजे त्याने लिहिलेली रामाची कथा. ही रामाची कथा महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे. याचे नाव आहे – रावणवहो. काहींच्या मते, कालिदासाने प्रवरसेनला या लिखाणात मदत केली असावी. पण कीथ आदींनी हे मत खोडले आहे.

रावणवहो म्हणजे रावणवध. हे महाकाव्य दशमुखवहो किंवा सेतूबंध या नावाने सुद्धा ओळखले जाते. रावणवहो या प्राकृत महाकाव्यात एकूण १५ आश्वासक (सर्ग) आहेत. वाल्मिकी रामायणातील युद्धकांड या काव्यात रंगवला आहे. नावाप्रमाणे या रामकथेचा भर सेतू बंधन यावर आहे. ही कथा रावणवधानंतर राम राज्याभिषेकापर्यंत आहे. प्रवरसेनाने या काव्यात फार सुंदर अलंकार वापरले आहेत.


पावसाळा संपला आहे, शरद ऋतू सुरु झाला आहे. सीतेच्या शोध घेण्याकरिता सुग्रीव वानरसेनेला पाठवतो. ही सेना समुद्रासमोर हताश होऊन थांबते. यावेळी सुग्रीव त्यांना धीर देतो, प्रोत्साहित करतो. त्यावर हनुमान उड्डाण करून आकाशमार्गे लंकेत पोचतो. हनुमान सीतेच शोध लावून परत येतो. त्यावर सर्व सैन्यासह राम व सुग्रीव समुद्रापाशी पोचतात.

समुद्र पार करण्यासाठी राम काही दिवस उपास करतो. समुद्राची प्रार्थना करतो. जेंव्हा याचा काही उपयोग होत नाही तेव्हा राम आपला बाण समुद्रावर सोडतो. त्या बाणाने समुद्र पेट घेतो. समुद्रातील पाणी आटून जाईल या भीतीने समुद्र प्रकट होतो, आणि समुद्र उल्लंघन करण्यासाठी रामाला सेतू बांधण्यास सांगतो.

यानंतर सेतूबंधनाचे अतिशय सुंदर वर्णन कवीने केले आहे. नल नावाचा वानर सेतू बंधनाची आखणी करतो. सर्व वानरे मिळून सेतू बांधतात. त्यानंतर राम – रावण युद्ध होते. राम बिभीषणाला गादीवर बसवतो. आणि सोन्याप्रमाणे अग्नीतून शुद्ध झालेली सीता घेऊन राम अयोध्येला परत येतो.

रामाची सीतेला सोडवण्यासाठीची धडपड, सीतेच्या विरहात त्याच्या जीवाची तळमळ, सीतेला रामाचे खोटे शीर दाखवले असता तिचा शोक हे करुण प्रसंग अतिशय सुंदर रंगवले आहे. रावणवहोमध्ये काही मार्मिक सुभाषिते आहेत जसे –

वाच्यता न करता, आपले काम करणारी माणसे तितकीच दुर्मिळ आहेत जितकी फुलांचा देखावा न मांडता फळणारी वृक्ष आहेत!
कमळाच्या कळीला सूर्य उमलवू शकेल, पण कळीला स्वत:च्या कष्टांनी पाण्यातून वर यावे लागते.


सेतुबंधवर एक राजस्थान मधील व एक दक्षिण भारतातील टीका उपलब्ध आहे. बाणभट्ट, दंडी आदी कवी सेतूबंध काव्याचा कौतुकाने उल्लेख करतात. सेतुबंधच्या हस्तलिखीताचे गोल्डस्मिथ यांनी १८८० मध्ये जर्मन भाषांतर करून ते प्रकाशित केले. भारतात १९३५ मध्ये रावणवहोचे भारतीय भाषांतर उपलब्ध झाले.


संदर्भ –

⦁ PRAVARSSENA'S SETUBANDHA - Krishna Kanta Handiqui

 - दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@