गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाई भासू देणार नाही - बबनराव लोणीकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी जिल्ह्यात आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करून पाणीटंचाई भासू देणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली.
 
सदस्य गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्याविषयीची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना लोणीकर बोलत होते. राज्यातील ज्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, अशा जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना २५ लाख रूपयांचा निधी दिला जातो. मात्र अनेकदा या निधीतून पाणीटंचाई दूर होत नाही, यामुळे पाणीटंचाई सदृश जिल्ह्यात निधीची कमतरता होणार नाही असे ते यावेळी म्हणाले.
 
त्याचबरोबर पाणीटंचाई संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील सरपंचापासून लोकप्रतिनिधींपर्यंतच्या सर्वांसमवेत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भूजल अधिकारी यांनी बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात येणार असून येत्या सोमवारी विधीमंडळ सदस्यांसह मंत्रालयात राज्यस्तरीय बैठकही घेण्यात येईल, असेही लोणीकर यांनी सांगितले.
 
गोंदिया जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ४० मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनावरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली असून या योजना सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या एका महिन्यात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@