जे जे उत्तम, उदात्त, उन्नत…

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018   
Total Views |


मी बेल वाजवली. काही क्षणांत दार उघडलं गेलं. मी येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने माझे हसुन स्वागत झाले. त्या ३ बी.एच.के. फ़्लॅटमध्ये मी आत गेलो खरा, पण किमान दर्शनी भागात तरी मला खाली बसायला थोडीही जागा शिल्लक नव्हती. संपूर्ण हॉलभर कपड्यांची गाठोडी आणि घरगुती वापराच्या अनेक वस्तुंचे ढीगच्या ढीग लागलेले होते. माझ्या नजरेतला प्रश्न समजून घेत त्या एकसष्ट वर्षांच्या यजमानीण बाईंनी हसुन म्हटलं, ’माझ्याकडे अडचण होते ती हीच. बाहेरचं कुणी आलं की त्याला बसण्यासाठीही जागा शिल्लक नसते बऱ्याचदा,’ आणि असे म्हणत त्यांनी एका स्टुलवरची दोन-तीन गाठोडी बाजुला करुन कशीबशी मला बसण्यापुरती जागा करुन दिली. या बाईंची म्हणजेच ममता चॅरिटेबल फ़ौंडेशनच्या श्रीमती ज्योतीताई सचदे यांची आणि माझी ओळख मागे भुसारी कॉलनी भागात पार पडलेल्या एका रक्तदान शिबिरात झाली होती. ’आपले फ़ौंडेशन नक्की काय काम करते ?’ या माझ्या प्रश्नावर त्यांनी काही जुजबी माहिती सांगितली पण त्यासाठी एकदा घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण केले. त्यानंतर काही दिवसांनी मी ठरवून त्यांच्या घरी गेलो, त्यावेळचा हा अनुभव.

एकूण पाच खोल्यांच्या त्या फ़्लॅटमधील सर्वच्या सर्व खोल्या अशाच गाठोड्यांनी आणि वस्तुंनी खचाखच भरलेल्या होत्या. गरजू संस्थांना कपडे आणि घरगुती वापराच्या वस्तु मिळवून देणे हेच ममता फ़ौंडेशनचे मुख्य काम आहे. ज्योतीताईंबरोबर या फ़ौंडेशनचे काही अन्य विश्वस्त असले तरीही संस्थापिका आणि मुख्य कार्यकर्त्या ज्योतीताई या स्वत:च. जुने कपडे आणि अन्य वस्तु जमवून त्या गरजुंना देण्याचे काम करताना या सर्व वस्तुंना ’देण्यायोग्य’ करण्याचेही अचाट काम ज्योतीताई जवळ-जवळ एकहातीच करतात. ’घराचे असे गोदाम झाल्यामुळे मी बऱ्याचदा बाथरूममध्येच झोपते’ असेही त्यांनी मला यावेळी सांगितले. या देण्यायोग्य झालेल्या वस्तु नीटपणे लावुन त्या ट्रक्समध्ये भरुन ग्रामीण, वनवासी भागातील गरजू संस्थांना पाठवल्या जातात. त्याकरिता अनेक संस्थांशी ज्योतीताई सातत्याने संपर्क ठेवून असतात. आपल्या परिसरात चाललेल्या सामाजिक कामांतही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. हे सर्व काम करताना त्यांना विलक्षण आनंद मिळतो. वरील भेटीच्या निमित्ताने जनकल्याण रक्तपेढीला त्यांचा परिचय झाला. पुढे काही रक्तदान शिबिरांचेही आयोजन त्यांनी उत्साहाने केले.

आणखी एका ज्योतीताईंशी रक्तपेढीचे ऋणानुबंध एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळुन आले. ज्योतीताई पठानिया त्यांचं नाव. अत्यंत धाडसी व्यक्तिमत्वाच्या या ज्योतीताईंनी अंगिकारलेले व्रतही आव्हानात्मकच आहे. पुण्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी तसेच फसवून या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींसाठी ज्योतीताई कंबर कसून ठामपणे उभ्या आहेत. चैतन्य महिला मंडळ या संस्थेच्या माध्यमातून अशा मुलींना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, रेस्क्यू होम्स, या महिलांच्या मुलांसाठी रात्रीची पाळणाघरे, संबंधित पोलिस केसेसचा पाठपुरावा यांसारख्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांत ज्योतीताईंनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिलं आहे. ’आमच्याशी संबंधित काही पीडित मुलींना बऱ्याचदा रक्ताची गरज भासते, त्यासंदर्भात आपण काहीतरी करा’ असे ज्योतीताईंनी पहिल्याच भेटीदरम्यान मला सांगितले होते. त्यानंतर आजपर्यंत ’चैतन्य महिला मंडळा’कडून आलेल्या कुठल्याही रक्तघटकाच्या मागणीसाठी एक रुपयादेखील प्रक्रिया शुल्क आकारले गेलेले नाही. ज्योतीताईंनी चालविलेल्या या महान कार्यामधील जनकल्याण रक्तपेढीचा हा अल्पसा सहभागही आहे आणि या कार्याप्रति प्रकट केलेला प्रतिकात्मक आदरही आहे. नुकताच ज्योतीताईंना जनकल्याण समितीचा ’श्रीगुरुजी पुरस्कार’ही दिला गेलेला असून ज्योतीताईंच्या कार्याचे महत्व उमगलेल्या सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

उत्कट सामाजिक भावना जपणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांनी ’सेवासहयोग’ या संस्थेचा श्रीगणेशा केला आणि त्या माध्यमातून हजारो उच्चशिक्षित तरुणांना प्रत्यक्ष काहीतरी सामाजिक काम करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलं. ग्रामीण भागातील गरजू मुला-मुलींना दर वर्षी या संस्थेच्या मार्फ़त हजारो नवीन स्कूलकीट्स दिले जातात. समाजामधील ’आहे रे’ आणि ’नाही रे’ या दोन वर्गांतील दरी मिटवून दोन्ही बाजुला समाधानाची पेरणी करणाऱ्या या अभिनव उपक्रमामध्ये शेकडो उच्चशिक्षित युवक आनंदाने सहभागी होत असतात. गरजू सामाजिक संस्था आणि दानशूर कॉर्पोरेट यांना जोडण्याचे कामही सेवासहयोगमार्फ़त सातत्याने केले जाते. याखेरीजही उपेक्षित वस्त्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी ’समुत्कर्ष’ नावाचा प्रकल्प सेवासहयोगच्या माध्यमातून चालतो. पंढरीच्या वारीमध्ये स्वच्छतेचा संदेश आणि समर्थ पर्याय देणारा ’निर्मल वारी अभियान’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यामागे ’सेवासहयोग’चे मोलाचे योगदान आहे. अशा बहुआयामी ’सेवासहयोग’शी जनकल्याण रक्तपेढीचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. कॉग्निझंट फ़ौंडेशन या संस्थेच्या सहकार्याने रक्तपेढीत उभ्या राहिलेल्या रक्तविकिरण (Blood Irradiator) प्रयोगशाळेसारख्या अव्दितीय प्रकल्पाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती ’सेवासहयोग’मधूनच. ’सेवासहयोग’च्याही विविध उपक्रमांमध्ये रक्तपेढी कायमच सहभागी होत आलेली आहे.

’इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे’ च्या माजी अध्यक्षा आणि ’श्वेता असोसिएशन’ या संस्थेच्या संस्थापिका डॉ. माया तुळपुळे यादेखील रक्तपेढी परिवाराच्या अशाच एक सदस्या. ’श्वेता असोसिएशन’ या संस्थेमार्फ़त अंगावरील पांढरे डाग म्हणजेच कोडांविषयी समाजात असणाऱ्या गैरसमजांवर किंवा भेदाच्या भावनेवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जाते. व्याख्याने, स्पर्धा, साहित्य, कला अशा सर्वच माध्यमांव्दारे हे प्रबोधन करण्यात येते. ’नितळ’ नावाचा एक सुंदर चित्रपटही या विषयावर मध्यंतरी निर्माण झाला. हा चित्रपटही ’श्वेता’चीच निर्मिती. डॉ. माया तुळपुळे यांचा रक्तपेढीशी जुना स्नेह आहे. रक्तपेढीत न्युक्लिक ॲसिड टेस्टिंगची अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरु झाली त्या वेळच्या जाहीर कार्यक्रमातही मायाताई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. रक्तपेढीचा वार्षिक वृत्तांत ’समर्पण’साठी मायाताईंनी अतिथी संपादक म्हणून मायाताईंनी ’महिला आरोग्य’ या विषयावर लेखनही केले आहे. आय.एम.ए. किंवा ’श्वेता’च्या उपक्रमांसाठी मायाताई हक्काने रक्तपेढीची मदत मागतात. ’श्वेता’च्या ’रन फ़ॉर व्हिटिलिगो’ या प्रबोधनात्मक मॅरेथॉनमध्येही रक्तपेढीचा दर वर्षी सहभाग असतोच.

आपल्या व्यक्तिगत जीवनातही अनेक व्यक्तींशी आपले अत्यंत स्नेहपूर्ण संबंध असतात. हे संबंध फ़ायदा-तोट्यासारख्या व्यावसायिक राशींवर मापता येत नाहीत. तिथे देण्या-घेण्याची गणिते चालत नाहीत. स्वार्थ-मत्सरादी विकार इथे निष्प्रभ असतात. कारण शुद्ध हेतुंच्या विश्वासामुळे जुळुन आलेले हे ऋणानुबंध असतात. हे जसे व्यक्तिगत जीवनात असते तसेच संस्थात्मक जीवनातही असते. वर उल्लेख केलेल्या संस्था म्हणजे अशा ऋणानुबंधांची केवळ काही उदाहरणे आहेत. याखेरीजही अशा अनेक संस्थांशी रक्तपेढीचे स्नेहपूर्ण संबंध आहेत, ज्यांची कार्यक्षेत्रे खरे तर खूप निराळी आहेत. रक्तपेढीशी संबंध आणायचा झाला तरी त्यासाठी काही खास निमित्ते शोधावी लागतात. पण ’रक्तपेढी चांगल्या प्रकारे काम करते’ हा विश्वास त्यांनादेखील असतो आणि रक्तपेढीलाही या सर्वांच्या कामातील शुद्ध हेतुंची खात्री असते. म्हणूनच पुन्हा पुन्हा भेटणे, एकत्रित काम करणे हा परस्परांसाठी निश्चितच सुखद असा अनुभव असतो.

थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी ’क्राऊड फ़ंडिंग’च्या माध्यमातून आर्थिक सहयोग मिळविण्यासाठी सातत्याने आटापिटा करणारे ’मेघार्थ’चे अशोक व डॉ. सौ. रश्मी गपचूप तसेच प्रदीप व डॉ. सौ. भारती कुरुलकर, सारसबाग गणपतीच्या मंदिरात रक्तदान शिबिर घेण्याची अभिनव कल्पना साकार करणारे श्री देवदेवेश्वर संस्थानचे सुभाष बाठे, सुधीर पंडीत व अन्य विश्वस्त मंडळी, मुक्तांगण पुनर्वसन केंद्रात रक्तदान प्रबोधन कार्यक्रम आणि शिबिरे आग्रहाने करवून घेणाऱ्या मुक्ताताई पुणतांबेकर, प्रतिवर्षी शाळकरी मुलांसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत रक्तदान-प्रबोधनाचा विषय डॉ. अतुल कुलकर्णी यांनीच मांडावा असा पायंडा आत्यंतिक प्रेमापोटी रूढ करणारे चारित्र्य प्रतिष्ठानचे सुरेश मेहता या सर्वांबरोबरच सेवावर्धिनी, स्वरूपवर्धिनी, अपंग कल्याणकारी संस्था, आरोग्य भारती, निरामय, श्री संत सेवा संघ अशा कितीतरी संस्था आणि त्यातील व्यक्ती आज जनकल्याण रक्तपेढीशी अविभाज्य घटकांप्रमाणे जोडल्या गेलेल्या आहेत. या सर्वांचेच कार्य आणि कार्याचे हेतू ’उत्तम, उदात्त आणि उन्नत’ आहेत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वच कार्ये पूरक आहेत, पोषक आहेत. त्यांचे परिणामही त्या त्या क्षेत्रांत लक्षणीयरित्या दिसतात.


व्यक्तिगत जीवनात चांगल्या मित्रांचा सहवास जसा आनंद देणारा असतो त्याचप्रमाणे अशा ’उत्तम, उदात्त आणि उन्नत’ संस्थारुपी सहचाऱ्यांबरोबर काम करण्याने संस्थात्मक जीवनही समृद्ध होते.
- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@