‘वैभवशाली विजयनगर साम्राज्य’ : संपन्न वारशाचं देखणं दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2018   
Total Views |



आपण महाराष्ट्रीय मंडळी भाग्यवान आहोत. आपण अशा भूमीत जन्म घेतला जिथे शिवाजी महाराज कोण होते हे वेगळं शिकवावं लागत नाही. लहानपणापासून शिवरायांचे पराक्रम आपल्या कानावर पडतच जातात. परचक्राच्या वावटळीत महाराष्ट्र भोवंडून जात असताना महाराजांनी इथल्या लोकांना ताठ मानेने जगण्याचं कारण दिलं. कारण हे राज्य कुणा बाहेरून आलेल्या सुलतानशाहीचं नव्हतं. हे 'स्व'राज्य होतं... हिंदवी स्वराज्य! आपली धार्मिक प्रतीकं, परंपरा, दैवतं यांच्यावर धरलेली काजळी दूर करून ती पुन्हा लखलखीत करण्याचं काम महाराजांनी केलं. कुठलाही महापुरुष हा नेहमी सजगपणे वावरत असतो म्हणूनच आपल्या भवतालातून, इतिहासातून प्रेरक घटना, व्यक्ती यांच्याकडून अमृतकण टिपत जात असतो. त्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊन त्या गोष्टींमध्ये कालानुरूप स्वतःची कल्पकता, बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने नवा काळ घडवत असतो, नवे पायंडे पाडत असतो, नवे अर्थ निर्माण करत असतो. महाराजांनीही हे केलंच. मग त्यासाठी त्यांच्यासमोर कुठल्या हिंदू साम्राज्याचं प्रेरक उदाहरण होतं? याचं उत्तर आहे 'विजयनगरचं साम्राज्य'. ज्या साम्राज्याने विलक्षण वैभव अनुभवलं, कला-संस्कृती-साहित्य यामध्ये मोलाची भर घातली, जे लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचं हक्काचं निवासस्थान होतं, ज्याची भव्यता जडणघडणीच्या वयातल्या शिवरायांनी अगदी जवळून अनुभवली अशा या सामर्थ्यशाली साम्राज्याच्या विविध अंगांची ओळख करून देणारं अतिशय देखणं पुस्तक मराठीत आलं आहे ज्याचं नाव आहे 'विजयनगरचे वैभवशाली साम्राज्य'.


ऱ्हास, उदय आणि ऱ्हास


विजयनगरचे संदर्भ अगदी जुन्या काळापासून आपल्या साहित्यात सापडतात. विरुपाक्ष अर्थात शंकराच्या प्राप्तीसाठी पंपा म्हणजेच पार्वती इथल्या पंपासरोवरापाशी तपश्चर्येला बसली होती. दोघांच्या विवाहानंतर विरुपाक्ष पंपापती म्हणून ओळखला जाऊ लागला आणि हे क्षेत्र पंपाक्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याचंच नाव पुढे हंपी झालं. रामायणात उल्लेखलेली सुग्रीव आणि हनुमानाची किष्किंधा नगरीही इथलीच.


अल्लाउद्दिन खिलजी, मलिक काफूर यांच्या सुलतानी राजवटीने इथली जुनी हिंदू राज्ये संपुष्टात आणली. शृंगेरी मठ, श्रीरंगम मंदिर यांचा उच्छेद झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास गमावलेल्या जनतेला जागृत करण्याच्या उद्देशाने संन्यासी स्वामी विद्यारण्य यांनी हे साम्राज्य स्थापन केलं. हरिहर, बुक्क आणि त्यापाठोपाठ कृष्णदेवराय हे या साम्राज्याचे प्रसिद्ध राजे. सर्वांनी अनेक कलांना प्रोत्साहन दिलं, ज्याच्या खाणाखुणा आजही त्या प्रदेशात सापडतात. विजयनगरला भेट देणारे परदेशी प्रवासी, दूत हेदेखील तिथल्या वैभवाने दिपून गेल्याची वर्णनं त्यांनी केलेल्या नोंदींमध्ये आढळतात. आजूबाजूच्या विविध बादशाह्यांच्या गराड्यात विजयनगरने आपली ‘हिंदू साम्राज्य’ ही ओळख निर्माण केली आणि वृद्धिंगत केली. शैव-वैष्णव अशा दोन्ही पंथांना इथे आदराचं स्थान होतं. हिंदू साम्राज्य असलं तरीही अन्य धर्मांचा आदर होता. जैन वारसा सांगणाऱ्या वस्तू, चिन्हं आजही इथे दिमाखात उभ्या आहेत. पण हे सदासर्वकाळ टिकू शकलं नाही. दक्षिणेतल्या सर्व बादशाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरची शकलं केली आणि साम्राज्य लयाला नेलं. नुसता पराभव केला नाही तर जाळपोळ, लुटालूट, मूर्ती व मंदिरांची तोडफोड करून पुरता विध्वंस केला. बुतशिकन या लौकिकाला सगळे आक्रमक जागले. या देशाला हिंदू स्वराज्याची अजून ८०-९० वर्षं वाट पाहावी लागली ...



वैभवी साम्राज्यावरचे श्रीमंत पुस्तक


आज आपल्याला विजयनगर म्हटल्यावर त्याचं निश्चित स्थान माहिती असतंच असं नाही. पण हंपी म्हटल्यावर मात्र आपल्याला चट्कन लक्षात येतं, इतकी त्या साम्राज्याची हंपीशी नाळ घट्ट जुळलेली आहे. खरं म्हणजे हंपी हे विजयनगर साम्राज्यातल्या प्रमुख नगरांपैकी एक नगर आहे. आपल्या अजोड शिल्पांमुळे जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळवलेलं हंपी दरवर्षी लक्षावधी पर्यटकांना, अभ्यासकांना आपल्याकडे खेचून घेत असतं. साधारण १४वं शतक ते १६वं शतक या कालावधीत कीर्तिशिखरावर असणाऱ्या दक्षिणेतील या साम्राज्यावर मराठीत जास्त लिखाण उपलब्ध नाही. इतिहासाच्या पाठयपुस्तकांमध्येही मुघल साम्राज्य आणि अन्य बादशाह्या यांच्या दरम्यान काही परिच्छेदांमध्ये अंग चोरून उभ्या असलेल्या या साम्राज्याच्या सामर्थ्याबद्दल आणि मुख्य म्हणजे वैभवाबद्दल वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने श्री. एन. शहाजी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते गेली १४ वर्षं हंपी आणि परिसराचा ते अभ्यास करत आहेत. तो अभ्यास पानोपानी दिसतोच. पुस्तकाचा लेआऊट, छायाचित्रांची निवड, त्यांची मांडणी अतिशय आकर्षक आहे. मराठीत एवढी देखणी पुस्तकं कमीच आढळतात. विजयनगरबद्दल अजूनही पुस्तके लिहिण्याचा शहाजी यांचा मानस असून यापुढचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे!


जाता जाता पुस्तकात एक बदल सुचवावासा वाटतो तो म्हणजे पुस्तकात असणाऱ्या माहितीच्या वर्गवारीबाबत. इथे असणाऱ्या नोंदी माहितीपूर्ण आहेत परंतु तरी त्यांची काळ अथवा स्थळं यानुसार निश्चित नशीबवर्गवारी दिसून येत नाही. पुढच्या आवृत्तीत ही सुधारणा केल्यास ते वाचनाच्या दृष्टीने अधिक सोयीचं होईल. अर्थात एकूण पुस्तकाच्या प्रभावापुढे हे खूपच नगण्य आहे. हे पुस्तक अनुभवण्याचं पुस्तक आहे. या पुस्तकासाठीचे संशोधन, लेखन, छायाचित्रण, डिझाईन आणि प्रकाशन या सर्व भूमिका एन. शहाजी यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडल्या आहेत.


हंपी व विजयनगरबद्दलच्या अनेक अज्ञात गोष्टींबद्दल तपशिलाने जाणून घ्यायचं असेल तर ही एन. शहाजी यांची ही मुलाखत आवर्जून पहा --




आपल्या वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारं आणि आपल्या बुकशेल्फची शोभा द्विगुणित करणारं असं हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रहात असायलाच हवं !



पुस्तक : वैभवशाली विजयनगर साम्राज्य
लेखक : एन. शहाजी
प्रकाशक : विरूपाक्ष प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८०
मूल्य : ५५० रू
आवृत्ती : पहिली (२५ ऑगस्ट २०१६)


- प्रसाद फाटक
@@AUTHORINFO_V1@@