अभिनयातील ‘चाणक्य’

    18-Mar-2018   
Total Views | 8

रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत नावलौकिक कमावलेला अभिनेता म्हणजे मनोज जोशी. मनोज जोशी यांनी मराठी भाषेतून अभिनय क्षेत्राची सुरुवात करत गुजराती, हिंदी आणि पंजाबीतही आपल्या अभिनयाची अमिट छाप पाडली. त्यांनी कुठल्याही एकाच पठडीतल्या भूमिका न करता सातत्याने प्रेक्षकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. असा हा सतत नाविन्याचा ध्यास घेणारा अभिनेता म्हणजे मनोज जोशी. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने नुकताच गौरव केला. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...


‘मनोज जोशी’ या अभिनेत्याचा परिचय नसणारे प्रेक्षक शोधूनही सापडणार नाहीत. कारण, ‘एक महल हो सपनों का’, ‘राऊ’ सारख्या अनेक हिंदी, मराठी लोकप्रिय मालिकांमधील त्यांचा अभिनय संस्मरणीय असाच. कोणे एकेकाळी मराठी मालिका आशयसमृद्ध होत्या. नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध यासारखा सामाजिक विषर ‘आभाळमाळा’ या मालिकेने उत्कृष्ट आणि प्रगल्भ पद्धतीने हाताळला. त्या मालिकेतील अनेक कलाकारांपैकी श्रेय जाते ते मनोज जोशी यांना. ‘हंगामा’ या हिंदी चित्रपटातील पोलिसाची विनोदी भूमिका असो, ‘भुलभुलैया’ मधील काकांची गंभीर भूमिका असो, ती उत्कृष्ट पद्धतीने वठविण्यात मनोज जोशी यांचा हातखंडा. मराठीतही ‘नारबाची वाडी’ सारखा विनोदी आणि ‘दशक्रिया’ सारखा सामाजिक विषरावर भाष्य करणारा गंभीर विषर लीलया अभिनित करणारे कसदार अभिनेता म्हणजे मनोज जोशी...


मनोज जोशी यांचा जन्म गुजरातमधील हिम्मतनगरचा. पण, त्यांचे बालपण रायगडमध्ये गेले, तर शिक्षण मुंबईतच झाले. त्यांच्या अभिनराच्या कारकिर्दीची सुरुवातही मराठी नाटकापासून झाली. नंतर मराठी, हिंदी, मराठी मालिका असा प्रवास करत १९९८ साली प्रदर्शित ‘सरफरोश’ मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेव्हापासून आजतागायत हिंदी, मराठी, गुजराती आणि पंजाबी भाषेत तब्बल १२० चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.


अभियनयाची आवड तशी मनोज जोशींना लहानपणापासून. महाविद्यालयात काही नाटकांत काम केल्यानंतर आपण अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवू शकतो, असा आत्मविश्‍वास त्यांच्या मनी निर्माण झाला आणि तिथून सुरू झालेला प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. मनोज जोशी यांचे सूत जुळले ते प्रियदर्शन या बहुआयामी दिग्दर्शकाबरोबर. प्रियदर्शनचे चित्रपट बहुतांश जरी विनोदी असले तरी त्या चित्रपटात जोशी यांनी एकाच पठडीतल्या भूमिका निभावल्या नाही. ‘हंगामा’मध्ये त्यांनी विनोदी पोलिसाची भूमिका निभावली, तर ‘भुलभुल्लैय्या’ आणि ‘चूप चूप के’सारख्या चित्रपटात त्यांनी गंभीर भूमिकाही बजावल्या. फक्त प्रियदर्शनच्याच चित्रपटात नाही तर मणिरत्नम दिग्दर्शित ‘गुरू’मधील घनश्याम भाई, सूरज बडजात्याच्या ‘विवाह’ या चित्रपटातील भगतजी या गंभीर भूमिकाही लक्षात राहणार्‍या. हिंदी चित्रपटसृष्टीत राहूनही या कलाकाराची नाळ अजूनही नाटकाशी जुळलेली आहे. नाटक म्हणजे आई असल्याचे ते विशेषत्वाने सांगतात. कारण, नाटकांतूनच त्यांच्यातील अभिनयाचा जन्म झाला. नाटक हा त्यांच्यासाठी प्राणायाम. पण, सध्या मराठी नाटकं ही आशयप्रधान नसल्याने प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट मत जोशी नोंदवतात. नाटकात काम केल्याने आत्मिक शांती मिळत असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. आजही ते ‘चाणक्य’चे प्रयोग करतात. चाणक्य करण्यामागची प्रेरणा विशद करताना ते सुरुवातीच्या काळात संस्कृत भाषेशी असलेल्या नात्याबद्दल सांगतात. त्यांचे वडील कीर्तनकार होते आणि त्यांनी संस्कृत भाषेमध्ये पदवी संपादित केली होती. त्यांचे वडील हे त्यांचे प्रेरणास्थान असल्याचे जोशी अभिमानाने सांगतात. त्यानंतर ‘चाणक्य’ हा विषय स्वतंत्रपणे हाताळला गेला नव्हता. पाच वर्षे संशोधानाअंती १९९० साली ‘चाणक्य’ हे नाटक गुजराती भाषेत पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आले. तीन भाषांतील तीन माध्यमं अर्थात रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपटांत जोशींनी आपल्या अभिनयाचा आविष्कार दाखविला. या तीनही भाषा आणि विशेषतः चित्रपटसृष्टीत त्यांना फरक असा जाणवतो की, मराठी चित्रपट आता अधिक आशयघन असून त्यांची निर्मिती अतिशय प्रगल्भतेने केली जाते. आधीही चांगले चित्रपट बनवले गेले. पण, आता अधिक चांगले आणि मौलिक विषय हाताळले जातात. दक्षिणेतली चित्रपटसृष्टी ही पूर्वीपासूनच मोठी होती, म्हणून दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटसृष्टी वगळता, भारतीय प्रादेशिक चित्रपटसृष्टीत मराठीत जेवढे चित्रपट निर्माण होतात, त्यातले फार कमी चालतात. असे चित्र असूनही सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती मराठी भाषेत झाली. उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन कमी पैशांत चित्रपट मराठीत निर्माण झाले. ‘भारतीय’, ‘दशक्रिया’, ‘बालगंधर्व’, ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’ सारखे उत्तम आणि दर्जेदार चित्रपट मराठीत निर्माण झाले. गुजराती चित्रपटसृष्टी आता गेल्या दोन वर्षांत पुन्हा उभी राहतेय. हिंदीत आता नवनवे प्रयोग सुरू होत असल्याचे ते सांगतात. या त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी भारत सरकारने नुकताच ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला आहे.


गेल्या काही वर्षांत आपल्याकडे ‘बाजीराव मस्तानी’, ‘इंदू सरकार’, ‘पी.के’, ‘ओह माय गॉड’, ‘आरक्षण’ अशा अनेक चित्रपटांवरून समाजमन ढवळून निघाले. ‘पद्मावत’ने तर त्याची अत्युच्च पातळी गाठली. अशा वातावरणात मनोज जोशी आणि दिलीप प्रभावळकर यांची मध्यवर्ती भूमिका असलेला, बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधरित ‘दशक्रिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावरही वादंग निर्माण झाले. ‘दशक्रिया’बाबत काही वाद होतील, अशी अपेक्षा जोशी यांना नव्हती. मुळात त्यात काहीच चुकीचं नव्हते, असेही ते म्हणतात. पण, ‘दशक्रिया’ला प्रदर्शनापूर्वीच तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय पाटील, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट सहायक भूमिकेसाठी मनोज जोशी यांना गौरवण्यात आले.


मनोज जोशी यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मंत्र’. या चित्रपटात एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो. पण, जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांड अमान्य असणारी मुलगी येते, तेव्हा ‘मंत्र’ची कथा उलगडत जाते. दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’चा माध्यमातून आजच्या तरुणाईचा आध्यात्मिक भावविश्‍वाचा गोंधळ नेमका मांडला आहे. यात ‘नास्तिक’ आणि ‘आस्तिक’ वादासारख्या संवेदनशील विषयाला हात घालण्यात आला आहे.




- तुषार ओव्हाळ

तुषार ओव्हाळ

मास मीडियामध्ये पदवी. मराठी वृत्तवाहिनीसाठी ३ वर्षे राजकीय आणि इतर संशोधन. राज्यशास्त्र विषयात रूची. वाचनाची आवड. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादकपदी कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121