'लक्ष्यवेधी' चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018   
Total Views |
 



‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ या सुविचाराला प्रत्यक्ष जगलेले, ‘सर्व काही संपले’तून ज्यांनी ‘खूप काही घडविले’ असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे अतुल राजोळी. ‘लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट’ या उद्योजकांना सर्वार्थाने घडविणार्‍या संस्थेचे ते संस्थापक आणि संचालक. अतुल एक उत्तम वक्ता तर आहेतच, पण एक अनुभवी प्रशिक्षक म्हणून माणसांच्या भावभावनांना, त्यांच्यातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या लाजवाब कौशल्याची दाद द्यावीच लागेल. तेव्हा, ‘एक वाया गेलेला मुलगा’ ते आज ‘विद्यार्थ्यांच्या, उद्योजकांच्या आयुष्याला आकार देणारा माणूस’ अशी ओळख असलेल्या या ‘लक्ष्यवेधी’ चेहर्‍याविषयी...
 
 
गेल्याच वर्षी अतुल राजोळींचे एकदिवसीय प्रशिक्षण ‘याचि देही’ अनुभवण्याचा सुयोग जुळून आला. तसा मार्केटिंग-सेल्सशी आम्हा लेखणीवाल्यांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी संभाषण कौशल्य, ग्राहकांशी सुसंवाद यांसारख्या विषयांवर अतुल राजोळी यांनी केलेले सखोल मार्गदर्शन चांगलेच स्मरणात राहिले. त्यावेळी हा ‘लक्ष्यवेधी चेहरा’ मनावर एक छाप सोडून गेलाच पण, प्रत्यक्ष मुलाखतीनंतर आज हजारोंना जीवनात ‘अतुल’नीय असा यशाचा राजमार्ग दाखविणार्‍या या अवलियाचे अंतरंग उलगडत गेले...
 
 
सेल्स-मार्केटिंगमध्ये नकारघंटा ही रोजची सोबतीच! पण, दूरध्वनीवरून बोलताना समोरच्याचा नकार येणार नाहीच, असे संभाषण कौशल्य विकसित केले तर... नकार आलाच, तर त्याला प्रसंगावधानता राखून शांतपणे कशी उत्तरे द्यायची, हे सगळे अतुल राजोळींनी सोदाहरण दाखवून दिलेच पण, यामागे केवळ त्यांचा प्रशिक्षक म्हणून प्रोफेशनल अनुभवच बोलत नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचीही त्याला किनार होतीच...
 
 
एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेले अतुल राजोळी... पहिली ते दहावी पार्ले टिळक विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या वडिलांची एमटीएनएलमध्ये कॅश काऊंटर विश्‍वासाने सांभाळणारे म्हणून ख्याती, तर घराला आर्थिक हातभार म्हणून घरगुती व्यवसाय समर्थपणे चालविणार्‍या आईचीही विश्‍वासार्हता मोठीच. त्यामुळे लहानपणापासून घरोघरी जाऊन विविध उत्पादनांची विक्री करणं, आईची पोस्ट ऑफिस एजन्सी असल्याने गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करणं, अशी कामं त्यांनी कुठलाही न्यूनगंड, शरम मनात न बाळगता अगदी मनापासून केली. त्यामुळे घरात लहानपणापासूनच व्यवसाय, विक्री, सेल्समनशिप, ग्राहकांचा विश्‍वास यांचे बाळकडू अतुल यांना आपसूकच मिळत होते. अभ्यासात फारसे मन न रमल्याने दहावीनंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा करायचे ठरवले. इतर मराठी माध्यमांतील मुलांप्रमाणेच अचानक सगळा अभ्यासक्रम इंग्रजीत अंगावर येऊन पडल्याने त्यांची अडचणही झालीच. त्यातच एक वर्षं वाया गेले आणि तीन वर्षांचा डिप्लोमा चार वर्षांनी पूर्ण झाला. ऐन उमेदीच्या, ऊर्जेच्या काळात अतुल यांच्या आयुष्यात सगळे आलबेल नव्हते. अभ्यासात इतर मुलांप्रमाणे त्यांना गती लाभली नाही, त्यातच वाईट संगतीचा परिणाम जीवनात अनेक चढउतार घेऊन आला. पण, कसाबसा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग करण्याची इच्छा नसल्याचे अतुल यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले. “मला व्यवसाय करायचाय,” या अतुल यांच्या उत्तरावर वडिलांनी “व्यवसाय कोणता करायचा ते माहीत नाही, तर किमान इंजिनिअरिंग पूर्ण कर. आम्हाला आमचा मुलगा इंजिनिअर हवा,” असे सांगत मग इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अ‍ॅडमिशन घेतली. तिथेही डिप्लोमाला ५९ टक्क्यांमुळे इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाऐवजी त्यांना पहिल्या वर्षापासून सुरुवात करावी लागली. पण, या काळात अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष, व्यसनांची कुसंगत आणि आई-वडिलांशी बिघडलेले संबंध यामुळे अतुल नैराश्यग्रस्त होते. आपल्या आयुष्यातील समस्यांबद्दल इतरांना दोष देत १९-२० व्या वर्षी आपलं आयुष्य संपलंच, या नकारात्मक विचाराने त्यांच्या मन आणि बुद्धीचा ताबा घेतला होता पण, म्हणतात ना आशेचा एक किरणही अंधारात प्रकाशवाट दाखवून जातो, तसाच एक किरण अतुल यांच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेला...
 
 
त्यांच्या एका मित्राने अतुल यांना तळवलकर जिम्नॅशियमच्या मधुकर तळवलकरांच्या कार्यक्रमाला नेलं. मनात इच्छा नसतानाही मित्राच्या आग्रहास्तव अतुल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. वयाची पासष्ठी ओलांडलेले तळवलकर मंचावर आले आणि पुढील दहा वर्षांत भारतभरात १०० जिम्स सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी अतुल यांना प्रश्‍न पडला की, यांचं वय किती आणि ते बोलतायत काय... कारण, या वयात लोक देवपूजेला लागून निवृत्ती पत्करतात. अतुल यांना तळवलकरांचं कौतुक वाटलं आणि स्वत:ची लाजही वाटली. अतुल मंचावर गेले आणि त्यांनी वाकून तळवलकरांना नमस्कार केला पण, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची त्यांची हिंमत काही झाली नाही...
 
 
तळवलकरांच्या भेटीनंतर अतुल यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत गेले. गणितासह इतर विषयात लागलेल्या एकूण १६ केट्या त्यांनी एका प्रयत्नात सोडवून दाखविल्या. याचा त्यांच्या महाविद्यालयात ‘रेकॉर्ड’ असल्याचे ते आवर्जून सांगतात. अतुल यांचा आत्मविश्‍वास वाढत गेला, संभाषण कौशल्य सुधारलं आणि ते अधिक ध्येयकेंद्रित झाले. या दरम्यान त्यांनी बरीचशी पुस्तकं वाचली. वाचनानंतर त्यांना प्रकर्षाने जाणवलं की, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण बिनकामाचं असून शिक्षणेतर पुस्तकांतून मिळणारं विचारांचं खाद्य अधिक मोलाचं आहे. बी. ई. कॉम्प्युटर्स झालेल्या अतुल यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात रस नव्हताच. त्यांना एचआर, प्रशिक्षण या क्षेत्राची माहिती मिळाली आणि त्यांनी संगणकीय इंजिनिअरिंग सोडून मानवी इंजिनिअरिंगकडे आपला मोर्चा वळवला. या क्षेत्रात मग त्यांनी काही वर्षं नोकरीही केली. या काळात या क्षेत्राशी संबंधित भरपूर काही त्यांना शिकायला मिळालं, पण कामाचं समाधान मात्र मिळाले नसल्याचे ते सांगतात. अखेरीस त्यांनी नोकरीला रामराम ठोकून कायमचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
 
दि. १९ जानेवारी २००८ पासून घरातूनच २५ हजारांचा लॅपटॉप, १२०० रुपयांचे टेबल आणि एका टेलिफोनसह अतुल राजोळींनी त्यांच्या एका मित्रासह ‘फ्युचर पाठशाला’ या विद्यार्थी विकास प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ केला. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांमधील वृत्ती आणि कौशल्य यांचा विकास करणे, हा या दहा दिवसांच्या उपक्रमाचा मूळ हेतू होता. या उपक्रमाची जाहिरातीची धुराही अतुल यांनी एकहाती सांभाळली. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अतुल यांच्या कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबाही असल्याने अल्पावधीत ‘फ्युचर पाठशाला’ सुपरहिट ठरली. पालकांनीही मग विद्यार्थ्यांसाठी एवढा उपक्रम राबविता, मग आमच्यासाठी काय? अशी विचारणा केली. त्यातच प्रशिक्षण हे आयुष्याचे ध्येय निश्‍चित केलेल्या अतुल यांना या उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे वाटले आणि मग पुढच्याच वर्षी २००९ साली ’लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. उद्योजकांना, प्रोफेशनल्सना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ‘लक्ष्यवेध’तर्फे लक्ष्यवेध फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि अ‍ॅडव्हान्स हे तीन प्रशिक्षणक्रम राबविले जातात. आजपर्यंत दोन लाखांहून अधिक उद्योजकांना, नोकरदारांना ‘लक्ष्यवेध’ने वैयक्तिक, व्यावसायिक पातळीवर मार्गदर्शन केले आहे. लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायला सक्षम करणे, हा ‘लक्ष्यवेध’च्या विविध उपक्रमांचा मूळ उद्देश. आगामी काळात १०० कोटींचे उत्पन्न असलेले १०० व्यवसाय उभे करण्याचे ‘लक्ष्यवेध’चे ध्येय आहे.
 
 
‘लक्ष्यवेध’सारखी इन्स्टिट्यूट चालवणे हाही शेवटी व्यवसायाच! तेव्हा, हा व्यवसाय उभारताना सामोरे जावे लागणार्‍या आव्हानांबद्दल विचारले असता राजोळी यांनी दोन प्रमुख मुद्दे विशद केले. एक तर पैसे भरून प्रशिक्षण घेण्याबाबत लोकांची उदासीनता आणि माध्यमांकडून ‘उद्योजकता’ या विषयाकडे होणारे दुर्लक्ष. त्यातच मराठी माणूस उद्योजकता, पैशांबद्दल फारसे काहीच बोलताना दिसत नाही, याचीही खंत अतुल व्यक्त करतात.
 
 
प्रशिक्षक म्हणून ज्यांना आपले करिअर घडवायचे आहे, त्यांच्यामध्ये उत्तम संभाषण कौशल्यापेक्षा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची कळकळ हवी, लोकांचे आयुष्य बदलण्याचा ध्यास हवा, असे राजोळी सांगतात. कारण, प्रशिक्षक हे शेवटी लोकांच्या आयुष्याला एक मूल्य प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बजावत असतात.
 
 
आपल्या व्यवसायामध्ये पत्नीचीही उत्तम साथ लाभल्याचे अतुल सांगतात. फुटबॉलची, गाणी ऐकण्याची, प्रवासाची, साहसी खेळांचीही अतुल यांना फार आवड. ते म्हणतात की, ते जर प्रशिक्षक नसते तर मनोरंजक म्हणून त्यांना काम करायला नक्कीच आवडले असते. भविष्यात ते करत असलेल्या कामावरच एक चित्रपट काढण्याचे त्यांच्या विचाराधीन आहे. यशप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण मंत्र देणारे ‘माझा मोटिव्हेटर मित्र’ या अतुल राजोळी यांच्या पुस्तकालाही उदंड प्रतिसाद लाभला. मधुकर तळवलकर, वॉल्ट डिझने, स्टिफन कवी, बाबा रामदेव यांना अतुल राजोळी आपले आदर्श मानतात. आजवरच्या वाटचालीत अतुल राजोळी यांना करिअर आयडॉल पुरस्कार २०१२, बेस्ट बिझनेस कोच, उद्योगतारा, आऊटस्टॅन्डिंग मोटिवेशनल ट्रेनर यांसारख्या अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.
 
 
तेव्हा, अतुल राजोळी यांचा एकूणच प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांच्या, नवउद्योजकांच्या आयुष्यात निश्‍चितच बदलाचे, नवचैतन्याचे वारे प्रवाहित करणारा आहे.
 
 
 
 
- विजय कुलकर्णी 
@@AUTHORINFO_V1@@