संघ : इहवाद आणि आध्यात्मिकतेचे ‘हॅप्पी ब्लेंडिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018   
Total Views |


डॉ. हेडगेवारांची हिंदू संघटनेची संकल्पना, त्यात त्यांनी इहवाद आणि आध्यात्मिकतेचे हॅपी ब्लेंडिंग कसे केले याचे विश्लेषण या लेखात केले आहे. ९३ वर्षांपूर्वी हिंदू समाजाला एका गणवेषात संघटित करणे, त्यांच्यात शिस्त निर्माण करणे आणि तरीही त्यांचा आत्मा या राष्ट्राच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला असणे, या गोष्टी डॉक्टरांनी सत्यात उतरवल्या.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेमध्ये समुत्कर्ष आणि निः श्रेयस या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्याची आकांक्षा व्यक्त झाली आहे. त्यात समुत्कर्ष हा समाजाचा व निःश्रेयस व्यक्तीगत असा त्याचा अर्थ आहे. इंग्रज येईपर्यंत हिंदू समाजावर मोक्ष भावनेचा संस्कार होता. प्रत्येक जन्मलेली व्यक्ती ही परमात्म्याचा किंवा ब्रह्मचैतन्याचा अंश असून आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे किंवा आत्मचैतन्याने ब्रह्मचैतन्यात विलीन होऊन जाणे, हेच जीवनाचे एकमेव उद्दिष्ट मानले जात होते. मनाच्या विविध विकारांमुळे माणूस ऐहिक जगात रमतो आणि ज्याक्षणी त्याला ऐहिक जीवनाच्या क्षणभंगुरत्वाचे ज्ञान होते, तेव्हा ते खरे ज्ञान असते. अशी हिंदू तत्त्वज्ञानातील पारंपरिक शिकवण आहे. हे ज्ञान त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून होऊ शकते. ज्याला ज्ञानयोग म्हटले जाते किंवा विविध योगमार्गांच्या साधनांतून त्याला असे ज्ञान होते, त्याला ‘राजयोग’ म्हटले जाते. तसेच भक्तीच्या मार्गानेही या ज्ञानाचा शोध होऊ शकतो. त्याला ‘भक्तीयोग’ असे नाव दिले गेले आहे. या तिन्ही योगांबरोबरच ‘कर्मयोगाचा’ही एक मार्ग म्हणून उल्लेख केला गेला आहे परंतु, लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्या’त विवेचन करेपर्यंत कर्मयोगाबद्दल फारशी चर्चा हिंदू तत्त्वज्ञानात झालेली दिसत नाही. मात्र गीतेमध्ये अर्जुनाला युद्धाचा उपदेश करीत असताना वरील तीनही मार्गांपेक्षाही जी प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीनुसार कर्म करीत राहणे, यातूनच खरा मोक्ष मिळू शकतो, असे कृष्णाने विवेचन केले आहे, परंतु काळाच्या ओघात आद्य शंकराचार्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग करून संन्यासमार्गाचे श्रेष्ठत्व तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भक्तीयोगाचे महत्त्व प्रतिपादित केले.



मोक्षवादी तत्त्वज्ञानामुळे हिंदू समाज हा व्यक्तीनिष्ठ व सामूहिक, ऐहिक जीवनाबद्दल उदासीन बनला. व्यक्तीला ऐहिक जगात जगायचे असेल तर जीवन संघर्ष चुकत नाही. त्यामुळे ऐहिक आकांक्षा व संघर्षांतून सुटता येत नाही. परंतु, त्याला गौण महत्त्व दिल्यामुळे ऐहिक जीवन संघर्षाकडे एक समाज म्हणून हिंदू समाजाचे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम, विविध प्रकारच्या आक्रमणांत झाला. ज्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आले, त्या जातीपुरता धर्म आपण पाळला तर त्यातूनच आपल्याला मोक्ष मिळेल. एवढीच त्याची सामाजिक कल्पना संकुचित झाली. त्याचा परिणामहिंदू समाजाचे सामूहिक अस्तित्व नष्ट होण्यात झाला. त्यामुळे भारतावर त्यावेळी विविध आक्रमकांनी आक्रमणे केली तेव्हा सुरीने लोणी कापावे तसे सहजपणे आक्रमक भारतात घुसू शकले. महंमद घोरीने सोमनाथवर केलेले आक्रमण काय किंवा खिलजीने नालंदाचा केलेला विध्वंस काय तसेच देवगिरीवर केलेले आक्रमण काय, या आक्रमकांना रोखू शकेल, अशी समर्थ केंद्रीय राजसत्ता उरली नव्हती. याची ही उदाहरणे होत.



परंतु, भारतावर इंग्रजांची सत्ता आली ती गुणात्मकदृष्ट्या मुस्लीम सत्तेपेक्षा वेगळी होती. मुस्लीम सत्ताधार्‍यांमागे सेनेटिक सामूहिक धर्मसंकल्पनेच्या प्रेरणा होत्या. त्यामुळे हिंदू समाजावर धार्मिक जुलूमही झाले आणि त्यातून स्वधर्म रक्षणाची प्रेरणाही जागृत झाली. शिवाजी महाराजांनी त्या प्रेरणेला अखिल भारतीय स्वरूप दिले परंतु, युरोपियन प्रबोधन काळामध्ये ज्या बौद्धिक व सामाजिक प्रेरणा जागृत झाल्या, त्यामुळे राष्ट्रीय प्रेरणेच्या आधारावर समाजाची सामूहिक शक्ती कशाप्रकारे जागृत होते याची अनेक उदाहरणे युरोपियन राष्ट्रांनी जगापुढे ठेवली. त्या काळातले इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी युरोपियन राष्ट्रे ऐहिक कर्तृत्वाच्या भावनेने भारली होती. आपल्या कर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्यांना आपल्या देशाच्या सीमा अपुर्‍या वाटत होत्या आणि त्यातूनच १८-१९ व्या व २० व्या शतकात युरोपियन साम्राज्यवादाचा जन्म झाला. या राष्ट्रीय भावनेतून जागृत झालेल्या या सामूहिक शक्तीला तोंड देण्याची क्षमता हिंदू समाजात नव्हती. त्यासाठी हिंदू समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र क्रांती घडून मोक्षवादी व्यक्तीनिष्ठ हिंदू समाजाला ऐहिककांक्षी बनविण्याची गरज होती. आजवरचे हिंदू समाजाचे संघटित स्वरूप मठ, मंदिरे, यात्रा आदीद्वारा प्रकट होत होते. या सर्वांमध्ये मोक्षभावना आणि अध्यात्मालाच महत्त्व होते. हिंदू समाजाची ऐहिक आकांक्षा जागृत करावयाची असेल तर आताच्या आधुनिक परिभाषेत बोलावयाचे असेल तर नवी ‘इकोसिस्टिम’ तयार करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाज संघटनेचे आजवरचे सर्व प्रकार बाजूला ठेवून हिंदू समाजामध्ये राष्ट्रप्रेरणा, सामूहिकता आणि विजयाकांक्षी ऐहिक प्रेरणा जागृत करण्यासाठी ज्या गोष्टी आजवर हिंदू समाजाच्या भाग नव्हत्या अशा गोष्टी गणवेश, संचलन, शिबिरे संघ शाखांच्या माध्यमातून रुजविल्या. हा केवळ बाह्य बदल नव्हता, तर पारंपरिक हिंदू मानसिकतेमध्ये केलेला क्रांतिकारक बदल होता. हिंदू समाजाचे बाह्यतः युरोपिकरण करत असतानाही डॉक्टरांनी त्यातील हिंदुत्वाचा आत्मा मात्र कायमठेवला. पारंपरिक हिंदू मानस हे कोणत्याही गोष्टीमागे मोक्षाची प्रेरणा असली पाहिजे, असे सांगत आले तर डॉक्टरांनी त्याचे स्वरूप बदलून आपल्या कोणत्याही कृतीमागे राष्ट्रीय व समाजहिताची प्रेरणा असली पाहिजे, याची शिकवण दिली. त्यामुळे कार्याची व्यक्तीगत प्रेरणा ही अध्यात्मिक किंवा निः श्रेयस मात्र त्याचा परिणाम समाजाच्या ऐहिक उत्कर्षात झालेला, असे चित्र निर्माण झाले. राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले हजारो स्वयंसेवक देशाच्या व जगाच्या विविध भागातून उभे राहिले, त्यांनी विविध क्षेत्रात अनेक कामे उभी केली. त्यातुन हिंदू समाजाच्या सामुहिक उत्कर्षाचे मानस तयार झाले. आता संघविचाराला वेगवेगळ्या क्षेत्रात जे यश मिळत आहे, याचे कारण संघाने निर्माण केलेली व्यक्तिनिरपेक्ष सामाजिक उत्कर्षाची आकांक्षा आहे.

आपल्या ९० हून अधिक वर्षांच्या कालखंडात संघानेही ती यशस्वी सामुहिक मानसिकतेची ‘इकोसिस्टम’ तयार केली आहे; त्यातच संघाचे सर्व यश सामावलेले आहे. युरोपिय राष्ट्रीय सामुहिक मानसिकता आणि संघ संस्कारातून निर्माण सामुहिक राष्ट्रीय मानसिकता यामध्ये गुणात्मक फरक आहे हे लक्षात न आल्यामुळे प्रसारमाध्यमातील आणि पाश्चात्य जगातील जे विश्लेषक आहेत. ते स्वतः ही संभ्रमित होतात व इतरांनाही संभ्रमित करीत असतात. नुकतीच संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाहांची निवड झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हे क्रमांक दोनचे महत्वाचे स्थान. या पदावर कोणाची निवड होईल आणि त्याचे कोणकोणते परिणाम होतील यासंबंधीचे अनेक अंदाज वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून व्यक्त केले गेले. या सर्व बातम्यांमध्ये रस नसलेला वर्ग होता तो म्हणजे संघाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा. याचे कारण पदावर कोणीही असले तरी आपल्याला हिंदू समाजाच्या सामुहिक परिवर्तनासाठी काम करायचे आहे, या त्याच्या दृढनिश्चयात कोणत्याही निवडीचा यत्किंचितही परिणाम होणार नव्हता. कोणत्याही पदावर कोणीही असो त्याचा विचार न करता सामाजिक व राष्ट्रीय उत्कर्षासाठी आपल्याला काम करायचे आहे, हा संघाच्या विचारसरणीचा शुद्ध स्त्रोत असल्याने आणि त्यात व्यक्तिगत लाभ-तोट्याचा विचार नसल्याने पाच पिढ्यांच्या काळानंतरही संघामध्ये नेतृत्त्वाबद्दल संघर्षही निर्माण झालेला नाही किंवा संघामध्ये फूट पडण्याचा विचार कोणाच्या मनाला स्पर्शूनही जात नाही. संघाने हे वेगळेपण जोपासले, याचे कारण सामाजिक व राष्ट्रीय आनंद आहे. या आत्मिक आनंदाला सामाजिक उत्कर्षाच्या आकांक्षेची दिलेली जोड आताच्या तरूणांच्या भाषेत बोलायचे असेल तर संघाने इहवाद आणि अध्यात्मिकतेचे हॅप्पी ब्लेंडिंग केलेले आहे, ज्यात समाजाचे ऐहिक सुख आणि व्यक्तिगत कर्तव्यपूर्तीचे समाधान या दोन्हींचा समन्वय साधला गेला आहे.

- दिलीप करंबेळकर
@@AUTHORINFO_V1@@