स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे- आ. कथोरे

    13-Mar-2018
Total Views |


 

 
स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे


 
. किसन कथोरे यांनी केली मागणी

 

 
बदलापूर, दि. 13 (प्रतिनिधी) - आघाडी सरकारच्या काळात घाईघाईने अविचारी पद्धतीने झालेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका नियोजित कल्याण जिल्ह्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्याची माहिती आ. किसन कथोरे यांनी दिली.विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी अशासकीय ठराव मांडला असल्याची माहिती आ. कथोरे यांनी दिली. जिल्हा विभाजनाच्या प्रश्‍नावरून सर्वच आमदारांना या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असून कर्जतचे आ. सुरेश लाड यांनाही कर्जत तालुका कल्याण जिल्ह्यात समावेश करण्याबाबतची मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. कथोरे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा झाल्यानंतरसुद्धा भौगोलिक, राजकीय, प्रशासकीय विस्तार लक्षात घेता ठाणे जिल्हा विस्तीर्ण आहे. ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा संघांसह 18 विधानसभा मतदार संघ येत आहेत. त्याबरोबरच विधान परिषद सदस्यांची संख्या जास्त आहे. चोवीस विधानसभा मतदारसंघ लक्षात घेता किमान 8 सदस्यांचा एक जिल्हा करणे अपेक्षित असताना आघाडी सरकारने घाई घाईत जिल्ह्याचे त्रिभाजन न करता विभाजन केले, असे आमदार कथोरे म्हणाले. वास्तविक ठाणे जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी राज्यपालांपर्यंत केलेली होती. संबंधित ग्रामसभेतही याबाबतचे तसे ठराव सर्वानुमते मंजूर झालेले आहेत. इतकेच नव्हे तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कल्याण जिल्हा निर्माण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्यावेळच्या जिल्हाधिकार्‍यांनीही सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, परंतु राजकीय खेळीमुळे जिल्ह्याचे त्रिभाजन न होता विभाजन केल्याचा आरोप आमदारांनी केला. नियोजित कल्याण जिल्ह्यासाठी लागणारी बहुतेक सर्व कार्यालये कार्यरत आहेत, त्यामुळे शासनाला अतिरिक्त निधीची गरज भासणार नाही, आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन करताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका रायगड जिल्ह्यातून वगळून नियोजित कल्याण जिल्ह्यात समावेश केल्यास शेलू, नेरळ, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी रायगड जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात अलिबाग येथे जावे लागणार नाही. अंबरनाथ बदलापूरनंतर शेलू, नेरळ, कर्जत या भागात विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. या विकासाला कर्जत तालुका कल्याण जिल्ह्यात जोडल्याने मध्य रेल्वेच्या एकाच मार्गावर सर्व स्थानके असल्याने सोयीचे होणार असल्यानेच जिल्हा विभाजनाची मागणी केल्याचे आ. कथोरे म्हणाले.