...असे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018   
Total Views |


राहुल गांधी यांनी जो आरोप केला आहे, तोच मुळात खोटा आहे. ते ज्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, तो पक्षच दुहीचे राजकारण खेळून, मतपेढीचे राजकारण करून अनेक वर्षे सत्तेवर होता.
 
 
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येऊ द्यायचे नाही, असा चंग बांधून काँग्रेससह विविध पक्ष कामाला लागले आहेत. भाजपचा वारू सर्वत्र वेगाने दौडत असल्याचे दिसत असतानाही भाजपचे दिवस आता भरले असल्याची स्वप्ने आताच विरोधकांना पडू लागली आहेत. विरोधकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात काही गैरही नाही. पण, आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी वाट्टेल ते आरोप करण्याचे जे प्रकार चालू आहेत, ते मात्र संबंधित पक्षाच्या नेत्यांना शोभादायक नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अलीकडेच सिंगापूर, मलेशियाच्या दौर्‍यावर गेले होते. तेथे एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार तोंडसुख घेतले. ही टीकाही काँग्रेस पक्षाध्यक्षपदाला न शोभणारी होती. भाजप सरकार दुहीचे राजकारण खेळत असून या सरकारमुळे देशात दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी सिंगापूर येथील कार्यक्रमात बोलताना केला.
 
 
परकीय देशात आपल्या स्वत:च्या देशाच्या सरकारवर कशी आणि किती टीका करावी, हे राहुल गांधी यांना शिकविण्याची नितांत गरज असल्याचेच यावरून दिसून येत आहे. मुळात राहुल गांधी यांनी जो आरोप केला आहे, तोच मुळात खोटा आहे. ते ज्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, तो पक्षच दुहीचे राजकारण खेळून, मतपेढीचे राजकारण करून अनेक वर्षे सत्तेवर होता. काँग्रेसच्या अशा दळभद्री राजकारणाचे पितळ उघडे पडल्याने जनतेने त्या पक्षास नाकारले असले तरी तो पक्ष अजूनही अशा राजकारणाला चिकटून आहे. गुजरातमध्ये अलीकडे झालेल्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय जनतेला आला आहेच. जातीपातीचे राजकारण करायचे, आपली मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करायचे ही काँग्रेसची नीती देशातील जनतेला माहीत नाही का? त्यामुळेच त्या पक्षाला जनता झिडकारत चालली आहे हे देशात जे निकाल लागत आहेत त्यावरून दिसून येत आहे. गुजरातमध्ये दलित, इतर मागासवर्गीय तसेच पाटीदार समाजाच्या कथित नेत्यांना बरोबर घेऊन काँग्रेसने जे राजकारण केले ते काय दुहीचे राजकारण नव्हते? प्रत्येक निवडणुकीत असे दुहीचे, तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस पक्ष खेळत आला आहे. केवळ काँग्रेसचा इतिहास जरी राहुल गांधी यांनी अभ्यासला तरीदेखील त्यांना याचे प्रत्यंतर येईल! पण, त्याकडे डोळेझाक करायची आणि भाजपवर तोंडसुख घ्यायचे हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच नव्हेत का? काँग्रेस पक्ष देशात बोटावर मोजण्याइतक्या राज्यात सत्तेवर आहे. पूर्वांचलातील निवडणूक निकालांनंतर हा पक्ष तेथे नावाला उरला आहे. आगामी काळात होणार्‍या काही राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यानंतर तेथूनही काँग्रेसचे उच्चाटन होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दुहीचे, लांगूलचालनाचे, तुष्टीकरणाचे राजकारण न करता भाजपला देशात विविध ठिकाणी यश मिळत चालले असल्याचे दिसत असताना खोटेनाटे आरोप करून राहुल गांधी का गळा काढत आहेत? आपल्याच नाकर्तेपणामुळे, तुष्टीकरणाच्या, जाती जातीत, धर्माधर्मात फूट पाडण्याच्या राजकारणामुळेच आपल्या पायावर धोंडा पडला आहे, हे राहुल गांधी यांच्या कधी लक्षात येणार? त्यासाठी आत्मचिंतन करावे लागते. केवळ विरोधकांवर आरोप करून भागत नाही!
 
 
सिंगापूर येथील कार्यक्रमात बोलताना, भारतासह काही ठिकाणी जनतेत फूट पाडण्याचे, जनतेच्या असंतोषाचा लाभ उठवून निवडणूक जिंकण्याचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच जनतेच्या विविध स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप केला. दुसर्‍या देशात आपल्या सरकारची अशी खोटीनाटी बदनामी करणे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षास नक्कीच शोभणारे नाही. राहुल गांधी यांनी मलेशियात बोलताना, ’’मी पंतप्रधान असतो आणि कोणी माझ्या हातात नोटाबंदीबाबतची फाईल दिली असती, तर ती मी केराच्या टोपलीत फेकून दिली असती,’’ अशी टीका केली. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी हे नकारात्मक मनोवृत्तीने राजकारण करीत आहेत. राहुल गांधी यांनाच जनता झिडकारून टाकत आहे. ते जेथे जेथे जातात तेथे काँग्रेसचे उच्चाटन होत असल्याचेच अनुभवण्यास येत आहे, अशी टीका केली आहे.
 
 
एकूण, भारतीय जनता पक्षास आगामी निवडणुकीत सत्ता मिळू द्यायची नाही, असा निर्धार काँग्रेसने केला आहे. संयुक्त लोकशाही आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, बंदिवासात असलेले लालूप्रसाद यादव यांच्यासह विविध नेत्यांनी तशी जुळवाजुळव सुरू केली आहे. पण, काही ठोस कार्यक्रम, धोरण न ठरविता केवळ भाजपला विरोध करण्यासाठी ही आवळ्याभोपळ्याची मोट बांधली जात असेल तर त्यास काही भवितव्य असणार नाही. सत्तेच्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाने विविध योजना हाती घेतल्या. अनेक चांगले उपक्रमहाती घेतले, संकुचित विचार न करता नेहमीच देशातील १२५ कोटी जनतेचा विचार करून निर्णय घेतले, हे माहीत असणारी जनता विरोधकांच्या आप मतलबी युतीस थोडीच धूप घालणार?
 
 
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना संयुक्त लोकशाही आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ’इंडिया शायानिंग’ची जशी गत झाली, तशीच गत नरेंद्र मोदी यांच्या ’अच्छे दिन’ची होईल, असे भाकीत वर्तविले आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व समविचारी पक्षांनी आपले स्थानिक पातळीवरील मतभेद विसरून राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी गेल्या १ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षांची एक बैठकही घेतली होती. विरोधी ऐक्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांपुढे बोलताना स्पष्ट केले होते. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आज, १३ मार्च रोजी सोनिया गांधी यांनी विरोधी नेत्यांना भोजनास निमंत्रित केले आहे. जे जे भाजपविरोधी ते ते सर्व या भोजनावळीस निमंत्रित असणार, हे उघडच आहे. या ‘डीनर डिप्लोमसी’मधून काय निष्पन्न होते ते नजीकच्या काळात जनतेसमोर येईलच.
 
 
सोनिया गांधी यांनीही आपला मुलगा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच भाजप सरकारवर टीका केली आहे. देशाचे स्वातंत्र्य दहशतीखाली दडपून ठेवले असल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला. देशाची प्रगती चार वर्षांतच झाली का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशाची प्रगती चार वर्षांतच झाली असल्याचा दावा भाजपने कधीही केला नाही. पण, काँग्रेसची ४८ वर्षांची राजवट आणि भाजपची ४८ महिन्यांची राजवट यांची तुलना करून एवढ्या अल्प कालावधीत काय काय केले जाऊ शकते?, हे देशास दाखवून दिले. हाती असलेली सत्ता जनतेच्या भल्यासाठीच वापरायची असा विचार आणि आचार घेऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षास देशाचे हित कशात आहे, हे सदैव आपल्यापुरता विचार करणार्‍या काँग्रेससह अन्य पक्षांनी सांगण्याची गरज नाही. तसेच सतत भाजप आणि रा. स्व. संघावर टीका करून हाती धुपाटण्याशिवाय काहीही लागणार नाही!


- दत्ता पंचवाघ
@@AUTHORINFO_V1@@