हिंगणघाटची एक समिधा यज्ञकुंडात विसावली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018   
Total Views |
 
 
 
नेहमीप्रमाणे ‘त्या’ दिवसाचाही सूर्य आपल्या रोजच्याच पूर्ण तेजाने, आपल्या सोनेरी आभेने नभोमंडळाला आपल्या कवेत घेण्यासाठी निघाला. सारी सृष्टी प्रकाशमान करणार्‍या त्या तेजालाही कल्पना नसावी, याच मातीची, वाट चुकलेली काही माथेफिरू पिलावळ एका उमलत्या जीवनात कायमचा अंधार करून एका कुटुंबाचा आधारवडच हिरावून घेणार आहे म्हणून! सकाळच्या त्या रम्य वेळी क्रूरकर्मा नक्षलवाद्याच्या एका गोळीने घात केला अन्‌ उमलते पुष्प भारतमातेच्या चरणी समर्पित झाले.
 
गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असलेला चंद्रशेखर सुरेशराव कोरे याच्या शिबिरावर 20 ऑगस्ट 2011 रोजी सूर्य उगवतीच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या गटाने हल्ला केला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी तो आपल्या दोन साथीदारांसह बेभान होऊन तुटून पडला. नक्षलवाद्यांच्या बंदुकीतून निघणार्‍या गोळ्यांना तेवढ्याच दमदारपणे प्रत्युतर देत, त्याच्या बंदुकीतून आग निघत होती. तीन नक्षल्यांना त्याने यमसदनी पाठविले. परंतु, एका किंचित बेसावध क्षणी पळून जाणार्‍या एका नक्षलवाद्याच्या बंदुकीतून निघणार्‍या गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला अन्‌ तो धरातीर्थी पडला. वृद्ध आई-वडिलांचा आधारवड कोसळला. देशद्रोह्यांचा खात्मा करीत असतानाच, हिंगणघाटच्या मातीतील एका ‘नररत्ना’ने शेवटचा श्वास त्या निर्मनुष्य जंगलात घेतला. क्षणभर ती धराही थरारली अन्‌ वीरपुत्राचे कलेवर आपल्या अंकावर घेताना शहारली असेल!
येथील संत तुकडोजी वॉर्डातील 27 वर्षांचा चंद्रशेखर सुरेशराव कोरे हा तरुण देशभक्तीच्या भावनेने बालपणापासूनच झपाटलेला होता. कोणतेही व्यसन नसलेल्या चंद्रशेखरला आवड होती ती बलसंवर्धनाची. सकाळ-संध्याकाळ नियमितपणे दोन तास व्यायाम करणे, कॉलेज आटोपले की घरात आई-वडिलांना घरकामात मदत करणे, शेजारी अडल्या-नडल्यांसाठी धावून जाणे, हा त्याचा स्वभाव. त्यामुळे तो परिसरात लोकप्रिय होता. वडिलांची केवळ चार एकर शेती. त्यात खाणारी सहा तोंडं. घरची परिस्थिती हलाखीची. अशातच केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती असल्याची जाहिरात वर्तमानपत्रातून वाचली. उंचापुरा बांधा व व्यायामाने कसलेले शरीर पाहून त्याची निवडही झाली. कठोर ट्रेनिंग पूर्ण होताच, गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव पोलिस दल केंद्रात त्याची पोस्टिंग झाली. आजूबाजूला घनदाट जंगल. मानववस्तीचा जवळपास मागमूसही नाही. नक्षलवाद्यांचे सातत्याने होणारे आक्रमण थोपविण्याची जबाबदारी घेऊन त्याचे पथक डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस परिसराची निगराणी करीत होते. ज्यांनी या देशाविरुद्ध युद्ध पुकारले त्या वाट चुकलेल्या माथेफिरूंना वठणीवर आणण्याचे काम त्याचे पथक चोखपणे बजावीत होते अन्‌ त्याच वेळी आपले ग्रॅज्युएशनचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यासही हृदयात होता. परीक्षेच्या वेळी सुटी घेऊन त्याने पदवी प्राप्त केली होती व आई-वडिलांच्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्याचेही काम तो करीत होता. देशसेवा व घरातील मोठा असल्याची भूमिका तो व्यवस्थित पार पाडत होता. धाकट्या बहिणीचे लग्न, छोट्या भावाचे शिक्षण व नोकरी याचीही त्याला चिंता होती. त्यातच शत्रूची एखादी गोळी कुठून व केव्हा येऊन छातीचा वेध घेईल, याचा नेम नाही, अशा वातावरणात चंद्रशेखरच्या पथकावर 20 ऑगस्ट 2011 च्या भेसूर सकाळी अचानकपणे नक्षल्यांनी हल्ला केला. पूर्णपणे दक्ष असलेल्या चंद्रशेखरने आपल्या दोन साथीदारांसह ताकदीने मुकाबला करीत हे आक्रमण परतावूनच लावले नाही, तर तीन नक्षल्यांचे प्राणही त्याने हरण केले. त्याच्या वीरमरणाला आज सहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला. त्या वृद्ध आई-वडिलांचा सन्मान, राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केला. स्व. चंद्रशेखरच्या नावाचे शहीद प्रमाणपत्र राष्ट्रपतींच्या सहीचे त्यांना दिले. त्याचा धाकटा भाऊ रवी यानेही मोठ्या भावापासून प्रेरणा घेत केंद्रीय राखीव दलात प्रवेश घेतला. तो सध्या छत्तीसगड येथे कार्यरत आहे. शहीद चंद्रशेखरच्या आई-वडिलांची भेट घेतली, त्या वेळी या माता-पित्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. आपला दुःखावेग आवरत, मुलाचे कौतुक दाखविण्याचा मोह ते आवरू शकले नाहीत. चंद्रशेखरला निरनिराळ्या खेळांत मिळालेली प्रमाणपत्रे, बक्षिसे व नोकरीत असताना घेतलेली पदवी प्रमाणपत्रे त्यांनी मोठ्या अभिमानाने दाखविली. आपण पोरगा देशासाठी दिला, ही कृतार्थतेची भावना त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. मात्र, एक खंत त्यांनी बोलून दाखविली- स्व. चंद्रशेखरच्या वीरमरणानंतर त्याच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी व त्यानंतर बरेच दिवस अनेक शासकीय अधिकारी, आमदार, खासदार व अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्याच्या घरी गर्दी करून तोंडभरून मदतीचे आश्वासन दिले होते. परंतु, वेळ निघून गेल्यानंतर कुणी या परिवाराकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांच्या धाकट्या मुलाला नोकरीचे आश्वासन अनेकांनी दिले, परंतु ते कुणीही पूर्ण केले नाही. शेवटी वडिलांनीच चार वर्षांपूर्वी सीआरपीएफच्या अधिकार्‍यांना आपल्या धाकट्या मुलाच्या नोकरीसाठी विनंती केली. त्या अधिकार्‍यांनी वडिलांची विनंती मान्य करून दोन महिन्यांच्या आत शहीद चंद्रशेखरच्या धाकट्या भावाला तत्काळ सीआरपीएफच्या छत्तीसगड पोलिस दलात सामावून घेतले. एकुलत्या एक लेकीचं लग्न झालं. ती सासरी सुखात आहे. मुलाचंही लग्न झालं. तो परिवारासह छत्तीसगड येथे राहतो. आता हे दोघे वृद्ध, देशासाठी प्राणार्पण करणार्‍या आपल्या शहीद मुलाच्या यादगार आठवणींना कुरवाळत... जपत... सांभाळत... मोठ्या हिमतीने जीवन जगत आहेत...
सतीश वखरे
हिंगणघाट,
@@AUTHORINFO_V1@@