भय्याजी जोशी चौथ्यांदा सरकार्यवाहपदी प्रतिनिधी सभेत एकमताने निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची पुन्हा सरकार्यवाहपदी निवड केली आहे. सुरेश उपाख्य भय्याजी जोशी चौथ्यांदा सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळतील. अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेचा आजचा दुसरा दिवस होता आणि आज सरकार्यवाहांची निवड होणार होती. त्यामुळे उत्सुकतेने भारलेल्या माध्यम प्रतिनिधींनी रेशीमबाग येथे गर्दी केली होती.

 
 
 
 
वर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज दुपारी निवडणूक घेण्यात आली, असे सांगून डॉ. मनमोहन वैद्य यांनी माहिती दिली की, संघाचे मध्य क्षेत्र संघचालक अशोक सोहनी निवडणूक अधिकारी होते. त्यांनी वर्तमान सरकार्यवाहांचा कार्यकाळ संपला असल्याचे सांगत दोन नावे सुचविण्याचे आवाहन केले. संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भडेसिया यांनी वर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या कार्यकाळात संघाची प्रगती झाल्याचे, तसेच अनेक जण नव्याने संघाशी जोडले गेल्याचे सांगत भय्याजी जोशी यांचेच नाव सुचविले. पूर्व उत्तरप्रदेश प्रांतसंघचालक वीरेंद्र पराक्रमादित्य यांनी या नावाचे समर्थन केले. भारतीय परंपरेनुसार दर 12 वर्षांनी ग्रहकाळ बदलतो. भय्याजींनी त्यांचा सरकार्यवाह म्हणून तिसरा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आणखी तीन वर्षे म्हणजे एक तप पूर्ण व्हावे, असे वीरेंद्र म्हणाले. दक्षिण क्षेत्र कार्यवाह राजेंद्रन्‌, कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे, आसाम प्रांत कार्यवाह डॉ. उमेश चक्रवर्ती आदींनी या नावाचे समर्थन केले. दुसरे नाव पुढे न आल्याने भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. भय्याजी जोशी 2009 मध्ये प्रथम सरकार्यवाह निवडले गेले होते. त्यानंतर 2012, 2015 साली देखील तेच या पदावर निवडले गेले होते.
चौकट..
प्रतिनिधी सभेत सहभागी होण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह येणार असल्याचे अनेकांना माहिती झाले होते. त्यांच्याशिवाय आणखी कोण कोण येणार, याची उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींचीही आज सकाळपासूनच रेशीमबागेत गर्दी झाली होती. सकाळी अमित शाह यांचे आगमन झाले. स्वागत कक्षासमोर त्यांच्यासाठी सुरक्षा रक्षक उभेही होते. मात्र, ऐनवेळेवर पश्चिम द्वाराऐवजी त्यांच्या वाहनांचा काफिला दक्षिणद्वारातून आत शिरला. दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. त्यांच्या वाहनांचा काफिला मात्र पश्चिमद्वारातून आत गेला. सायंकाळी बैठक संपल्यानंतरही प्रवीण तोगडिया यांना वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले. त्यावर ‘उद्या सायंकाळी 5 वाजेनंतर मी तुमच्याशी बोलायला मोकळा आहे. ही संघाची बैठक असून मी सदस्य आहे. येथे मी बोलू शकत नाही. येथे बोलण्याचा अधिकार केवळ संघाचा आहे’ असे हसत हसत ते बोलले.

उत्सुकता
नवे सरकार्यवाह कोण होणार, याची उत्सुकता आपणांसर्वांना लागली होती. आपण यासंबंधी अनेक बातम्याही प्रसारित केल्यात. त्यामुळे नागरिकांनाही उत्सुकता लागली होती की कोण होणार नवे सरकार्यवाह... नागरिकांचे कधी नव्हे तेवढे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. ही निवडणूक शांततेत झाली, असा उल्लेख डॉ. मनमोहन वैद्य यांनी प्रारंभी केला, तेव्हा उपस्थित माध्यम प्रतिनिधींमध्ये हंशा पिकला.
---
@@AUTHORINFO_V1@@