दोन महिला कॅडेटस्ना सर्वोच्च सन्मान
चेन्नई : भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (ओटीए) इतिहासात शनिवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या दोन महिला कॅडेटस्ना अत्यंत प्रतिष्ठेचा स्वोर्ड ऑफ ऑनर यासह सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
गुणवत्तेच्या आधारे स्थान
अकादमी कॅडेट सहायक (एसीए) प्रीती चौधरी यांना स्वोर्ड ऑफ ऑनर तर सिनिअर अंडर ऑफिसर (एसयूओ) विरती यांना रौप्यपदक मिळाले. गुणवत्तेच्या क्रमाने प्रथम स्थान मिळविणार्या कॅडेटला स्वोर्ड ऑफ ऑनर देण्यात येते.
लष्करात येण्यासाठी विरतीने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी
हरयाणातील या दोन्ही महिला अधिकारी देशातील इतर महिला व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. सर्वोच्च सन्मान मिळविण्यासाठी त्यांना २०० कॅडेटस्शी तोलामोलाची स्पर्धा करावी लागली. यात १९६ पुरुष कॅडेटस् होते. विशेष बाब म्हणजे विरती यांनी जपानमधील डिझाईन इंजिनिअरिंग क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्णही केले.