बांधल्यासारखे कर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

नेहमी हसतमुख असलेल्या काकूंच्या चेहऱ्यावर आज जरा चिंतेचे भाव जाणवले. विचारले तेंव्हा समजले की, मुलीची तब्येत बरी नाहीये त्यामुळे त्यांना तिच्याकडे जावे लागणार आहे. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे आणि घरात लहान नात. तिला काकूच सांभाळत असत. आपण मुलीकडे गेल्यावर तिचे कसे व्हायचे ? ह्या काळजीने त्या चिंताग्रस्त होत्या. मुलगा आणि सून समजूतदार, त्यांचे मतही काकूंनी आत्ता मुलीकडे गेलेच पाहिजे असेच होते. तरीसुद्धा आपल्याशिवाय कसे होणार ? याची चिंता काकूंना सतावत होती. नातीच्या जबाबदारीमुळे आजपर्यंत त्या कुठेच कधी न गेल्यामुळे त्यांना फारच अवघड वाटत होते. काही दिवस मुलीकडे राहून आल्यावर त्यांना जाणवले की मुलाने आणि सुनेने पाळणाघर आणि बेबी सीटरची व्यवस्था करून आणि एकमेकांच्या रजा adjust करून छान सांभाळले होते सर्व.
बऱ्याच वेळा एखादी गोष्ट खूप सवयीची झाली तर ती नसताना सुद्धा आपल्याला ती आहे असंच वाटतं. सतत हातावर घड्याळ घालायची सवय असेल तर हातात घड्याळ नसतांनाही ते आहे असं वाटतं. कायम चष्मा घालणाऱ्या व्यक्तीला डोळ्यांवर चष्मा नसतांनाही तो आहे असा भास होतो. नेहमी गळ्यात साखळी घालण्याची सवय असेल तर एखादे दिवशी साखळी नसेल तरी ते जाणवणार नाही जो पर्यंत हाताने चाचपून पहिले जात नाही.

एक उंटांचा व्यापारी होता. त्याच्याकडे दहा उंट होते. तो आणि त्याचा मुलगा ते उंट घेऊन वाळवंटातून एका गावाहून दुसऱ्या गावी जात. कधी कधी वाळवंटात रात्री मुक्काम करावा लागत असे. त्यांच्याकडे १० खुंट्या आणि १० दोरखंड होते. खुंट्या ठोकून त्या उंटाना तो दोरखंडाने खुंट्याना बांधून ठेवत असे. सकाळ झाली की दोरखंड सोडून उंटांना मोकळे करून पुढे नेत असे. एका रात्री मुक्काम पडल्यावर त्याने त्याच्या मुलाला खुंट्या ठोकून उंटांना बांधायला सांगितले. १० खुंट्या ठोकून झाल्यावर त्याने उंटांना दोरखंडाने बांधायला सुरुवात केली. ९ उंट बांधल्यावर त्याच्या लक्षात आले की एक दोरखंड कमी पडतोय. बहुदा रस्त्यात हरवला असावा. त्याने वडिलांना काय करायचे ते विचारलं. उंट तसाच न बांधता ठेवला तर रात्री तो कुठेतरी निघून गेला असता. वडील म्हणाले, “खुंटीजवळ उंटाला घेऊन जा आणि दोरखंडाने त्याला खुंटीला बांधण्याची नक्कल कर, त्याला बांधल्यासारखे कर, उंट कुठेही जाणार नाही.” मुलाला ते पटले नाही पण वडील सांगत आहेत म्हणून त्याने त्यांचे ऐकले आणि दोरखंड बांधण्याची नक्कल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले तर तो उंट खुंटीजवळ तसाच बसून होता. पुढे निघण्याची वेळ झाल्यावर त्याने सर्व ९ उंटांचे दोरखंड सोडले. ते सर्व उभे राहिले आणि चालू लागले पण १० वा उंट तिथेच बसून होता. मुलाला आश्चर्य वाटले. वडील म्हणाले काल बांधल्यासारखे केले होतेस तसे आता सोडल्यासारखे कर म्हणजे तो उठेल! मुलाने तसेच केले आणि उंट उठून चालू लागला.

प्रत्यक्ष बंधनांपेक्षा, बंधनांच्या कल्पनेतच आपण जास्त अडकतो कधी कधी! आपल्यावाचून घराचे अडेल, आपल्यावाचून office चे अडेल, आपल्यावाचून व्यवसायाचे अडेल, असे अनेक दोरखंड आपणच आपल्या पायात बांधल्यासारखे केलेले असतात. प्रत्यक्षात ते आहेत का? ते पण पहिले पाहिजे. सोडल्यासारखे करायची गरज आपल्याला तरी लागता कामा नये.

- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@