आता लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केल्यामुळे, सर्व राजकीय पक्षांत हालचालींना सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीची भाजपाला दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. कारण, या निवडणुकीने राज्यसभेत भाजपाला बहुमत मिळणार नसले तरी भाजपाचे संख्याबळ वाढणार आहे, पर्यायाने भाजपाचे ‘अच्छे दिन’ सुरू होणार आहेत.
 
लोकसभेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाला विधेयके पारित करण्यात कोणतीही अडचण येत नव्हती, मात्र भाजपाची सर्व गोची राज्यसभेत होत होती, कारण राज्यसभेत विरोधकांचे बहुमत होते. त्यामुळे लोकसभेत पारित झालेली अनेक महत्त्वपूर्ण विधेयके राज्यसभेत रखडली आहेत. यामुळे भाजपाला काम करण्यात अडचण येत होती. या निवडणुकीने भाजपाची ही अडचण काही प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीने विरोधकांचे संख्याबळ कमी होणार आहे, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मनोधैर्यावर निश्चित होणार आहे. आता प्रत्येक मुद्यावर सत्ताधारी पक्षाची कोंडी करणे विरोधकांना शक्य होणार नाही.
 
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या ५८ सदस्यांमध्ये ३ सदस्य नामनियुक्त आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ५५ जागांसाठी होणार आहे. यातील एक व्ही. स्वामी हे अपक्ष सदस्य आहेत. त्यामुळे उर्वरित ५४ पैकी ३० सदस्य विरोधकांचे, तर २४ सदस्य सत्ताधारी आघाडीचे आहेत. निवृत्त होणाऱ्यात सत्ताधारी आघाडीतील सर्वाधिक म्हणजे १७ सदस्य भाजपाचे आहेत. निवृत्त होणाऱ्यामध्ये जदयुचे ३, तेलगू देसमचे २, तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. निवृत्त होणाऱ्यामध्ये विरोधी आघाडीत काँग्रेसच्या १३, समाजवादी पक्षाच्या ६, तृणमूल काँग्रेसच्या ३, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या प्रत्येकी २ आणि माकप, बहुजन समाज पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.
राज्यसभेत २३३ निर्वाचित, तर १२ नामनियुक्त असे २४५ सदस्य असतात. सध्या राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे १२३ सदस्य आहेत. यात काँग्रेसचे ५४ सदस्य आहेत, तर दुसरीकडे भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ८३ सदस्य आहेत. यात भाजपाच्या ५८ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय राजीव चंद्रशेखर, सुभाष चंद्रा, संजय काकडे आणि अमरसिंह या चार अपक्ष सदस्यांचा भाजपाला पाठिंबा आहे. म्हणजे रालोआच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या ८७ वर जाते. अण्णाद्रमुकचे राज्यसभेत १३ सदस्य असून, हे सदस्य मतदानाच्या वेळी भाजपाला पाठिंबा देत असतात, त्यामुळे राज्यसभेत रालोआची सदस्यसंख्या १०० होते.
या निवडणुकीत नामनियुक्त सदस्य धरून भाजपाच्या ९ जागा वाढण्याची, तर विरोधी आघाडीच्या ८ जागा कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे संख्याबळ १०९ होऊ शकते, तर विरोधी आघाडीचे संख्याबळ ११५ वर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे रालोआ आणि संपुआच्या संख्याबळात फक्त सहाचा फरक राहील. हे अंतर भरून काढणे भाजपासाठी काही कठीण नाही. येत्या वर्ष-दीड वर्षात भाजपाचे पर्यायाने रालोआचे राज्यसभेत बहुमत झालेले असेल. त्यामुळेच प्रत्येक मुद्यावर भाजपाची कोंडी करणे यापुढे विरोधकांना शक्य होणार नाही. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे संजय सिंह, एन. डी. गुप्ता आणि सुशील गुप्ता हे तीन जण नुकतेच विजयी झाले. मात्र, आप राज्यसभेत भाजपा आणि काँग्रेस यांच्यापासून समान अंतरावर राहणार आहे. आपचा भाजपा वा काँग्रेस कोणालाच फायदा मिळणार नाही. आपचे थोडेफार सूत तृणमूल काँग्रेसशी आहे.
राज्यसभेची निवडणूक होत असलेल्या ५८ पैकी सर्वाधिक म्हणजे १० जागा उत्तरप्रदेशातील आहेत. त्या खालोखाल ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. मध्यप्रदेश आणि बिहारच्या प्रत्येकी ५ तर गुजरात, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. राजस्थान, ओडिशा आणि आंध्रप्रदेशातील प्रत्येकी ३, तेलंगणा आणि झारखंडमधील प्रत्येकी २ तर केरळ, हिमाचल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका जागेचा यात समावेश आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि पंजाबचा अपवाद वगळता अनेक राज्यांत भाजपा विजयी झाल्यामुळे, राज्यसभा निवडणूक भाजपासाठी कठीण राहिलेली नाही. यातही नंतर नितीशकुमार यांनी आपल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून महाआघाडीतून बाहेर पडत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यामुळे, बिहारमधूनही भाजपाला राज्यसभा निवडणुकीत लक्षणीय फायदा होणार आहे.
 
राज्यसभा निवडणुकीसाठी १२ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १३ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि १५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता पडली तर प्रत्यक्ष मतदान २३ मार्चला होईल. २३ मार्चलाच मतमोजणीही होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान होण्याची शक्यता अतिशय कमी असल्यामुळे, १५ मार्चलाच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले असेल.
 
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली, मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री जगतप्रकाश नह्ना, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, कायदा मंत्री रविशंकरप्रसाद आणि राज्यमंत्री मनसुख मंडाविया या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय भूपेंद्र यादव, अजय संचेती, विनय कटियार, पुरुषोत्तम रुपाला, के. एल. गणेशन्, बसवराज पाटील, आर. रामकृष्णन्, शंकर वेंगड, मेघराज जैन आणि भूषणलाल जांगिड या भाजपाच्या सदस्यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये अभिषेक मनु सिंघवी, रहमान खान, सत्यव्रत चतुर्वेदी, प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी, रजनी पाटील, शादीलाल बत्रा, के. चिरंजीवी, नरेंद्र बुढानिया यांचा समावेश आहे. निवृत्त होणाऱ्या नामनियुक्त सदस्यांमध्ये चित्रपट अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अनु आगा या तिघांचा समावेश आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ते जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना संधी देतात की तरुणांना आणतात, याकडेही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. अनेक राज्यांतून काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांना उमेदवारी देणे काँग्रेसला आता शक्य नाही.
२०१८ मध्ये काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना भाजपाला मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांतील विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही विचार करावा लागणार आहे. भाजपातून राज्यसभेसाठी पक्षाचे उपाध्यक्ष श्याम जाजू तसेच राम माधव, मुरलीधर राव, कैलास विजयवर्गीय, अनिल जैन आणि अरुणसिंह या महासचिवांच्या नावांची चर्चा आहे.
 
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. ३ मार्चला म्हणजे होळीनंतर होणाऱ्या भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्या केंद्रीय मंत्र्यांची राज्यसभेची मुदत संपणार आहे, त्यांना राज्यसभेत पाठवणे निश्चित आहे. त्यामुळे भाजपा यावेळी किती जुन्या चेहऱ्याना कायम ठेवते आणि किती नव्या चेहऱ्याना संधी देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह काही महिन्यांपूर्वी राज्यसभेवर निर्वाचित झाले आहेत. त्यामुळे राज्यसभेचे उमेदवार निवडताना अमित शाह यावेळी जास्त खबरदारी घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७
@@AUTHORINFO_V1@@