जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे वक्तव्य

 वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्याची टीम रवाना




यवतमाळ : जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हातील सर्व नागरिकांनी मिळून या संकटावर मात करायची आहे. त्यासाठी “सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा” ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. “सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा” प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील पहिली टीम आज (दि.६) रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवितांना ते बोलत होते.

यवतमाळ तालुक्यातील खानगाव, शिवणी, भारी, कापरा, मडकोना, धानोरा, बोदगव्हाण, तिवसा आणि झुली या ९ गावातील ४५ नागरिकांची पहिली बॅच आज रवाना झाली. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वाठोडा येथे चार दिवसांचे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यात ९७ गावांचे नियोजन असून अशा एकूण ६ बॅचेस प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यात सर्वात जास्त तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ, दारव्हा, कळंब, उमरखेड, राळेगाव आणि घाटंजी या तालुक्यांचा यात समावेश आहे.

वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील ९ गावातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे.  निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. प्रशिक्षणानंतर गावातील प्रशिक्षणार्थी पूर्णपणे बदललेले असतील. नवीन जिद्द, नवीन प्रेरणा घेऊन या स्पर्धेत सर्वांनी काम करायचे आहे. तुमच्या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील इतर नागरिकांना नक्कीच होईल. लोकसहभागाने आपण दुष्काळावर मात करू शकतो, हे या स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे, असे ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@