अ ट्रिब्यूट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
‘‘आई, माझा वाढदिवस म्हणजे आर्मी डे... आई, मी आर्मीतच जाणार, देशसेवा करणार...’’ शाळेत असताना एका मुलाच्या तोंडून हे वाक्य निघालं आणि काही वेळासाठी आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, आपल्या मुलाच्या इच्छेखातर आणि देशसेवेसाठी त्या आईने नमतं घेतलं आणि ‘तो’ लष्करात रूजू झाला. ही गोष्ट आहे, लेफ्टनंट कर्नल संतोष महाडिक यांची. काही जवानांच्या हौतात्म्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात, तर काहींच्या नाही. ही बाब ध्यानात घेता, अथर्व फाऊंडेशन आयोजित ‘अ ट्रिब्यूट टू इंडियन आर्मी ऍण्ड सॅल्युट टू सोल्जर’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अनेक जवानांच्या जीवनगाथा मांडण्यात आल्या. त्यापैकी काही मोजक्या आणि रंजक कथांचा घेतलेला हा आढावा...
 
१५ जानेवारी १९७७ रोजी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला. लहानपणापासून त्यांना खेळाची आवड आणि मातीची ओढ. ते एक उत्कृष्ट बॉक्सर, धावपटू आणि गोलकिपर होते. सैनिक शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. डिसेंबर १९९८ मध्ये ते लष्करात रूजू झाले. असे हे जिगरबाज जवान म्हणजे कर्नल संतोष महाडिक. लष्करात रूजू झाल्यानंतर त्यांनी खडतर प्रशिक्षण घेत एक सर्वोत्तम पॅराट्रुपर आणि कॉंबॅट डायव्हर म्हणून स्वत:ला सिद्ध केले. ‘उल्फा’ ही आसाममधली मोठी दहशतवादी संघटना. एकेकाळी ‘उल्फा’ची किती दहशत होती, हे वेगळे सांगायला नको. परंतु, इतर कुठलाही विचार न करता, २००३ साली कर्नल महाडिक यांनी ‘उल्फा’ विरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन रायनो’चे प्रतिनिधित्व केले. ‘रायनो’ ही एक अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणारी अशी लष्कराची दहशतवादविरोधी मोहीम. या मोहिमेनंतर त्यांच्या नेतृत्वाकडे आणि शौर्याकडे पाहता त्यांना ‘सेना मेडल’ने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी तब्बल २१व्या पॅरास्पेशन फोर्सच्या एका अधिकार्‍याच्या रूपात जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये दहशतवाद्यांना संपवण्याचे काम आपल्या हाती घेतले. २०१५ साली त्यांची जम्मू-काश्मीरमध्ये ४१व्या राष्ट्रीय रायफलच्या कमांडिंग ऑफिसर या पदावर कुपवाडा परिसरात नियुक्ती करण्यात आली. आपल्या बटालियनसह ते कलानुस या परिसरात तैनात झाले. यापुढचा त्यांचा प्रवास हा शौर्याचा होताच, पण तो त्यांचा अखेरचाही प्रवास ठरणार होता.
 
१३ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी त्यांना एका संशयास्पद घटनेचा सुगावा लागला. एक माणूस गावामध्ये घुसून घराघरांतून जेवण मागत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कुपवाड्यातील एकंदर परिस्थिती पाहता, अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते, अशी शंका त्यांच्या मनात कायमच होती. अशाच परिस्थितीत लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनेची माणसं या ठिकाणी घुसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचवेळी आपली सर्व शक्ती पणाला लावत आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्याचा निर्धार त्यांनी आपल्या मनाशी केला. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी एक योजना आखून १६० टेरिटोरिअल आर्मीसोबत आपले बटालियन त्या ठिकाणी तैनात केले. दहशतावाद्यांच्या ठिकाणावर लष्कराने शिरकाव करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याचवेळी त्यांच्या बटालियनमधल्या त्यांच्या एका जखमी सहकार्‍याला बाहेर काढत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात पाठवून दिले. यातच दुसर्‍या दिवशीची दुपार झाली. साहजिकच त्यावेळी दहशतवाद्यांचे खाण्यापिण्याचे साहित्य पूर्णपणे संपलं होतं. दुपारच्या सुमारास एक माणूस गावात घरोघरी जाऊन जेवणं मागत असल्याची माहिती त्यांना मिळाली. लगेचच त्यांनी काश्मीर पोलिसांच्या मदतीने आपल्या टिमला दोन तुकड्यांमध्ये विभागून त्या ठिकाणी घेराव घालायला सुरूवात केली. दोन्ही तुकड्यांनी तब्बल बरंचसं अंतर पार केलं. त्याचवेळी त्यांना त्या ठिकाणी काही भांडी आणि ताज जेवणं नजरेस पडलं. त्याचवेळी दहशतवादी आसपासच लपल्याची त्यांना खात्री पटली. मात्र, या तुकड्या जसजशा पुढे सरकत होत्या, तसतसे ते दहशतवादी आपली जागा बदलत होते. ते कोणत्या ठिकाणी लपून बसले होते हे शोधणं कठीण कामअसल्यामुळे कर्नल महाडिक यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी दुसर्‍या ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्याचा लष्कराला अंदाजही नव्हता. त्या दुसर्‍या दहशतवाद्यानेही अचानक दुसर्‍या बाजूने जोरदार गोळीबार केला. याच गोळीबारात ते आणि त्यांचे तीन सहकारी जवान जखमी झाले. मात्र, आपल्याला गोळी लागली आहे, आपण जखमी झालो आहोत याची जराही तमा न बाळगता कर्नल महाडिक एका उंच जागेवर पोहोचले आणि ज्या ठिकाणाहून गोळ्यांचा वर्षाव होत होता, त्या ठिकाणी गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांना यश आले. मोहीमफत्ते झाली, पण कर्नल महाडिक यांच्यावर बेछूट झाडलेल्या गोळ्यांनी त्यांचं कामकेलं होतं. महाडिक देशासाठी लढता लढता शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याला सलामकरत त्यांना शौर्य चक्र देऊन गौरविण्यात आले. कर्नल महाडिक आज आपल्यात नसले तरी ते आजही आपल्या मनात कायम आहेत. ते कुपवाड्यातील जवानांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. मुलांसाठी त्यांनी रिवर राफ्टींगसारखे साहसी प्रकार सुरू केले. अनेक सुधारण्याचा प्रयत्न करणार्‍या दहशतवाद्यांचं समुपदेशन करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. कर्नल महाडिक यांचे कार्य आणि शौर्य हे नव्या पिढीसाठी नक्कीच एक प्रेरणास्त्रोत ठरेल.
त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. अचानक दरवाज्यावरची बेल वाजली आणि पोस्टमन तिच्या हातात एक पत्र आणि त्याबरोबर असलेलं काही सामान देऊन गेला. तिने ते पत्र उघडलं, त्यात लिहिलेलं वाचून आणि त्यासोबत असलेलं एक फूल पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या ओळी वाचताना तिच्या भावना काय असतील हे आठवूनही अंगावर शहारा येतो. कारण, फक्त तीन दिवसांपूर्वीच तिचा नवरा शहीद झाल्याची बातमी तिच्या कानावर आली होती. त्या पत्रात केवळ दोन ओळी लिहिल्या होत्या, ‘‘पूजा, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि तू माझी प्रेरणा आहेस.’’ अगदी आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ते पत्र आणि फुलं हाती पडावी, अशी व्यवस्था त्यांनी केली होती. असे हे शूर जवान म्हणजे मेजर सतिश दहिया. १९८५ साली हरियाणामधल्या एका गावात दहिया यांचा जन्म झाला. दहिया यांनी इंग्रजी हा विषय घेऊन आपलं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना लहानपणापासूनचं लष्करी पेशाचं अप्रूप होतं. २००८ मध्ये ते लष्करात लेफ्टनंट म्हणून रूजू झाले. त्यांच्या शौर्यामुळे २००९ साली त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. २०१२ साली त्यांना ‘मेजर’ या पदी बढती मिळाली. जम्मू-काश्मीरमधील हुंदवाडा परिसरात १३ व्या राष्ट्रीय रायफल्समध्ये त्यांना तैनात करण्यात आलं होतं.
 
दि. १४ फेब्रुवारी २०१६ काश्मीरमधील बांडीपोर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार लष्कराने त्या ठिकाणी आपली मोहीम सुरू केली. लष्कराने घेरल्याचे कळताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. मात्र, याच परिस्थितीत दोन्ही बाजूने गोळीबार होत असताना त्यातली एक गोळी त्या परिसरातील एका रहिवाशाला लागली. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांची लष्कराच्या जवानांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशा परिस्थितीतही न डगमगता दहिया आणि त्यांच्या जवानांनी दहशतवाद्यांशी दोन हात करणं सुरूच ठेवलं होतं. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळ काढला. त्यातल्या एका दहशतावाद्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी दहिया यांच्या छातीत गेली होती. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी दहशतवाद्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. गोळीबारात आणखी दोन गोळ्या त्या वाघाच्या छातीत धडकल्या आणि ते खाली कोसळले. जवानांनी त्यांना वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. मात्र, दगडफेक करणार्‍या जमावाने त्यांची रूग्णवाहिका अडवून ठेवली होती. त्यातच त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि ते आपल्या मातृभूमीचं रक्षण करताना शहीद झाले. या मोहिमेच्या काही मिनिटांपूर्वी दहिया आपल्या वडिलांशी फोनवरून संपर्क साधत होते. अचानक काही काम आल्याचे सांगून त्यांनी फोन ठेवला. मात्र, त्यानंतर त्यांच्या परिवाराल ते शहीद झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या मुलीलाही लष्करात भरती करण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून होते. मात्र, नियतीपुढे काही चालत नाही हे म्हणतात तेच खरं. अशा या लढवय्याला एक सलाम.
 
दि. १४ फेब्रुवारी २०१७, बंदीपुरा जिल्ह्यातील घटना. कडाक्याच्या थंडीत सकाळी ३.३० वाजता अचानक रेडिओवर एक संदेश येतो की, एका गावावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवलायं आणि तिथूनच याची सुरूवात होते. ही गोष्ट आपले शूर जवान चेतन कुमार चिता यांची. पुढे पाय टाकायचीही सोय नाही एवढा बर्फ. पाय टाकला की गुडघ्यापर्यंत बर्फ अशा परिस्थितीत ते आपल्या जवानांसोबत दहशतवाद्यांचा शोध घ्यायला पुढे निघाले. दरम्यान ते दहशतवादी त्या ठिकाणी असलेल्या घरांमध्येच लपल्याची माहिती त्यांना मिळाली. यातच दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात झाली. त्यात आणखी एक संदेश चेतन चिता यांना मिळाला की, आपले काही जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. मात्र, घरात जायचं तर कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. कारण, बाहेरून जरी घर एक दिसत असलं तरी आत अनेक खोल्या होत्या आणि त्यातल्या कोणत्या बाजूने गोळी आपल्या शरीराचा वेध घेईल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. मात्र, आपल्या दहशवाद्यांना यमसदनी पाठवायचं तर होतंच, पण त्यापूर्वी आत अडकलेल्या आपल्या जखमी जवानांना बाहेर काढण्याचं महत्त्वाचं कामत्यांना करायचं होतं. यातच त्यांनी त्या घरात प्रवेश केला. गोळीबार तर सुरू होताच, त्यातच त्यांनी आपल्या सहकारी जवानांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अशातच त्यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नानही घातलं. मात्र, एवढ्यावरच न थांबता आणखी दहशतवाद्यांचाही खात्मा करायचा होता. या परिस्थितीत दहशतवाद्यांच्या गोळीबारात तब्बल १८ गोळ्या चिता यांच्या शरीराला छेदून गेल्या. नऊ गोळ्या बुलेटप्रुफ जॅकिटमध्ये तर नऊ गोळ्या त्यांच्या शरीरात गेल्या होत्या. डोळ्यात, डोक्यात, मांड्यांमध्ये, दोन्ही हातात गोळ्या होत्या. मात्र, चिता हे तरीही लढत होते. परंतु, त्यांच्या हातातली बंदूक आता कमी साथ देत होती. दरम्यान, आणखी जवानांनी उरलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यातच जखमी चिता यांना त्या ठिकाणाहून रूग्णालयात नेण्याचीही धावपळ सुरू झाली होती. पूर्ण लष्कर, सीआरपीएफने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याबर तब्बल १० ऑपरेशन्स करण्यात आली. मात्र, त्यानंतर तीन महिने चिता कोमात होते. त्यात त्यांच्या पत्नीने साथ दिली. त्यांना विश्वास होता की, आपल्या देशवासीयांना क्षणाक्षणाचा आनंद देणार आपला वीर पती असा मध्येच आपल्याला सोडून जाणार नाही. तीन-चार महिन्यानंतर चिता कोमातून बाहेर आले. तब्बल नऊ गोळ्या शरीरात झेलल्यानंतरही तो वीर त्यातून बाहेर आला. एवढ्या मोठ्या घटनेतून ते बाहेर आल्यानंतरही ते आज ते पुन्हा देशसेवेसाठी रूजू होण्यासाठी झटत आहेत. या संपूर्ण प्रकारात त्यांच्या शरीराला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. आज त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला, तर शरीराच्या अन्य भागांमध्येही गोळ्या लागल्याने ते पूर्णपणे यातून बाहेर येऊ शकले नाही. मात्र, एवढ्या यातना सहन केल्यानंतरही ते आजही आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
‘पाण्यातच तुझा मृत्यू होऊ शकतो,’ असं पत्रिकेत लिहिलेलं असतानाही तो युवक नौदलात भरती झाला. बर्फाची चादर ओढलेल्या झेलम नदीच्या किनार्‍यावर तो त्या बर्फाकडे पाहत बसला होता. नौदलाच्या मार्कोसमध्ये तो कमांडो होता. त्यांच नाव म्हणजे कॅप्टन वरूण सिंग. अचानक एक दिवस त्यांना एक संदेश मिळतो की, मुल्लर जवळच्या जंगलात काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. मार्कोसचे आठ कमांडो आपल्या शेकडो जवानांनसह त्यांचा शोध घेण्यासाठी त्या दिशेने निघतात. पूर्ण रात्र ते सर्च ऑपरेशन सुरू राहतं. मात्र, कोणत्याही दहशतवाद्यांचा सुगावाही लागला नाही. मात्र, दुपारच्या वेळी अचानक त्यांच्याकडे एक संदेश येतो की, दहशतवाद्यांनी बांदिपुरावर हल्ला केलाय. त्याचवेळी सिंग यांनी आपल्या मेजर मित्राला एक फोन केला. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी आपल्यालाही मदत करून देण्याची विनंती त्यांनी त्यावेळी केली. त्याचवेळी समोरूनही मार्कोसच्या त्या दोन कमांडोसना पाठवण्याचे आदेशही मिळाले.
 
 
त्यानंतर कॅप्टन वरूण सिंग त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. त्याचवेळी त्यांनी दहशतवादी लपलेल्या घरावर बाजूच्या इमारतीवर जाऊन हल्ला करायचं ठरवलं. त्यांनी आपल्या सहकार्‍याकडचे दोन ग्रेनेड त्या इमारतीवर डागले. इमारत पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्यातच लपलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मारला गेला. मात्र, त्याचवेळी इमारतीच्या मागे असलेल्या एका तबेल्यात एक दहशतवादी ठाण मांडून बसला होता. कोणालाही कल्पना नसताना त्या जवानांपैकी एक जवान त्या दिशेने धावत गेला. त्याने तबेल्याचे दार उघडताच समोरून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला आणि त्यात तो जवान शहीद झाला. गोळ्यांचा आवाज ऐकताच सगळ्या जवानांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी कॅप्टन वरूण सिंग यांनी नेतृत्व करत त्या दिशेने धाव घेतली. त्यांना अचानक त्या जागेवरून दोन दहशतवादी बाहेर धावत येताना दिसले. त्यांनी लगेचच आपण त्या दहशतवाद्यांवर हल्ला करणार असल्याचा संदेश आपल्या सहकार्‍यांना दिला. त्यांनी जसा त्या दहशतवाद्यावर हल्ला केला, त्यांची गोळी थेट त्या दहशतवाद्याच्या शरीराला भेदून गेली. मात्र, त्याचवेळी त्या दहशतवाद्याच्या हातात असलेल्या एके-४७ चा ट्रिगर दाबला गेला आणि प्रत्येक दिशेने त्या गोळ्या बाहेर पडू लागल्या. कोणतीही कल्पना नसलेल्या कॅप्टन सिंग यांच्या दिशेने ती गोळी आली आणि त्यांच्या कंबरेवर असलेल्या ग्रेनेडवर ती आदळली. त्याचवेळी जोरदार धमाका झाला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांचा हात छिनविछिन्न झाला होता. फुफ्फुसांमध्ये छर्रे घुसले होतं, त्यांचं मासही बाहेर आलं होतं. त्याचवेळी त्यांच्यापैकी काही जवानांना ते शहीद झाल्याचा संशय आला. मात्र, समोरून आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय असल्याची माहिती मिळाली आणि रॉकेट ग्रेनेड डागण्याचे आदेश समोरून देण्यात आले. त्यांचे सहकारी वरूण सिंग यांच्या दिशेने धावत येतात तेव्हाच ते दोन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहितीही त्यांना मिळाली. त्याचवेळी त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केलं. त्यांची परिस्थिती पाहून डॉक्टरांनीदेखील हात टेकले. केवळ त्यांचं जीव नसलेलं शरीरच आणल्याचं त्यांना काही वेळासाठी भासलं. मात्र, त्यांच्यावर एक नाही दोन नाही, तब्बल पन्नास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तब्बल साडेतीन वर्षं ते आपल्या जीवनाशी झुंज देत होते. पण म्हणतात ना, दैव बलत्तर तर कोणीही काही करू शकत नाही. तसंच काहीसं त्यांच्याबाबत घडलं. २००७ साली त्यांनी पुन्हा नौदलाचा गणवेश धारण केला आणि देशसेवा करण्यासाठी पुन्हा नौदलात रूजू झाले. त्यांच्या या कर्तृत्वाला मानाचा सलाम.
 
 
 
जयदीप दाभोळकर
@@AUTHORINFO_V1@@