'तांडव' : धर्मांध वादळात उद्ध्वस्त धर्मशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2018   
Total Views |

 


एक शांत जलाशय. तो आपल्या पोटात असंख्य जीव नांदवतोय. एक जीव दुसऱ्यावर अवलंबून. ते जीव सखे असतातच असं नाही पण सोबती नक्कीच असतात. न जाणो किती युगं तो जलाशय तसाच निवांत आहे. जणू त्याला बाहेरच्या कुठल्याच गोष्टीची पर्वा नाहीये. अचानक क्षितिजावर काळे ढग जमा होऊ लागतात. बघता बघता त्यांना आणखी कुमक येऊन मिळते आणि येऊन ठेपतं एक घनघोर वादळ. आख्खा आसमंत कोंदून टाकणारं, सारा जलाशय ढवळून टाकणारं... हे वादळ वेगळं आहे, अभूतपूर्व आहे, अटळ आहे. याने जलाशय नुसता गढूळ होत नाही. तो लालभडक होऊन जातो. एकदा आलेलं ते वादळ निघून जात नाही. तिथेच मुक्काम ठोकतं. हे कसलं वादळ, हा तर युगांतच जणू ! साऱ्या दिशा बदलून गेलेल्या, सारी मुळं उखडलेली आणि आधारासाठी नव्याने जवळ केलेली गोष्ट आधार द्यायला अपुरी अशी त्रिशंकू अवस्था. एका देखण्या चित्राचं विस्कटून जाणं पाहताना मन विषण्ण होऊन जातं.
हे आहे पंधराव्या शतकातल्या गोव्याचं चित्र. कुणाच्या अध्यातमध्यात नसलेली निसर्गाच्या कुशीत वसलेली गावंच्या गावं पोर्तुगीजांसोबत आलेलं गोव्यात आलेल्या धर्मवादळाने हादरून गेली. पाशवी बाळाचा वापर करून तिथल्या सत्ताधीश पोर्तुगीजांनी गोव्यात सक्तीने धर्मांतरं घडवून आणली. तो सर्व इतिहास ‘Goa Inquisition (लेखक : आ. का. प्रियोळक्रर) सारख्या अनेक ग्रंथांमधून मांडला गेला आहे. घटनांचे तपशील आणि त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेणं या गोष्टी इतिहासकार करत असले तरी त्या घटना घडत असताना त्यातल्या पात्रांचे परस्पर संबंध, त्यांच्या मनोवस्था, त्यांच्या प्रतिक्रिया या गोष्टी लेखकाला खुणावत असतात. गोव्यातल्या धर्मांधतेच्या नंग्या नाचाने जगण्याचे संदर्भच बदलून गेलेल्या आयुष्यांचा एका प्रतिभावान लेखकाने घेतलेला वेध म्हणजे म्हणजे ‘तांडव’ ही कादंबरी.
कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे आदोळशी गाव. बारा बलुतेदारांच्या खांद्यांवर तोलून धरलेलं कुठल्याही इतर गावासारखंच हे गाव. शेती किंवा आपापले उद्योग करावेत आणि रोजच्यारोज न चुकता भाजीभाकर मिळावी यापलीकडे गावकऱ्यांच्या वेगळ्या महत्वाकांक्षा नाहीत. या गोवा प्रांतावर निजामशाहीचे राज्य असले तरी इथल्या लोकांच्या आयुष्यावर त्याचा फार काही परिणाम झालेला नाही. त्या बादशाहीच्या लोकांनीही इथे फार काही घडवण्याबिघडवण्यात रस दाखवलेला नाही. पण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला हा गोवा प्रांत निजामाकडून पोर्तुगीज जिंकून घेतात. आपल्या कारभारातून जनतेला आपलसं करावं वगैरे सदाचार त्यांना मान्यच नसतो. त्यांना माहिती असते ती एकच गोष्ट, ती म्हणजे ‘आमच्या राजाचा जो धर्म आहे तोच यच्चयावत प्रजेचा धर्म असायला हवा’ आणि जर प्रजेचा धर्म जर ख्रिश्चन नसेल तर तो तसा होण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करणे वावगे नाही. त्यामुळेच गोव्यात सर्वत्र सुरू होतात पोर्तुगीजांचे धर्मश्रेष्ठत्वाचे फुत्कार आणि घुत्कार. आदोळशी गाव त्यापासून दूर कसं राहिल ? सगळ्यात पहिला घाव बसतो तो गावातल्या वेताळाच्या देवळावर. सैनिकांच्या हातातल्या तलवारी आणि बंदुका पाहून भयभीत झालेल्या गावकऱ्यांपैकी एकही जण त्यांना अडवायला येत नाही. “देव तुमचं वाटोळं करेल” असं म्हणून दूषणं देणारे लोक नुसतेच बोलभांड आहेत आणि त्यांच्यात काहीही धमक नाही हे लक्षात आल्यावर पोर्तुगीज सोजीरांना आणखीनच चेव चढतो. ते चक्क देव उखडून टाकलेल्या त्या देवळातच तळ ठोकतात. सोबत पाद्रीही पावलू कुलासू आपला धर्म गावकऱ्यांवर लादण्यासाठी सज्ज असतोच! मंदिरांचा नाश, दारोदारच्या तुळशी वृंदावनांना उखडून टाकणे, हिंदू उत्सव-प्रथा- परंपरा बंद करून टाकणे अशा थेट धार्मिक आस्थांना भग्न करण्यासोबतच अनाथांना राज्यकर्त्याच्या (म्हणजेच पर्यायाने ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या) स्वाधीन करणे, गावच्या पंचायतीत ख्रिश्चनांना सर्वात महत्वाचे स्थान देणे, जमिनी ताब्यात घेऊन धर्मांतरीत झालेल्यांनाच परत करणे अशी प्रशासकीय नाकेबंदीही पोर्तुगीज करून टाकतात. राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून इतके क्रूर डाव टाकत जातात की गावकऱ्यांना ख्रिश्चन झाल्याशिवाय जगणंही मुश्कील व्हावं ... आता सुरू झालेला असतो एक न संपणारा प्रवास.... जो पुढची चारशे वर्षं चालूच राहणार असतो. उपाय तीनच गोष्टी यातून सुटका करू शकणार असतात.. हिंदू धर्म सोडणे, गाव सोडणे किंवा .... जगणं सोडणे! जे लोक धर्म सोडतात त्यांचीही सुटका नसतेच. ख्रिश्चन झाल्यावर जर चुकून जरी हिंदू धर्मातली एकजरी परंपरा पाळली किंवा नव्या धर्माचा अपमान झाला तर इन्क्विझिशनच्या क्रूर शिक्षांना सामोरं जावं लागणार. म्हणजे पुन्हा जगणंच सोडणं...
  
कादंबरीला तसं मोठं कथानक नाही. तरीही कादंबरीचा पट मोठा भासतो कारण लेखकाने धर्मसंकटात सापडलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या प्रत्येक शक्यतेला शब्दरूप देऊन त्यांवर प्रसंग रचलेले आहेत. धाकातून, निराशेतून, स्वार्थातून, दुःखातून, अविचारातून, चिंतेतून, नाईलाजातून, द्वेषातून परधर्म स्वीकारणारी माणसं इथे आपल्याला पानोपानी भेटतात. दुसऱ्या धर्मात जाऊनही जीवाची तगमग शांत न झालेले अस्वस्थ आत्मे दिसतात. जुन्या धर्मातलं काय गमावलं आणि नव्या धर्मातलं काय हाताशी लागलं याचा हिशोब कर्माच्या चोपडीत लिहू पाहणारे पण प्रत्यक्षात एकही अक्षर उमटवू न शकणारे संभ्रमी जीव दिसतात. किमान देवाला तरी या दुष्टचक्रातून बाहेर काढूयात म्हणून देवासह परागंदा झालेली माणसं दिसतात. आपण ख्रिश्चन झाल्यावर एका क्षणात दुरावलेली जुनी माणसं आणि ती दुरावलेली माणसं पुढे स्वतःच ख्रिश्चन झाल्याने पुन्हा जवळ आल्याचे चमत्कारिक प्रसंगही दिसतात. श्रद्धेने धर्मपालन करणाऱ्या जीवांच्या भावविश्वात एका लादल्या गेलेल्या धर्मामुळे जी जी म्हणून उलथापालथ होऊ शकते ती ती सगळी आपल्यासमोर लेखकाने ठेवली आहे. एका लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार किती दिशांना, किती आशा-निराशांना कवेत घेऊ शकतो याचा प्रत्यय ‘तांडव’ वाचताना येतो.
पुस्तकाचे लेखक महाबळेश्वर सैल हे खरंतर स्वतःला नास्तिक आणि निधर्मी मानणारे आहेत. पण असं असतानाही त्यांनी सश्रद्ध मनांच्या तगमगीचा जो खोल वेध घेतला आहे तो स्तिमित करणारा आहे. धर्मांतरित होत असताना आपल्याच मुळांवर आपणच घाव घालणाऱ्याच्या मनात उसळणाऱ्या लाटा शब्दाशब्दातून ऐकू येतात.... ज्या देवाचं कधी नावही ऐकलं नव्हतं त्याचं धर्मांतरित झाल्यानंतर नक्की काय करायचं हे न समजल्याने झालेली त्रिशंकू अवस्था महाबळेश्वर सैल यांनी अतिशय नेमकेपणाने मांडली आहे आणि हे करत असतानाच त्यांनी बोट दाखवलं आहे काही खूप मोठ्या विरोधाभासांकडे. आपल्या प्रेमळ आचरणातून येशूच्या शांततेचा संदेश देणारा पाद्री सिमोंव पेरीस विरुद्ध त्याच येशूच्या नावाखाली दुसऱ्यांना आयुष्यातून उठवणारा धर्मांध पाद्री पावलू कुलासू नि अत्यंत कडवा बाटगा शेफ रिबेर यांच्यातला विरोधाभास हा संपूर्ण कथानकात उठून दिसतो. त्याचसोबत दुसरा विरोधाभास आहे तो हिंदू समाजातलाच. एकीकडे देव, धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गावकऱ्यांच्या आयुष्यात अनेक खुळचट धारणा ठाण मांडून बसल्या आहेत. ख्रिश्चनांच्या नुसत्या स्पर्शाने आणि त्यांचं उष्टं खाल्ल्याने बाटल्या गेल्याच्या मूर्ख समजुतींमुळे किती आप्तेष्टांना आपण आपल्यापासून तोडून टाकलं याचा हिशोबच लागत नाही. शिवाय जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकारातून समाजातल्या अनेक घटकांना कसं दूर लोटलं याबद्दलही परखड भाष्य कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळेच फाटाफुटीच्या शोधात असणाऱ्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांचं फावलं, हेही लेखक अधोरेखित करतो.
 
कादंबरीत दोनच गोष्टी खटकल्या. चारशेहून अधिक वर्षं पोर्तुगीजांनी गोव्यात साम-दाम-दंड-भेद या उपायांनी धर्मप्रसार करूनही गोवा पन्नास टक्केसुद्धा ख्रिश्चन होऊ शकला नाही हे वास्तव आहे. याचं कारण अर्थ तिथे हिंदुधर्माभिमानी शक्ती सतत जागृत राहिल्या. पण संपूर्ण कादंबरीत पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मप्रसारकाविरुद्ध उभी ठाकलेली एकही व्यक्तिरेखा आढळत नाही. आदोळशी हे गाव गोव्याचं हे चित्र प्रातिनिधिक आहे असं मानलं तर अशा व्यक्तिरेखेचा अभाव हे गोव्याच्या वास्तव परिस्थितीशी हे विपरीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कादंबरीचा शेवट. धर्माघाताने उन्मळून गेलेल्या अनेक व्यक्तिरेखांची कर्मकहाणी सांगणाऱ्या कादंबरीतल्या इतर अनेक प्रसंगांसारखाच हा प्रसंग आहे. तो ना आधीच्या प्रसंगांपेक्षा काही वेगळा ठसा उमटतो ना त्यातून लेखकाने उपसंहार म्हणून काही विशेष टिप्पणी आहे. त्यामुळे शेवट एक अपुरा अनुभव देऊन जातो. अर्थात या गोष्टींमुळे कादंबरीचे मूल्य कमी होत नाही.

'तांडव' ही एक कादंबरी असली तरी ती वास्तवाच्या भक्कम पायावर उभी आहे. त्यातली पात्रं काल्पनिक असतील, पण प्रेरणा काल्पनिक नाहीत हे कादंबरीच्या शेवटी असणाऱ्या संदर्भ ग्रंथांच्या यादीवरून दिसून येतेच. 'उत्तम कलाकृती वाचकाला अस्वस्थ करते' या उक्तीला पुरेपूर जगणारी ही कादंबरी आहे आणि तिच्यावर चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या विलक्षण बोलक्या मुखपृष्ठाने कळस चढवला आहे. कादंबरीची पानं उलटत असताना आपल्याच आप्तांच्या जाणिवांचे, श्रद्धांचे, विश्वासाचे, अवघ्या अस्तित्वाचे नुसते उसवलेलेच नव्हे तर पार उखडून टाकले गेलेले धागे बघून खिन्न-सुन्न होत जाणारं मन एकच गोष्ट म्हणत म्हणत राहतं - "अशी वेळशत्रूवरही येऊ नये"

पुस्तक : तांडव
लेखक : महाबळेश्वर सैल
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३७३
किंमत : ३०० रू.
आवृत्ती : पहिली (२०१२)

- प्रसाद फाटक  
@@AUTHORINFO_V1@@