थरूर यांचे आभासी हिंदुपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018   
Total Views |


हिंदू हा अनेक देवता मानणारा, वेगवेगळी तत्त्वज्ञाने मानणारा, वेगवेगळ्या आचारपद्धती मानणारा, समाज आहे. शशी थरूर यांनी आपल्या पुस्तकातील पहिल्या भागात हा सर्व भाग उत्तम तर्‍हेने आणला आहे. शशी थरूर यांना अशा प्रकारचे पुस्तक आताच लिहावे असे का वाटले? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
 
 
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘‘मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे.’’ असे म्हटलेले जर तुमच्या वाचनात आले, तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित आश्र्चर्य वाटेल. शशी थरूर यांचे Why I Am A Hindu हे पुस्तक वाचून मीदेखील आश्र्चर्यचकित झालो. शशी थरूर यांचे पुस्तक कांचा इलय्या यांच्या पुस्तकाला उत्तर देणारे नाही. शशी थरूर यांनी धाडसाने आणि गर्वाने म्हटले की, ‘‘मी हिंदू आहे, आणि याचा मला अभिमान आहे.’’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चक्क गणपतीचे चित्र आहे आणि पुढे पुजेचे ताट आहे.


दिवसेंदिवस कमी होत जाणार्‍या अभ्यासू आणि लेखक राजकारणी मंडळीत शशी थरूर हे आपल्या पुस्तकांमुळे उठून दिसतात. शशी थरूर यांचे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे, त्यात भरपूर संदर्भ आहेत, भाषा ओघवती आणि सोपी आहे. सामान्य इंग्रजी ज्ञान असलेला वाचकदेखील हे इंग्रजीतील पुस्तक वाचू शकतो. शशी थरूर यांच्या पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांनी वेदकाळापासून ते महात्मा गांधीजींच्या काळापर्यंतचा हिंदू प्रवासाचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात याज्ञवल्क्य, चार्वाक, उपनिषदातील अनेक ऋषी, भगवान गौतमबुद्ध, भक्ती चळवळीतील अनेक संत, राजा राममोहन राय ते विवेकानंदांपर्यंतच्या आधुनिक काळातील थोर महात्मे यांची आपल्याला भेट होत जाते. ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या करता येत नाही, ती भौगोलिक संज्ञा आहे, ती एक जीवनपद्धती आहे आणि विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे सत्य एक आहे आणि त्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत, म्हणून सर्वच धर्म सत्य आहेत. या पद्धतीत जगणार्‍याला ‘हिंदू’ म्हणायचे. सेमेटिक धर्मात येणारे जुडाईझम, ख्रिश्र्चानिटी आणि इस्लाम, एक ग्रंथ, एक प्रेषित, एक देव, आणि एक आचार पद्धती मानणारे धर्म आहेत. हिंदू धर्माचे स्वरूप असे नाही. हिंदू हा अनेक देवता मानणारा, वेगवेगळी तत्त्वज्ञाने मानणारा, वेगवेगळ्या आचारपद्धती मानणारा, समाज आहे. शशी थरूर यांनी आपल्या पुस्तकातील पहिल्या भागात हा सर्व भाग उत्तमतर्‍हेने आणला आहे. शशी थरूर यांना अशा प्रकारचे पुस्तक आताच लिहावे असे का वाटले? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. २०१४च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. पराभवाची मीमांसा करताना ए. के. ऍन्टोनी यांनी असे मत नोंदविले की,‘‘कॉंग्रेस पार्टी हिंदूविरोधी पार्टी आहे, असे हिंदूंचे मत झाले.’’ हे मत बदलणे आवश्यक झाले. राहुल गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मंदिराना भेटी देण्याचा सपाटा लावला. कॉंग्रेसच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, ‘‘राहुल गांधी जानवेधारी ब्राह्मण आहेत. आम्ही हिंदुविरोधी नाही, हिंदू आस्थांच्या विरोधी नाही.’’ हे राहुल गांधी आपल्या कृतीने दाखवून देण्याचा प्रयत्न करीत होते. या कृतीला तत्वज्ञानाची बैठक देण्याचे कामशशी थरूर यांच्या पुस्तकाने केले आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘‘मी कॉंग्रेसी आहे, पंडित नेहरू यांचा भक्त आहे, तरीदेखील मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे,’’ हेे थरूर यांना सांगायचे आहे.


परंतु, एवढेच सांगून पुस्तक लिहिण्याचा राजकीय हेतू सफल होत नाही. हिंदू जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात शिवसेना या दोन पक्षांना हिंदू हिताची चिंता करणारे पक्ष ठरवून टाकलेले आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर, ही हिंदुत्त्वाची ‘स्पेस’ कॉंग्रेसलादेखील हवी आहे. ती ‘स्पेस’ मिळवायची असेल तर आमचे ‘हिंदुपण’ कसे बावनकशी आहे आणि बाकीच्यांचे कसे अशुद्ध आहे, हे सांगणे ओघाने आले. पुस्तकाच्या दुसर्‍या भागाचे शीर्षक आहे, ‘पॉलिटीकल हिंदुइझम’. या भागात शशी थरूर यांनी हे कामकेले आहे. भाजपचे हिंदुत्त्व संकुचित आहे, असहिष्णू आहे, उदारमतवादी नाही, हिंदू धर्माला ते असहिष्णू धर्म बनू पाहतात, सेमेटिक धर्माप्रमाणे आपल्या पद्धती दुसर्‍यांवर लादण्याचा प्रयत्न करतात, भाजपचे हिंदुत्त्व विवेकानंद आणि गांधीच्या हिंदुत्त्वापेक्षा वेगळे आहे आणि ते देशाच्या ऐक्याला मारक आहे.


विद्वान लेखक आपले मत सिद्ध करण्यासाठी काही आधार घेतात. थरूर यांनी सावरकर, गोळवलकर, आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या लेखानातील काही उतारे पुस्तकात दिलेले आहेत. या उतार्‍यावरून त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की, संघ-भाजपचे हिंदुत्त्व/हिंदू धर्म अत्यंत संकुचित असून तो वेदकाळापासून चालत आलेल्या परंपरेला छेद देणारा आणि देशात अस्थिरता निर्माण करणारा आहे. थरूर यांनी दिलेली सर्व अवतरणे, याविषयाचे वाचन करणार्‍या मराठी वाचकांना नवीन नाहीत. मराठी भाषेत अशा लिखाणाचे अमाप पीक आहे. लेखक जेव्हा आपली ठरलेली मते सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारचे उतारे शोधतो, तेव्हा ते अनेक वेळा संदर्भहिन असतात, कालबाह्य असतात आणि हेतूत: निवडलेले असतात. उदा- ‘‘गोळवलकर गुरूजी यांचे, ‘वुई’ हे पुस्तक संघात कुणी वाचत नाही, संघाच्या अधिकृत वाड्‌ःमयात त्याचा अंतर्भाव केला जात नाही. सम्रग गुरूजींचे बारा खंड प्रकाशित झालेले आहेत, या खंडात त्याचा समावेश नाही. १९३३च्या सुमारास प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे आणि त्याला काळाचेही भरपूर संदर्भ आहेत. अशा संदर्भहिन पुस्तकाचा, युक्तिवाद करण्यासाठी उपयोग शून्य असतो. हेच दोष सावरकर आणि दीनदयाळ यांच्या बाबतीत दाखविता येतात.’’


कॉंग्रेसला हिंदुपणाचा बाज देण्याचा थरूर यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी दुसर्‍याला लहान ठरवून आपण मोठे होत नसतो. समोरच्याला ‘काळा’ म्हटल्याने ‘मी गोरा आहे,’ असे होत नाही. गोरेपण अंगभूत असावे लागते. शशी थरूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला तर हिंदू जनतेने संघ आणि भाजपला आतापर्यंत कचर्‍याच्या टोपलीत टाकून द्यायला पाहिजे होते. पण, उलटे झाले आहे. हिंदूंनी त्यांना डोक्यावर घेतले आहे. सामान्य हिंदू हा सर्वसमावेशक हिंदू असतो. तो कधीही संकुचित विचार करत नाही. ‘माझ्यासारखा दुसरा’ या भावनेने तो इतरांशी वागत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचा दूराग्रह किंवा अतिवाद सहन होत नाही आणि सामान्य हिंदूची ही मनोवृत्ती बदलण्याचे सामर्थ्य ना संघात आहे ना भाजपत आहे. असा सामान्य हिंदू, डोक गहाण ठेवून, संघ आणि भाजपला जवळ करीत नाही. त्याच्या भावभावनांशी जेव्हा संघ-भाजपचे कार्यकर्ते एकरूप होतात, तेव्हा त्याला त्या संघटना आपल्या वाटू लागतात. त्यामुळे आपल्या लेखनात समाजाच्या या मानसिकतेकडे शशी थरूर यांनी काहीही लक्ष दिलेले नाही. नरेंद्र मोदी यांना हिंदू समाजात सर्वाधिक लोकप्रिय करण्याचे कामकॉंग्रेसनेच केले. ज्या कारणासाठी मोदींना शिव्या घालण्यात आल्या, ‘मौत का सौदागर’ ठरविण्यात आले, हिटलरचा भाऊ ठरविण्यात आले, ती कारणे हिंदू समाजाला कमालीची अन्यायकारक वाटली. आपल्या हितासाठी प्राणाची बाजी लावणारा हा वीर आहे, असे हिंदूना वाटले. शशी थरूर पुन्हा तीच चूक करू इच्छितात. हिंदू, हिंदू धर्म, हिंदू चालीरिती, हिंदुत्त्व, याविषयी जेवढा नकारात्मक प्रचार होईल, तेवढे भाजपचे बळ वाढत जाईल. कॉंग्रेसला खरी गरज आपले उदारमतवादी हिंदुत्त्व आपल्या व्यवहारातून, नेत्यांच्या भाषणातून आणि पक्षाच्या धोरणातून, व्यक्त करता आले पाहिजे. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्यायचा आणि राज्यसभेत विरोध करायचा, ही तुष्टीकरण नीती कॉंग्रेसचे हिंदुत्त्व असली की नकली, हे दाखविणारी असते. अयोध्येचा खटला आता स्थगित करावा आणि २०१९ नंतर चालवावा, असे जेव्हा कॉंग्रेसतर्फे कोर्टात सांगितले जाते, तेव्हा मंदिरभेटी या धूळफेक आहेत, हे सामान्य हिंदूंच्या लक्षात येते. कथनी आणि करनी याच्यात एकवाक्यता कॉंग्रेसने ठेवायला पाहिजे. ज्याचा गर्व करावा, असे व्यावहारिक विषय थरूर यांनी शोधून काढावे आणि त्याचा आग्रह कॉंग्रेसने धरावा, त्याचा राजकारणात जरूर फायदा होईल.


यासाठी कॉंग्रेसने गांधी-हिंदुत्त्वाचा आधार घ्यायला पाहिजे. महात्मा गांधी यांचे नाव अविभाज्यपणे कॉंग्रेसशी जोडले गेले आहे. गांधीजींनी हिंदूंच्या धर्मांतरास प्रखर विरोध केला. मिशनरी करत असलेले धर्मांतर त्यांना अजिबात मान्य नव्हते. गायीचे रक्षण झाले पाहिजे, असा त्यांचा नेहमीच आग्रह असे. सार्वजनिक कामकरीत असताना एकादश व्रतांचे पालन केले पाहिजे, असे ते सांगत. या एकादश व्रतात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अनाशक्ती, नित्यकर्म, इत्यादी व्रतांचा समावेश होतो. गांधीजींनी ग्रामस्वराज्यावर भर दिला. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असले पाहिजे, असे ते सांगत. गावाच्या गरजा गावातच भागविल्या गेल्या पाहिजेत. त्यांची ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी करणारी आहे. गांधीजी रामनामाचा आग्रह धरीत. रामत्यांच्या दृष्टीने केवळ दशरथपुत्र रामनसून रामहे सत्याचे दुसरे नाव आहे. राम, सत्य, अहिंसा म्हणजेच धर्म, ही गांधीजींची धारणा होती. यापैकी कॉंग्रेस काय स्वीकारणार आहे? संघ आणि भाजपवर टीका करून त्यांचे हिंदुत्त्व बेगडी आहे आणि आमचे हिंदुत्त्व अस्सल आहे, असे सांगत राहिल्याने, त्यावर कोण विश्र्वास ठेवणार? पाणी आणि पाण्याचा आभास, यात फरक असतो. पाणी तहान भागविते आणि आभास फसवणूक करते. थरूर यांच्या हे लक्षात येत नसेल तर त्यांना पुस्तकी विद्वान म्हणायला हरकत नाही.
 
 
- रमेश पतंगे 
@@AUTHORINFO_V1@@