कमल हसन यांचा नवा राजकीय पक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
दक्षिणेतील सुप्रसिद्ध व प्रतिभावंत अभिनेता कमल हसन यांनी अखेर बुधवार २१ फेब्रुवारी रोजी राजकीय क्षेत्रात अधिकृतपणे पदार्पण केले आणि नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचे नाव आहे-मक्कल नीधि मैअम. याचा तामीळ भाषेत ढोबळ अर्थ आहे- जनतेच्या न्यायाचा मंच. कमल हसन यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि ध्येयधोरणेही घोषित केली आहेत. भारतीय राजकारणात आणि विशेषत: तामिळनाडूच्या राजकारणात ही धक्कादायक घटना म्हणता येणार नाही. कारण, आपण राजकीय पक्ष स्थापन करणार, हे बऱ्याच आधीपासून कमल हसन यांनी जाहीर केले होते. आता फक्त त्यांनी तशी अधिकृत घोषणा केली एवढेच.
 
तामिळनाडूच्या राजकारणाला, भारतीय संदर्भात एक वेगळे स्थान आहे. या राजकारणाला आर्य-द्रविड वंशामधील कथित संघर्षाची किनार आहे. भारतात द्रविड हेच मूलनिवासी होते. नंतर आर्य बाहेरून आले आणि त्यांनी द्रविडांचा पराभव करून त्यांना मागे रेटत रेटत दक्षिण भारतापुरते मर्यादित केले, असा एक कपोलकल्पित आणि ब्रिटिशांनी हेतुपुरस्सर पेरलेला सिद्धांत, या आर्य-अनार्य संघर्षाचा आधार आहे. आम्ही वेगळ्या वंशाचे असल्यामुळे द्रविडांचा वेगळा देश असला पाहिजे, या भावनेतून काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत फुटीरतावादी चळवळही चालली होती. आता ती शांत झाली असली तरी तिची विषबीजे सुप्तावस्थेत कायम असतीलच, यात शंका नाही. तामिळनाडूतील राजकीय पक्ष स्वत:ला द्राविडी पक्ष म्हणवून घेतात. पक्ष कुठलाही असो, तो या द्राविडी विचारधारेवरच फळला-फुलला आहे. व्यक्तिगत अहंकार आणि हेवेदावे यांच्या आधारावरच तिथे आज जे काही विविध राजकीय पक्ष दिसतात, ते याच आधारावर निर्माण झाले आहे.
 
तामिळनाडूतील आजच्या सर्व द्राविडी पक्षांचे मूळ असलेला द्रविडार कळघम हा पक्ष पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांनी १९२५ साली स्थापन केला होता. तत्पूर्वी पेरियार काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये द्रविड भावनांचा सन्मान होत नाही, म्हणून पेरियार यांनी, १९१६ साली स्थापन झालेल्या जस्टिस पार्टीशी विलय करून द्रविडार कळघम पक्ष स्थापन केला. १९४९ साली सी. एन. अण्णादुराई यांनी द्रविडार कळघम पक्षातून बाहेर पडून द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. १९७२ साली द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी सत्तेत असताना, प्रसिद्ध अभिनेते व राजकीय कार्यकर्ते एम. जी. रामचंद्रन् यांनी, द्रमुक पक्ष फोडून आपला स्वत:चा अण्णाद्रमुक पक्ष स्थापन केला. अशा रीतीने तामिळनाडू राज्यातून काँग्रेस पक्ष कायमचा सत्तेबाहेर फेकला गेला आणि राज्याची सत्ता आलटून पालटून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांच्या हातात येत गेली. द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षांचे सर्वेसर्वा नेते अनुक्रमे एम. करुणानिधी व एम. जी. रामचंद्रन हे होते. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांची प्रेयसी जयललिता यांनी अण्णाद्रमुक पक्षाची सूत्रे यशस्वी रीतीने सांभाळली.
 
गेल्या वर्षी जयललिता यांचे निधन झाले. तसेच द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी वार्धक्यामुळे सध्या गलितगात्र आहेत. एकप्रकारे राजकीय पोकळी निर्माण झालेल्या या राज्यात, नव्या राजकीय समीकरणाच्या उदयाची शक्यता निर्माण झाली. ही संधी साधून दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली. तिकडे कमल हसन यांनीही ही राजकीय पोकळी भरून काढण्याची तयारी केली. चित्रपटातील अभिनेत्यांनी राजकारणात येऊन यशस्वी पाळी खेळण्याची तामिळनाडूची परंपराच आहे. अभिनेता विजयकांत यांचा पक्ष, वायको यांचा पक्ष हेही रिंगणात आहेतच. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण सध्यातरी धूसर झालेले आहे. रजनीकांत यांनी अजूनही आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केलेली नाही. कमल हसन यांनी मात्र त्यात बाजी मारली आहे. कमल हसन यांनी आपल्या पक्षाची विचारसरणी कशी असेल, याचे संकेत वेळोवेळी दिलेले आहेत. तामिळनाडूत असे मानले जाते की, ख्रिश्चन मिशनरीज्, कम्युनिस्ट मंडळी कमल हसन यांच्या मागे आहेत. कमल हसनच्या माध्यमातून एकेकाळी बऱ्यापैकी जनाधार असलेले कम्युनिस्ट पक्ष, तिथे आपला पुन्हा जम बसविण्याच्या खटाटोपात आहेत. पडद्यामागच्या या हालचाली कालपरत्वे हळूहळू उघड होतीलच. थकलेल्या नेतृत्वाचा द्रमुक आणि नेतृत्वहीन अण्णाद्रमुक यांच्या पृष्ठभूमीवर कमल हसन यांचा पक्ष यशस्वी होईल का, यासंबंधी मतमतांतरे व्यक्त होत आहेत. बहुतेकांची प्रतिक्रिया सावध आहे. निवडणुकीतील यश हीच यशाची मोजपट्टी असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
 
तामिळनाडूच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास असणाऱ्या एका विश्लेषकाचे म्हणणे आहे की, कमल हसन यांची ही राजकीय खेळी एक संकटच ठरणार आहे. समाजातील कुठला गट त्यांचा आहे, हे कळायला मार्ग नाही. रामनाथपुरम् आणि रामेश्वरम् येथील जनतेला चित्रपटातील अभिनेते जवळून बघण्याची संधी क्वचितच मिळते. त्यामुळे या दोन ठिकाणी कमल हसन यांना बघण्यासाठी जी गर्दी जमा झाली त्यावरून निष्कर्ष काढण्याची घाई करता येणार नाही. कमल हसन यांच्याऐवजी, अजित, विजय किंवा सूर्या हे अभिनेते असते तर कदाचित याहूनही अधिक गर्दी गोळा झाली असती. कमल हसन यांच्याभोवती जी गर्दी गोळा झाली ती त्यांच्या प्रशंसकांची होती, असे या विश्लेषकाचे मत आहे.
 
या विश्लेषकाचे निरीक्षण आहे की, कमल हसन यांच्या प्रशंसकांमध्ये ‘हिंदु’ धर्मावलंबियांचे प्राबल्य आहे. परंतु, मागील काही हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे कमल हसन यांनी आपली ही व्होट बँक बरीचशी गमविली आहे. कमल हसन म्हणाले की, मी पेरियारिस्ट, द्रविडीयन व नास्तिक आहे. या तिन्ही विचारसरणीचे बहुतेक सर्व लोक द्रमुक, अण्णाद्रमुक व अशाच इतर पक्षांशी आधीच जुळलेले आहेत आणि ही मंडळी कमल हसनला मत देण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्वत:ला ‘उगला नयगन’ (लोकनायक) म्हणवून घेणारा कमल हसन जास्तीत जास्त, तामिळनाडू राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात दिवसेंदिवस संकुचित होत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचा मुखवटा होऊ शकतो.
 
कमल हसन यांनी रामेश्वरम् येथे कोळी समाजाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, मी श्रीलंका सरकारबाबत असलेल्या तुमच्या सर्व समस्या सोडविणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून द्रमुक व अण्णाद्रमुक पक्षांना ज्या समस्या सोडविता आल्या नाहीत, त्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या कमल हसन कशा काय सोडविणार, हे बघावे लागेल. दक्षिण भारतीय मासेमार कल्याण संस्थेचे अध्यक्ष जयपालयन् म्हणाले की, ४० वर्षे झालीत कमल हसन या समस्यांवरील तोडगा घेऊन कधी आले नाहीत. मुळात, त्यांना या समस्या काय आहेत, हे तरी माहीत आहे काय? तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षा सौंदरराजन् म्हणाल्या की, कमल हसन व त्यांचा पक्ष काही दिवस बातम्यांमध्ये राहतील. परंतु, त्यापुढे काही प्रगती होईल असे दिसत नाही. काही दिवसांनी लोक कमल हसन व त्यांचा पक्ष विसरून जातील.
 
कमल हसन यांचे प्रशंसक त्यांना ‘नम्मावर’ (आमचा माणूस) म्हणत आहेत. मीडियात बातम्या आला आहेत की, कमल हसन यांना अर्थसाह्य, मिशनरीज्च्या विविध संघटना, चीन व पाकिस्तान यांच्याकडून मिळत आहे. या सर्व पृष्ठभूमीवर कमल हसन यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. रजनीकांत यांचाही राजकीय पक्ष स्थापन झाला की, त्याला आणखी वेगळे वळण मिळणार आहे. त्यामुळे तामिळनाडूतील राजकीय अस्थिरता अजून काही वर्षेतरी कायम राहणार. पण त्यानंतर हे राज्य, द्राविड राजकारणाचाच शेला धरून राहणार की, राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होणार, हे आजच सांगता येणार नाही.
रामेश्वरम् ते मदुराई दरम्यानच्या रोड शोमध्ये कमल हसन लोकांना सांगत होते, ‘‘आता यापुढे मी अभिनेता नाही. मला तुमच्या घरातील प्रकाश बनायचे आहे.’’ द्राविड राजकारण आणि विचारधारा यामुळे तामिळनाडूत निर्माण झालेला अंधकार, कमल हसनरूपी नवा प्रकाश दूर करू शकेल काय, हे मात्र येणारा काळच सांगू शकेल...
@@AUTHORINFO_V1@@