उपयोग - वादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


प्रवास करताना हमखास, समोर धावणाऱ्या वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये, खूप छान वेळ घालवतात आपला. सर्व प्रकारचे, सामाजिक, राजकीय, उद्बोधक आणि कधी कधी वैयक्तिक साहित्य प्रकार वाचायला मिळतात आपल्याला. एकदा एका वाहनाच्या मागे स्त्री भृणहत्येच्या विरोधात लिहिलेल्या वाक्याने खूप विचार करायला लावला मला. मुलगी जन्माला आलीच नाही तर भविष्यात तुमच्या मुलाला पत्नी कशी मिळेल? तुमचा वंश कसा वाढेल? असं काहीसं त्या जाहिरातीत लिहिलं होतं. काहीतरी खटकलं मनाला ! म्हणजे जर एखादी मुलगी जन्माला आली पण कोणाची पत्नी नाही झाली किंवा आई नाही होऊ शकली तर तिचा जन्म व्यर्थ मानायचा का? तुमच्या मुलाला पत्नी मिळावी, तुमचा वंश पुढे चालू राहावा म्हणून (तरी ) मुली जन्माला आल्या पाहिजेत, असं त्यातून सूचित नव्हतं का होत?


झाडं लावा – झाडं जगवा, नाहीतर भविष्यात शुद्ध हवा मिळणार नाही, जमिनीत पाणी धरून ठेवलं जाणार नाही, प्रदूषण कमी होणार नाही. त्याचं धर्तीवर मुलगी जन्माला येऊ द्या नाहीतर.... असा विचार स्वार्थी विचार नाही का? आपण सर्व इतके उपयोग - वादी झालो आहोत का, की एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व, तिचा आपल्याला उपयोग आहे का? याच्या उत्तराशी निगडीत करून टाकले आहे आपण?
नातेसंबंध आणि मैत्री यांचा पण विचार काही वेळा असा होतो. अनेक दिवसात आठवण न झालेला एखादा मित्र ( किंवा मैत्रीण) अचानक good morning चे मेसेज पाठवू लागला की, हमखास मनात येऊन जातं की, काहीतरी काम असणार याचं!
आपल्याला एखाद्या गोष्टीचा उपयोग आहे आणि तिच्या शिवाय आपलं अडणार आहे असं जाणवलं तरच तिचं अस्तित्त्व आपल्याला महत्त्वाचं वाटतं कां? आपल्या अवतीभवती असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या उपयोगाच्या असल्याच पाहिजेत का?


आपण फक्त आपलाच विचार करता करता उपयोग – वादी झालो आहोत. तसे नसते तर वृद्ध पालकांना आश्रमात ठेवण्याचा विचार सहजपणे झाला नसता आणि नातवंड सांभाळण्याची वेळ आल्यावर त्यांची आठवण झाली नसती.



निर्जीव वस्तूंचं एकवेळ ठीक आहे पण निसर्गाचाही विचार उपयोग - वादाच्या आधारे व्हावा का ? निसर्गातील अनेक घटकांच्या उपयोगांबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. विज्ञानात शिकलेल्या कार्बन चक्रासारखी अनेक प्रकारची चक्र निसर्गात असतात. आपल्या नकळत अनेक प्रकारचे संतुलन निसर्ग करत असतो. एखाद्या अशा चक्राच्या असंतुलनाचे परिणाम आपल्याला भोगावे लागले की, आपण खडबडून जागे होतो. आपल्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की, निसर्गाच्या अस्तित्त्वासाठी आपली धावाधाव सुरु होते. आपण उपयोग – वादी होत चाललो आहोत याचीच ही लक्षणे नाहीत का?
मुलगी जन्माला येऊ द्या च्या त्या जाहिरातीने मनात असंख्य विचारांचे काहूर उठले. समजा आपला समाज स्त्री – प्रधान असता आणि पुरुष भृण हत्येचा विरोध करावा लागला असता तरी, मुलगा जन्माला येऊ द्या नाहीतर तुमच्या मुलीला पती कसा मिळणार आणि वंश पुढे कसा वाढणार असे प्रतिपादन स्वार्थी नसते का ठरले?
वास्तविक स्त्री पुरुष दोघेही निसर्गाची निर्मिती आहेत आणि त्यामुळे त्या दोघांनाही जगण्याचा समान हक्क आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला गौण स्थान देण्याची विकृती शिरली आहे. पण त्यासाठी आपण जर स्त्री किंवा पुरुष यांपैकी कोणाचाही जगण्याचा हक्क नाकारत असू तर आपण निसर्गाचे अपराधी आहोत. निसर्ग कोणाचाही अपराध माफ करत नाही. या न त्या रूपाने अपराधाचे शासन जरूर देतो.
निसर्गाचे संतुलन ढासळले तर होणारे परिणाम टाळणे मानवी आवाक्याच्या पलीकडचे असतात. त्यामुळे निसर्गाच्या संबंधात तरी आपला उपयोग – वाद अमलात न आणणंच अंतिमतः आपल्या हिताचं असेल !
 
 
- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@