अर्धनारीनटेश्वराची संकल्पना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018   
Total Views |
फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टटीज (आयसीसीएस) द्वारा, सहावी आंतरराष्ट्रीय परिषद व प्राचीन परंपरांच्या मान्यवरांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात जगभरातील अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले. त्यात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा, पद्मश्री निवेदिता भिडे यादेखील सहभागी होत्या. त्यात त्यांनी ‘आध्यात्मिक तसेच सांसारिक जगात स्त्री देवतांचे प्रकटीकरण’ या विषयावर आपले विचार मांडले. या अत्यंत विचारप्रवर्तक भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहेत. ते त्यांच्याच भाषेत इथे मांडत आहे.
 
जगभरात अस्तित्वात असलेल्या सर्व संस्कृतीमध्ये देवत्वाविषयी सहजप्राप्त एकसमानता दिसून येते. ही भावना सर्वव्यापी आहे. त्यानुसार, सृष्टीतील प्रत्येक उत्पत्ती ही पवित्र आहे आणि प्रत्येक वस्तू ही त्या देवत्वाचे प्रकटीकरण आहे. आध्यात्मिक ज्ञानाचे सखोल चिंतन असणारी कुठलीही व्यक्ती, हे देवत्व अथवा परमेश्वर म्हणजे शिक्षा करणारी एक शक्ती आहे किंवा ती द्वेषमूलक आहे, असे मानत नाही. उलट, ते असे मानतात की, ही शक्ती पालन करणारी, सांभाळणारी, प्रेम करणारी, मायाळू आणि मदत करणारी आहे.
 
हे सर्व चराचर त्या देवत्वाचे प्रकटीकरण आहे तसेच हे देवत्व सर्व सजीव प्राण्यांचे पालन करणारे आहे, असे सर्वच संस्कृतीमध्ये मानले जात असल्यामुळे आपल्याला आढळून येईल की, या देवत्वाला जगज्जननी किंवा मानवतेला उत्पन्न करणारी माता किंवा पहिल्या पुरुषाला जन्म देणारी आई इत्यादी नावांनी या संस्कृतींमध्ये संबोधण्यात आले आहे. तिचे विविध प्रकारे- जगज्जननी, संपत्तीची देवता, विद्या व ज्ञानाची देवता, धान्याची देवता, जलदेवता, शक्तीची देवता इत्यादी रूपात पूजन करण्यात येते. अगदी सांसारिक अथवा विशेषत: पृथ्वी, सृष्टी, नदी इत्यादी, ज्या मनुष्यांचे भरणपोषण करतात, त्या वस्तूदेखील स्त्रैण देवता म्हणून पूजिल्या जातात. त्यांना माता म्हणण्यात येते. उदा. मातृभूमी किंवा जगज्जननी.
त्या स्त्रैण देवता आहेत, ही काही केवळ कल्पना नाही. उलट त्या अस्तित्वात आहेत आणि सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये ही मान्यता आहे. आपण जेव्हा म्हणतो की, गंगा ही देवी आहे अथवा नदी ही देवता आहे, तेव्हा ती कपोलकल्पना नसते. उलट ती खरेच, प्रत्यक्षात देवता असते. या भावनेवरच जगातील विविध समुदाय अनेक वर्षांपासून जगत आले आहेत.
 
जेव्हा या स्त्रैण देवतेचे अस्तित्व जाणवते आणि ते हृदयात उतरते, तेव्हा मनुष्याला ती इतर रूपातही दिसू लागते. त्याला जितकी समज असेल, तितक्या स्वरूपात ती त्याला प्रकटपणे दिसू लागते. अगदी वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘एकोऽहं बहुस्याम्।’ ती एक आहे, परंतु अनेक रूपात प्रकट होते.
इथे एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ती स्त्रैण दैवीशक्ती आमच्या आत आम्हाला अनुभवता येते का? आम्ही आमच्यामध्ये तिला जाणू शकतो का?
 
तद्नुसार, त्या दैवीशक्तीला जागृत करण्यासाठी, तिचे अस्तित्व आमच्या हृदयाला जाणविण्यासाठी, तिच्याशी जोडल्या जाण्यासाठी विविध प्रकारची कर्मकांडे निर्माण करण्यात आली आणि अजूनही निर्माण होत आहेत. ही कर्मकांडे, परंपरा, रूढी या मुळात आम्हाला तिच्याशी, त्या दैवीशक्तीच्या भरणपोषण क्षमतेला जोडण्यासाठी आहेत. त्यातून मनुष्याला दया, आत्मीय भावना आणि परस्परावलंबित्व यावर आधारित समाज निर्माण करण्यात मदत होते. सृष्टीत जी विविधता दिसते, ती आतून परस्परांशी जोडलेली आहे, संलग्न आहे आणि त्याची अनुभूती, आम्ही जी विविध प्रकारची कर्मकांडे करतो त्यातून होत असते.
या स्त्रैण देवत्वाची पूजा करणारे आणि पूजा न करणारे जे समाज आहेत, त्यांच्या आचारविचारात स्पष्ट फरक दिसून पडतो. ज्या संस्कृतीत स्त्रैण देवतांची अथवा देवत्वाची पूजा केली जाते, त्यांच्यात इतर पद्धतीच्या लोकांचाही आदर करण्याचा विचार आढळून येतो. त्यांच्यात, या संपूर्ण सृष्टीचा समग्रतेने विचार करण्याचा मार्ग प्रशस्त झालेला दिसून येतो. स्त्रैण देवतांचे पूजन करणाऱ्या संस्कृती सर्वसमावेशक विचारांच्या आढळून येतात. एकाच मातेची ही सर्व लेकरे आहेत, या दृष्टीने ते सर्वत्र बघतात. त्यांच्यापेक्षा वेगळा विचार असणाऱ्यानाही ते स्वीकारतात. ते कुटुंबासोबत, समाजासोबत आणि निसर्गासोबत सामंजस्याने, सौहार्दाने राहतात. स्त्रैण देवतेचे अन्य मार्गाने पूजन अथवा उपासना करणाऱ्या समाजाला बघितल्यावर ते भयभीत होत नाहीत.
 
या उलट, जिथे देवत्वाची स्त्रीरूपात पूजा केली जात नाही, जिथे पृथ्वी, नदी अथवा सृष्टीकडे मातृत्वाच्या भावनेने बघण्याची संकल्पना नाही. ते सर्वसमावेशकपणाचा विचारही करू शकत नाहीत. या अशा संस्कृतीचे आचरण, दुसऱ्याला वगळण्याचेच (एक्सक्लुझिव्ह) असते. त्यांच्यात सामंजस्य, सौहार्द निर्माणच होत नाही. उलट, इतरांना दडपण्याची, इतरांवर प्रभुत्व मिळविण्याची इच्छा त्यांच्यात असीमितपणे प्रबळ झाल्याचे दिसून येते. दुसऱ्याना वगळण्याच्या संकल्पनेतूनच, ‘माझाच परमेश्वर सत्य आहे आणि तुझा असत्य आहे’, ‘माझाच मार्ग एकमेव सत्य आहे’ ही भावना उदय पावते. दुसऱ्याना वगळण्याचा विचार, समाजात शत्रुत्व, तणाव, हिंसा, भांडणे उत्पन्न करतो. स्वातंत्र्याची मूळ संकल्पना संकुचित होते आणि दुसऱ्याचे हक्क वेगळे आहेत, असे मानू लागतो.
 
हे विघटन, जुन्या व्यवस्थेला तोडणे, हे जे आपण सर्वत्र बघत आहोत, तो या पृथ्वीचा शेवट नसून, अत्यंत प्रभावी असा जागतिक दृष्टिकोन आहे.
आज, जर आम्ही पर्यावरण, जीवनाची सार्थकता, विघटन इत्यादी समस्यांचे अथवा आव्हानांचे परीक्षण, पृथक्करण केले तर, मनुष्याने स्वत:ला उच्च जाणिवेपर्यंत उन्नत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात येईल. आम्ही तिचा, त्या स्त्रैण देवत्वाचा उत्सव साजरा केला, तिला धरून ठेवले तर, ती निश्चितच प्रतिसाद देईल आणि एका नव्या आरंभासाठी, मनुष्याचा आध्यात्मिकतेवर भक्कम पाया उभारण्यासाठी, उत्क्रांतीसाठी, उच्च जाणिवेकडे उन्नत करण्यासाठी ती निश्चितच दिशादर्शन करेल.
 
कर्मकांड आणि परंपरांचे, आजच्या काळानुरूप पुनप्र्रतिपादन, परिवर्तन आवश्यक असू शकते आणि काळानुरूप संकल्पनांसाठी आम्ही मोकळे असायला हवे, तसेच बदलासाठी मागेपुढे बघायला नको. याच प्रकारे संस्कृती जिवंत राहिल्या आहेत. मूलभूत तत्त्वे कायम ठेवीत, त्या तत्त्वानुसार जगत, काळाच्या गरजेनुसार बाह्य स्वरूप बदलत, या संस्कृतींनी आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. या ठिकाणी तांदूळ आणि टरफलांचे उदाहरण सुयोग्य राहील. तांदळातील टरफले पाखडून टाकण्याचे कार्य प्रत्येक संस्कृतीने केले आहे. आज हे आमच्यासमोर असलेले आव्हान आहे. अंततोगत्वा, जे या स्त्रैण देवत्वापासून, दैवी मातृत्वापासून दुरावले आहेत, त्यांनादेखील या मातेकडे परत आणले पाहिजे. जेणेकरून, या संपूर्ण जगाच्या भल्यासाठी, त्यांच्यामध्ये दया आणि सौहार्द जागृत होईल.
 
अर्धनारीनटेश्वराची जी सुंदर संकल्पना उत्क्रांत झाली आहे, ती या जगाचा, स्त्रैण तसेच पुरुषी असा समतोल दृष्टिकोनच प्रकट करणारी आहे. अशा देवत्वाची संकल्पनाच विविधतेचा सन्मान करणारा विचार-मार्ग प्रशस्त करीत असते.
@@AUTHORINFO_V1@@