कर्ज बुडवणं इतकं सोप्पं आहे तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018   
Total Views |
सध्या गाजत असलेल्या नीरव मोदी प्रकरणातून एक बाब नक्कीच स्पष्ट झाली आहे. ती ही की, या देशातील बँक अधिकाऱ्याना मूर्ख बनवणे अगदीच सोपे आहे. बँका लुटून विदेशात पळून जाणे, तर त्याहून सुलभ आहे. यासाठीची तुमच्या ‘पात्रते’ची अट एवढीच की, तुम्ही श्रीमंत असले पाहिजे. ‘वरच्या’ लेव्हलला तुमची ओळख असली पाहिजे. जमलंच तर राजकीय क्षेत्रातील लोकांचाही तुमच्यावर वरदहस्त असला पाहिजे. हा! तुम्ही गरीब असाल तर मात्र तुमचं काही खरं नाही. मग बँकांचे असले-नसले ते सर्व प्रकारचे जाचक नियम, अटी तुम्हाला लागू पडतील. दारावरच्या चपराश्यापासून तर खुर्चीवर बसलेल्या बाबूपर्यंत, सर्वांची जी-हुजुरी करतच तुमचा प्रवास होईल. कितीही जिकिरीचे असले तरी ढीगभर कागदांचा पसारा मांडल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. हो! नियमांची ऐसीतैसी करून विनासायास कर्ज मिळायला तुम्ही काय विजय माल्या आहात की नीरव मोदी? दारूच्या कंपन्या नावावर नसताना, गाठीशी हिरे-मोत्यांचा व्यापार नसताना बँक अधिकारी तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू देतीलच कसे? नियमातील शिथिलतेची सवलत फक्त ‘त्यांच्याङ्कसाठी आहे.
 
बाकी नियमावली आणि त्यातील शब्दांचा काथ्याकूट तुमच्यासाठी. कडाकडा बोटं मोडा, की डोळ्यांत पाणी आणून विनवण्या करा. नियमावलीचा तो अडथळा पार केल्याशिवाय तुमच्या झोळीत कर्ज पडणार नाही म्हणजे नाहीच! गरीब लेकाचे! कर्ज मागता? बँकांच्या तिजोरीत ठेवलेले पैसे काय तुमच्या शेतातली पिकं पिकावीत म्हणून खरेदी करायच्या बियाण्यांवर उधळण्यासाठी आहेत? मग माल्यानं कोणत्या पैशांवर डल्ला मारायचा? नीरव मोदीनं कोणत्या पैशांवर चैन करायची? तेव्हा यापुढे चकार शब्दानं बोलायचं नाही. निषेधाचा सूरबिर आळवण्याची तर लायकीही नाही तुमची! कर्ज मागायला आले असताना बँक तुम्हाला दारापुढे रांगेत उभे राहू देते, यातच त्यांचे थोर उपकार माना.
 
तिथला बाबू म्हणतो तेवढी कागदपत्रे गुमान जमा करा. उगाच शहाणपणा करायचा नाही. कर्ज असले, त्यावर व्याज भरणार असला, तरी तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देऊन समाधानी चेहऱ्याने तुम्हाला परत पाठवणे, यासाठी स्थापन झालेल्या नाहीत बँका. काय म्हणता, मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून गरज भागत नाही? मग, तुमच्या गरजा पूर्ण करणे ही काय बँकांची जबाबदारी आहे? आणि हो! एका बँकेचे कर्ज बुडवून लागलीच दुसऱ्या बँकेकडून नवे कर्ज मिळवण्याची सोयही विजय माल्या, नीरव मोदी आदी काही मोजक्या लोकांसाठीच उपलब्ध आहे. उगाच नको त्या सोयी, सवलती मिळवण्यासाठी आग्रह धरायचा नाही. बँकांचे अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे चुपचाप आपली थकबाकी नसल्याचे प्रमाणपण अन्य बँकांकडून लिहून आणायचे. त्याशिवाय एखादी बँक तुम्हाला कर्ज कसे देऊ शकेल सांगा! गरिबांना कर्ज देणे काय इतके सोपे असते? पूर्ण माहिती घ्यावी लागते. गॅरेंटर्स लागतात. फाईल भरून कागदं त्यांचीही जमा करावी लागतात. एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार करावा लागतो त्यांच्यावर. घेतलेले कर्ज फेडणार कसे, याची खात्री करून घ्यावी लागते. हो! उद्या तुम्ही कर्ज फेडण्यात अपयशी ठरला तर? उगाच एनपीए वाढतो ना. पत जाते बँकेची. त्या रिझव्र्ह बँकेचे नियम किती कठोर असतात, तुम्हाला काय ठाऊक! हा, आता अगदीच माल्यादी ग्राहकांसाठी बँकांचे अधिकारी थोडीशी तसदी घेऊन, वातानुकूलित वातावरणातही घाम गाळून करतात तजवीज. मग नीरवचे कर्ज बुडवलेले खाते एनपीएऐवजी ‘स्पेशल मेन्शण्ड अकाऊंट’ या विशेष प्रवर्गात समाविष्ट होते. पण, गरीब लोकहो, अशी सोय कोट्यवधी रुपये बुडविणाऱ्यासाठी करता येईलही. तुमच्यासारख्या पाच-पंचेवीस हजारांची परतफेड करण्याचीही परिस्थिती नसलेल्यांसाठी तसली तसदी का म्हणून घ्यायची बँक अधिकाऱ्यानी, सांगा!
 
नीरव मोदी म्हणजे किती बडी असामी, ठाऊक तरी आहे का तुम्हाला? हिरे, मोत्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार त्यांचा. विदेशात पळून जाण्याची कुवत त्यांची! यावरून अंदाज बांधा जरा! अशा बड्या धेंडांपुढे कोण माना तुकवणार नाही सांगा बघू? तर सांगायचा मुद्दा असा की, नीरव साहेबांचा माणूस आला तरी आपसूकच अधिकारी जागेवर उठून उभे राहायचे. रुबाबच तसा होता ना साहेबांचा! आहात कुठे? एकदम भला माणूस हा! प्रभावी व्यक्तिमत्त्व. आता अशा भल्या माणसावर कोण, कसा अन् कशाला संशय घेईल हो! पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारीही प्रभावित झाले त्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावानं. गोरगरीब, मध्यमवर्गीयांकडे कुठले आले असले व्यक्तिमत्त्व- बघताच भुरळ पाडणारे? पण ते नीरव साहेब! त्यांचा थाट कसा, एकदम शाही! आता अशा माणसानं कोट-दोन कोट रुपये मागितले थोड्या दिवसांसाठी तर काय नाही म्हणायचं? लागलीच, परत केव्हा देणार म्हणून तगादा लावायचा त्यांच्या मागे? छे! काहीतरीच! विचार करण्याच्या या मिडल क्लास मेंटॅलिटीमुळेच तर मागे राहिला देश आपला. तेव्हा अशा मेंटॅलिटीत अडकून आपल्या पायावर कुर्हाड मारून घ्यायची नाही, असा निश्चयच केला पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाऱ्याच्या कंपूनं! (सॉरी! टीम नं!) मग काय? कोट्यवधीचं कर्ज घेणारा हा माणूस व्याजरूपातच कितीतरी पैसे मोजणार होता. गरीबहो! तुम्हाला तर त्या आकड्यांवर शून्य किती असतील, हेही सांगता येणार नाही. अरे, बुडवलं म्हणून काय झालं, त्यानं आपल्या बँकेतून कर्ज घेतलं होतं, हीदेखील गर्वानं सांगावं अशी बाब. तुमच्या बाबतीत आहे का असं काही? सांगता येतील तुमची नावं अभिमानानं इतर कुणला? गरीब लेकाचे!
 
ते नीरव साहेब आले होते बँकेत. म्हणाले, ‘‘थोडे दिवस बँकेतले पैसे वापरू द्या! त्याच्या मदतीनं मी धंदा जोमानं वाढवतो. मग करतो तुमचे पैसे परत.’एवढा मोठा माणूस मदतीसाठी शब्द टाकतोय् म्हटल्यावर नाही कसं म्हणणार? बँकांच्या अधिकाऱ्यानीही मग गुडघे टेकले. अतिशय विनम्रपणे, नतमस्तक होत त्यांनी कर्जाची रक्कम नीरव साहेबांना ऑफर केली. म्हणाले, ‘‘आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. परतफेडीचीचिंता करू नका! नाहीच जमलं परत करणं, तरी आम्ही आहोत तुमच्या सेवेत. आरबीआयनं एनपीए नावाचा प्रकार सुरू कशासाठी केलाय्?’ कित्ती म्हणून कित्ती खूश झाले साहेब. मग त्यांना विशेषाधिकार प्राप्त असं एक विशिष्ट प्रकारचं क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आलं. त्याचा वापर करून त्यांनी देशी-विदेशी बँकांमधून ११,४०० कोटी रुपये उचलल्याचा आरोप करताहेत काही लोक. अरे, हे कार्ड काय त्यांना शोकेसमध्ये ठेवायला थोडीच दिलं होतं! गरज होती पैशाची. हातात कार्डही होतं. काढले त्यांनी चार पैसे तर एवढा गवगवा करायचा? नाही म्हणायला इथे थोडीशी चूकच झाली म्हणा बँकेची. असलं कार्ड देताना तारण स्वरूपात काहीतरी ठेवून घ्यायला हवं होतं. पण आता तुम्हीच सांगा, इतकी बडी असामी ती! नुसती कर्ज मागायला बँकेत आली म्हटलं तरी केवढे हुरळून गेले होते अधिकारी! तुम्हीच सांगा, पैसे दिले की लागलीच तारणबिरण मागायला बरं वाटतं का हो? थोडातर विश्वास ठेवलाच पाहिजे ना त्यांच्यावर! कर्ज, क्रेडिट कार्ड देताना लागलीच कागदपत्रांच्या, तारणाच्या अटी ठेवायला, घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावायला ते काय गरीब, मध्यमवर्गीय वर्गात मोडतात? बड्या माणसाला याबाबत विचारणं म्हणजे त्याचा धडधडीत अपमानच! तो होऊ द्यायचा नाही म्हटल्यावर केवढी काळजी घ्यावी लागली असेल? एकवेळ बँक बुडाली तरी चालेल, पण नीरव साहेबांचा अपमान होणार नाही म्हणजे नाहीच! पीएनबीच्या अधिकाऱ्यानी हीच जाणीव जपली. आज ‘परिणाम’ जगासमोर आहेत.
 
तेव्हा, गरीबहो! अन् कायम कुठल्या ना कुठल्या विवंचनेत जगणारे मध्यमवर्गीय बापुडेहो! बँकांचे करोडो रुपये घेऊन माल्या पळून गेला, याची खंत बाळगू नका. नीरव मोदीने विदेशात पळ काढला, याबद्दलही वाईट वाटून घेऊ नका. त्यांनी हुशार डोक्याने लढवली ती शक्कल तेवढी लक्षात घ्या. कर्ज तर तुम्हालाही मिळू शकते. शेपट्या हलवत बँकांचे अधिकारी तुमच्यासमोरही ‘कुर्निसात’ करीत उभे राहतील. कुठलाही नियम तुमच्या आड येऊ दिला जाणार नाही. खुद्द अधिकारी लोक त्याची तजवीज करतील. अट फक्त एकच... कर्ज बुडवून विदेशात पळून जाण्याएवढी श्रीमंती तुमच्या गाठीशी असली पाहिजे! माल्या, नीरवला जे करता आलं ते तुम्हालाही करता आलं पाहिजे... आहे हिंमत?
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३
 
@@AUTHORINFO_V1@@