शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महापुरुषांचे सम्यक् आकलन होण्यास दृष्टीही आभाळासारखीच व्यापक, सखोल लागत असते. ही दृष्टी फारच कमी लोकांकडे असते. आपल्यासारखे सर्वसामान्य ‘संकुचित’ दृष्टीने या महापुरुषांचे आकलन करीत असतात. त्यांच्या कवेत या महापुरुषाचा जो पैलू आला, त्यालाच ते त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजून बसतात. त्यात त्यांचाही काही दोष नसतो. कारण तुमच्याजवळ ज्या आकाराचे भांडे असेल, तेवढाच समुद्र तुमच्याकडे येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अगदी हेच घडले आहे. आम्ही त्यांचा एकेक पैलूच घेऊन बसतो आणि जगाला सांगतो की, शिवाजी असा होता, शिवाजी तसा होता. कुणाला शिवाजी महाराज हिंदू साम्राज्याचे संस्थापक वाटतात, तर कुणाला गोब्राह्मणप्रतिपालक. कुणाला शेतकऱ्याचे राजा, तर कुणाला हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते वाटतात. कुणाला ते केवळ मराठ्यांचे नायक वाटतात. कुणाला ते आदर्श प्रशासक, तर कुणाला सामाजिक सुधारक... परंतु, शिवाजी महाराज याहूनही दशांगुळे अधिकच आहेत.
 
मग अशा या विशाल व्यक्तिमत्त्वाचे सम्यक् आकलन करायचे तरी कसे, हा प्रश्न छळू लागतो. त्यासाठी त्या महापुरुषाचे सत्त्व आणि स्वत्व काय आहे, याचा शोध घ्यायचा असतो. ते तुम्हाला गवसले की, त्या महापुरुषाचे अख्खे व्यक्तिमत्त्व तुमच्या हातात येते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा नीट अभ्यास केला, तर मनात प्रश्न पडतो की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा उपद्व्याप का बरे केला असावा? वडील आदिलशहाच्या दरबारी मातब्बर सरदार होते. आपल्या पराक्रमाने त्यांनी हे पद प्राप्त केले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील जहागीर सांभाळण्यासाठी पाठविले होते. शिवाजी महाराजांना ही जहागीर व्यवस्थित सांभाळता आली असती किंवा वाटल्यास तिचा विस्तारही करता आला असता. तेवढा पराक्रम शिवाजी महाराजांमध्ये निश्चितच होता. वर सांगितल्यापैकी दोन सोडून बाकी सर्व गोष्टी त्यांना आपल्या या जहागिरीत साकार करता आल्या असत्या. आदिलशहांचे सरदार राहूनही, शिवाजी महाराज उत्तम प्रशासक, सुधारक, शेतकऱ्याचे उद्धारकर्ते, हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते आणि मराठ्यांचे शिखर-सरदार राहू शकले असते. कशाचीच ददात नव्हती. अन्य सरदारपुत्रांप्रमाणे सुखासीन आणि तरीही अतिशय देदीप्यमान जीवन त्यांना जगता आले असते. असे असताना त्यांना स्वराज्य स्थापन करण्याची ‘दुर्बुद्धी’ का सुचावी? या प्रश्नाच्या उत्तरातच शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण’ दडले आहे. स्वराज्य स्थापण्याची बुद्धी सुचणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी रक्ताचे पाणी आणि आयुष्याचा होम करणे, हेच ते ‘शिवाजीपण’ आहे. कारण, गोब्राह्मणप्रतिपालक व हिंदूंचे साम्राज्य या दोन गोष्टी स्वराज्य स्थापन केले तरच शक्य होणार होत्या. आपण असेही म्हणू शकतो की, शिवाजी महाराजांना या दोन गोष्टींनाच साकार करायचे होते, म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापनेचा खटाटोप केला. हे असे म्हणण्याला शिवाजी महाराजांच्या जीवनात काही आधार आहे का, हेही बघितले पाहिजे.
 
शिवाजी महाराजांच्या, स्वराज्य स्थापनेच्या उद्योगाला आळा बसत नाही, हे बघून औरंगजेबाने त्याचा अत्यंत विश्वासू व पराक्रमी सरदार मिर्झा राजे जयसिंह यांना प्रचंड सैन्यानिशी शिवाजीवर चालून जायला आदेश दिला. मिर्झा राजे जयसिंह काय चीज आहे, हे शिवाजी महाराजांना माहीत होते. स्वराज्यावर आलेले हे संकट, लहानसहान नाही, याची कल्पना शिवाजी महाराजांना नसेल असे नाही. पण, असली छप्पन संकटे शिवाजी महाराजांनी उधळून लावली होती. परंतु, शिवाजी महाराज एका वेगळ्याच चिंतेने अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेतून त्यांनी जयसिंह यांना पत्र पाठविले. हे पत्र मुत्सद्दीपणाने लिहिले म्हणण्यापेक्षा, एका आंतरिक तिडिकीने या पत्रात शिवाजी महाराजांनी आपले रक्तबंबाळ, व्यथित मन उघड केले आहे. त्यामुळे ते ऐतिहासिक ठरले आहे. (सेक्युलर इतिहासकारांनी हे पत्र नाकारल्याचे अद्याप कानी नाही.) या पत्रात शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंह यांना लिहितात- ‘‘तू कुणाची बाजू घेऊन माझ्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहेस, याचा स्वत:च्याच अंत:करणात डोकावून विचार कर. हिंदूंच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ इच्छित आहेत. पण उलट, याने तुझ्या आयुष्यावर कलंकच लागणार आहे. जर तू स्वत: दक्षिण-विजयासाठी आला असता, तर तुझ्या मार्गात मी माझे शिर व डोळे पायघड्यासारखे अंथरले असते. माझ्या सैन्यासह मी तुझ्या मागोमाग चाललो असतो. पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतची भूमी जिंकून तुला सोपविली असती. पण तू तर त्या धोकेबाज, कपटी औरंगजेबाचा सरदार म्हणून आला आहेस! आता मला कळत नाही की, तुझ्याशी मी कोणता खेळ खेळू? जर मी तुझी साथ दिली तर, ते पौरुषत्व ठरणार नाही. कारण वीरपुरुष काळाची चाकरी करीत नाहीत. सिंह कधीही कोल्हेगिरी करीत नाही. जर मी तुझ्याशी तलवारीने खेळलो तर, दोन्ही बाजूंनी हिंदूंचीच हानी होईल. मला अत्यंत खेद वाटतो की, केवळ मुसलमानांचेच रक्त पिण्यासाठी म्यानाबाहेर येणारी माझी तलवार आता अन्य कारणासाठीही बाहेर पडणार, असे दिसते. मनुष्यरूपात राक्षस असलेल्या औरंगजेबाने, या देशात हिंदू वीर शिल्लक राहू नये म्हणून मुद्दाम तुला माझ्याविरुद्ध पाठविले आहे. गिधाडांना जंगलाचे राजे होता यावे म्हणून सिंहांना आपापसात लढवून नष्ट करण्याचे हे कारस्थान आहे.
 
जयसिंहाने चिडून तरी का होईना, पण औरंगजेबाची साथ सोडावी म्हणून अत्यंत कठोर शब्दांत त्याची निंदा करीत महाराज लिहितात- ‘‘तुला परमेश्वराने बुद्धी दिली असेल, तसेच तू आपल्या पौरुषत्वाची आणि पुरुषत्वाची बढाई मारत असशील, तर आपल्या या मातृभूमीच्या वेदनेने तुझी तलवार तापू दे आणि अत्याचारांनी विव्हळणाऱ्या हिंदूंच्या अश्रूंचे तिला पाणी दे. हा काळ आपण एकमेकांशी लढण्याचा नाही. आज आमची मुले, मुली, देश, धनसंपत्ती, देव-देवालय तसेच देवपूजक या औरंगजेबामुळे संकटात सापडले आहेत. जर औरंगजेबाचे कार्य असेच सुरू राहिले तर या पृथ्वीवर आपल्या लोकांचे चिन्हही दृष्टीस पडणार नाही.’
 
शिवाजी महाराज जयसिंहाला सांगतात की, ‘‘तू उत्तरेकडील सर्व हिंदू सरदारांना एकत्र करून मोगलांवर तुटून पड. इकडे मी एकटाच या बहामनी सल्तनतींचा फडशा पाडतो. आपण दोघे मिळून या संपूर्ण देशातून इस्लामचे नामोनिशाण मिटवून टाकू.’
जयसिंहाला आपल्यावर कदाचित विश्वास बसणार नाही, अशी शंका शिवाजी महाराजांना असावी. म्हणून ते म्हणतात- ‘‘मी तलवारीची, घोड्यांची, देशाची, धर्माची शपथ घेतो की, तुझ्यावर कुठलेही संकट येणार नाही. अफजल खानाला मी जसे मारले त्यावरून तू माझ्यावर शंका घेऊ नकोस. कारण त्यात सत्य नाही. बाराशे हशबी योद्धे सोबत घेऊन तो मला मारण्यासाठी टपला होता. मी पहिल्यांदा त्याच्यावर वार केला नसता, तर तुला हे पत्र लिहायला मी जिवंतच राहिलो नसतो. तसेच आपल्या दोघांत कुठलेच वैर नाही.’
 
हे पत्र चांगलेच लांबलचक आहे. ते मुळातच वाचले पाहिजे. त्यावरून लक्षात येईल की, शिवाजी महाराजांनी जहागिरीचा उपभोग घेण्याचे नाकारून, हिंदूंचे स्वराज्य स्थापण्याचा ‘वेडेपणा’ का केला. त्यांना या देशाची, हिंदू धर्माची चिंता होती. त्यांना हिंदूंचे आदर्श राज्य स्थापन करायचे होते. त्यांना या भूमीवरून इस्लाम संपवून टाकायचा होता. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य होरपळून टाकले. शिवाजी महाराजांचे हेच खरे सत्त्व; हेच खरे स्वत्व आणि ‘शिवाजीपण’देखील. या शिवाजीपणाच्या प्रकाशात शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून समजून घेतले पाहिजे. हे असे आतापर्यंत झाले नाही. म्हणून ते तसे झाले पाहिजे. याची कुणी, इतिहासाचे पुनर्लेखन म्हणून, टवाळी केली तरी चालेल, पण हे झाले पाहिजे!
९८८१७१७८३८
@@AUTHORINFO_V1@@