त्रिपुरात भाजपची लाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018   
Total Views |


 

 
 
 
 
 
त्रिपुराच्या निवडणूकपूर्व राजकारणाचे दोन भाग करता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेब्रुवारीच्या विक्रमी सभेपूर्वीचा त्रिपुरा आणि नंतरचा. मोदींच्या दोन सभेला मिळून सुमारे अडीच लाखांची गर्दी जमली होती. या सभांनी त्रिपुरात भाजपची लाट असल्याचे स्पष्ट केले. आता १५ फेब्रुवारीला मोदी पुन्हा त्रिपुरात येत आहेत. ही सभाही मोदींच्या आधीच्या सभेचा विक्रम मोडेल, अशी शक्यता आहे.

त्रिपुरातील निवडणुकांना अवघे चार दिवस उरले असताना रामनगर मतदार संघातल्या मधू देब या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. गेल्या १३ महिन्यांत भाजप कार्यकर्त्याची झालेली ही ११ वी हत्या. भाजपचे कार्यकर्ते माकपच्या दहशतीला जुमानता कामकरीत आहेत, परिवर्तनासाठी रक्त सांडत आहेत. परंतु, त्रिपुरातील जनतेच्या मनात उसळलेली परिवर्तनाची उर्मी इतकी जबरस्त आहे की, दहशतीच्या हत्याराने ती थोपवणे केवळ अशक्य आहे, असंभव आहे.

रामनगर मतदारसंघात राहणारे मधू देब हे एकेकाळचे कट्टर माकप कार्यकर्ते. व्यवसायाने रिक्षाचालक. दीड वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले. डाव्यांचा कारभार त्यांनी हयातभर पाहिला होता. राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय जनतेचे भले होणार नाही आणि हे परिवर्तन केवळ भाजपच करू शकेल, या भावनेने ते भाजपमध्ये दाखल झाले. गेल्या काही काळात ते इतके भाजपमय झाले की, घरासमोर असलेले दुकान रिकामे करून त्यांनी तिथे भाजपचे कार्यालय थाटले. मोबदल्यात पैसे घेण्यासही ठाम नकार दिला. भाजपचा ज्वर त्यांच्या अंगात भिनला होता. इतका की, जानेवारीला भाजपाध्यक्ष अमित शाह यांची उदयपूर येथे सभा झाली, रामनगरपासून ६० किमीवर असलेल्या या सभेला मधू चक्क रिक्षा घेऊन गेले. भाजपची सत्ता आल्यास त्रिपुराचे भले होईल या भावनेने त्यांच्या मनात घट्ट मूळ धरले होते. ही भाजपनिष्ठा माकपच्या कार्यकर्त्यांना खूपत होती. माकपच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोळ्यात मधू प्रचंड खुपत होते. आठवडाभरापूर्वी रामनगरच्या आसपास मुख्यमंत्री माणिक सरकार यांची सभा झाली. त्यानंतर मधू गायब झाले. एका रस्त्यावर त्यांची रिक्षा सापडली. त्यात त्यांचा मोबाईल आणि पैसे होते. कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दोन दिवस ते बेपत्ता होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते त्यांचा शोध घेत होते. अखेर भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी पोलिसांना निर्वाणीचा इशारा दिला. ‘‘२४ तासांत मधूचा छडा लावा; अन्यथा आंदोलन करू,’’ असे सुनावले. त्यानंतर काही तासांत मधू यांचा गळफास घेतलेला मृतदेह सापडला. मधू आत्महत्या करतील इतक्या कच्च्या दिलाचे नव्हते. त्यांच्या शरीरावर असलेल्या मारहाणीच्या खुणा, ओरखडे त्यांच्या मृत्यूची सच्चाई सांगत होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. मधू यांची हत्या माकपच्या गुंडांनीच केल्याचा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे. डाव्या पक्षांतून भाजपमध्ये येणार्‍या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा हत्या करणे हे माकपचे तंत्रच आहे. त्रिपुरातील डावे पक्ष ही माफियांची टोळी असून पक्ष चालविण्यासाठी ते माफियांचे तंत्रच वापरतात. मधू देब यांची हत्या हा पक्षांतर करणार्‍या डाव्या कार्यकर्त्यांना इशारा आहे. परंतु, डावे कार्यकर्तेही अशा इशार्‍यांना भीक घालण्याच्या मन:स्थितीत नाहीत. तिथून आलेले हजारो कार्यकर्ते भाजपच्या विजयासाठी ताकदीने उतरले आहेत. माकपने पोसलेले गुंड किती जणांचे शिरकाण करणार? परंतु, आता निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असताना या दहशतीला उधाण येणार हे निश्चित. मधू देब यांचा मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी मजलीशपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुशांत चौधरी यांच्यावर रानीर बाजार परिसरात भरदिवसा हल्ला करण्यात आला. तलवारी, चॉपर, लोखंडी सळ्या हाती घेतलेला जमाव चौधरी यांच्या जीपवर चालून गेला. कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून जाताजाता चौधरी यांच्या जीपवर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात चौधरी जबर जखमी झाले. एखाद्या हिंदी सिनेमात शोभेल अशी ही घटना. हल्लेखोरांना चौधरी यांची हत्या करायची नव्हती, परंतु त्यांना जबर जायबंदी करून दहशत माजवायची होती. एखाद्याने हाय खावी असा हा घटनाक्रम आहे. परंतु, भाजप कार्यकर्ते एखाद्या पहाडासारखे निश्चल उभे आहेत.

त्रिपुराच्या निवडणूकपूर्व राजकारणाचे दोन भाग करता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेब्रुवारीच्या विक्रमी सभेपूर्वीचा त्रिपुरा आणि नंतरचा. मोदींच्या दोन सभेला मिळून सुमारे अडीच लाखांची गर्दी जमली होती. या सभांनी त्रिपुरात भाजपची लाट असल्याचे स्पष्ट केले. आता १५ फेब्रुवारीला मोदी पुन्हा त्रिपुरात येत आहेत. ही सभाही मोदींच्या आधीच्या सभेचा विक्रम मोडेल, अशी शक्यता आहे. पहिल्या दौर्‍यादरम्यान त्रिपुरात आलेल्या अफाट परिवर्तनासाठी मोदींनी खाजगीत भाजप कार्यकर्त्यांची पाठ थोपटली. अथक परिश्रम करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांसाठी कौतुकाची ही थाप इंधनाचे काम करेल.

मोदींच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड शो आणि सभा झाल्या. साधारणपणे एखाद्या नेत्याचा रोड शो झाला की सभोवती दुतर्फा असलेला जमाव हात हलवून नेत्याचे अभिवादन करतो. योगींच्या रोड शोला प्रचंड संख्येने एकत्र झालेला देब आणि देब बर्मा समुदाय मात्र आपल्या सर्वोच्च अध्यात्मिक गुरूला भक्तिभावाने हात जोडून अभिवादन करीत होता. योगी यांच्या सभेच्या आधी नाथ संप्रदायातील एका शिष्टमंडळाने योगी यांची भेट घेतली. मोदी आणि योगींचा प्रभाव या निवडणुकीत निश्चितपणे जाणवणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या तीन सभा राज्यात झाल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्तेव्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन झाले. वातावरण भाजपच्या बाजूने असले तरी भाजप नेतृत्व गाफील नाही. विविध समाज गटांचा पाठिंबा मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. चकमा आणि मोग जनजाती या बौद्धधर्मीय आहेत. अनेक वर्षे माकपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा कल स्वाभाविकच भाजपकडे आहे. त्रिपुरातील ज्येष्ठ बौद्ध भिक्खू एच. आर. थल्ला (९५) यांच्या अंत्यसंस्काराला बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू या अंत्यविधीला हजर होते. त्यामुळे डाव्यांचा जळफळाट झाला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. बौद्ध वस्त्यांमध्ये बौद्ध भिक्खू भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत. मुस्लीम मतदारांचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव असलेले आठ मतदार संघ त्रिपुरात आहेत. मुस्लिमांमध्येही भाजपची क्रेझ आहे. भाजपच्या सभा, रॅलीमध्ये जाळीदार टोपी घातलेल्या मुस्लिमांची संख्या मोठी असते. एकेकाळी कॉंग्रेसचा मतदार असलेला मुस्लीम समाज भाजपच्या बाजूने झुकलेला दिसतो, परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तो नेमका कोणाच्या बाजूने उतरतो, हे उघड व्हायला आता केवळ काही दिवस उरले आहेत. त्रिपुरात विजयासाठी भाजपने शर्थ केली आहे. त्याचे परिणाम ३ मार्चला जाहीर होणार्‍या निकालात दिसणारच आहेत. १८ फेब्रुवारीला त्रिपुराच्या आणि २६ फेब्रुवारीला मेघालयच्या निवडणुका होणार आहेत. त्रिपुराच्या निवडणुका आटोपल्यानंतर राज्यात भाजपची लाट निर्माण करणारे प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांची मेघालयात पाठवणी करण्यात येणार आहे. एकेकाळी मेघालयात आठ वर्षे रा. स्व. संघाचे प्रचारक असलेल्या देवधर यांचा मेघालयात तगडा जनसंपर्क आहे. अखेरच्या टप्प्यात त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

त्रिपुरात निवडणुकीच्या दिवशी डाव्यांकडून सरकारी यंत्रणांचा जबरदस्त दुरुपयोग आणि दहशतीचे प्रयोग होणार ही काळ्या दगडावरची रेघ. परंतु, सध्या जे काही चित्र आहे ते पाहता, राज्यात भाजप आणि आयपीएफटीच्या युतीला ६० पैकी ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@