शेतमालाचे भाव पडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |
 

 
सांगली : शेतमालाचे भाव पडू नयेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा पकडून शेतमाल भाव देण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तर, ९९.५ टक्के शेतकऱ्यांना एफ. आर. पी. देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव व दख्खन जत्रा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. दुष्काळी भागातील सिंचनाच्या सुविधांना प्राधान्य दिले. पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर आणि ठिबक सिंचन वापरून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ५० हजार एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपसा सिंचन योजनेच्या बिलात ८३ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता बिल भरता आले नाही, म्हणून पाणी नाही, असे होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, राज्यात काल झालेल्या गारपीट ग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@