करावे – न करावे. (DO’S & DONT’S)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
आपण खूप भाग्यवान आहोत. १५० वर्षांनी घडणाऱ्या दुर्मिळ अशा super blue blood moon बघण्याचे भाग्य लाभले आपल्याला! विज्ञानाची कमाल अशी की, जगातील वेगवेगळ्या observatory मधून दिसणारी चंद्रग्रहणाची विविध रूपे नासा मुळे आपल्याला घरबसल्या पाहता आली. सोशल मिडिया वर या संबंधीच मेसेजेस फिरत होते. हा योग दुर्मिळ आहे, त्यामुळे हे ग्रहण जरूर बघावे, या बरोबरीनेच ग्रहण काळातील, करावे – न करावे (do’s and dont’s) चे पण भरपूर मेसेज होते. ग्रहण काळातील यम – नियमाइतके दुसऱ्या कोणत्याच घटनेचे यम – नियम नसतील. मग ते सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण!
 
आठवणीने हे ग्रहण बघणारे जसे लोक होते तसे कित्येक जण ग्रहण काळात घराबाहेर न पडणारे, अन्न न शिजवणारे, इतकेच नाही तर शिजवलेले अन्न त्या काळात न खाणारे सुद्धा असणार, या बद्दल मला शंका नाही. या लोकांमध्ये शिकलेले – न शिकलेले, शिकलेल्यांमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतलेले सुद्धा, स्त्री- पुरुष, स्त्रियांमध्ये गरोदर स्त्रिया विशेष करून, असे सर्व स्तरातील लोकं असणार! जरा आजूबाजूला डोळे आणि कान उघडे ठेवून वावरले तर याची सत्यता पटेल. IT मध्ये job करणाऱ्या एका मुलीने ग्रहण काळात काही खायचे नाही हा नियम तंतोतंत पाळलेला मला माहिती आहे. (बहुदा दुसऱ्या गावी राहणाऱ्या तिच्या आईने फोन करून बजावलेलं असावं असा माझा अंदाज).
 
फक्त अशा विशिष्ट काळासाठीच असे ‘ करावे – न करावे ‘ नियम असतात असं नाही म्हणता येणार. प्रत्येकाची अशी कधी छोटी तर कधी मोठी यादी असते. काही गोष्टी खूप common असतात. उदा. तीन तिगाडा – काम बिगाडा. लहानपणी असं तिघांनी कुठे जायची वेळ आली तर बरोबर चौथा खडा घेतलेला आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल. बाहेर निघालेल्या व्यक्तीला, कुठे जाताय? असं न विचारणं, कारण असं विचारलं तर काम होत नाही, अशी मान्यता होती. अशा गोष्टींना प्रत्येक वेळेस विज्ञानाच्या निकषावर कुठे पारखले जाते?
 
ज्यांना आपण पुढारलेले देश समजतो तेही याबाबतीत अपवाद म्हणता येणार नाहीत. अन्यथा अशा काही देशांमध्ये बहुमजली इमारतींमध्ये १३ वा मजला का नसावा? म्हणजे मजला १३ वा असतो पण त्याला तो क्रमांक दिला जात नाही. १२ A किंवा एकदम १४ वा क्रमांक असतो.
 
आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अशा काही गोष्टी असतात. ठराविक पेन हे परीक्षेसाठी lucky पेन असणे, एखादे महत्त्वाचे काम करताना ठराविक कपडे घालणे किंवा ठराविक रंगाचे कपडे घालणे, एखादा ठराविक पोशाख, शर्ट किंवा साडी नेसल्यावर काम न होणे अशी बरीच यादी करता येईल. काही काही गोष्टी या त्या व्यक्ती पुरत्या मर्यादित असतात. सहज आठवणारे उदाहरण म्हणजे एखाद्या खेळाडूची विशिष्ट वर्तणूक. उदा. सचिन तेंडूलकर त्याचे शतक झाले की, मगच हेल्मेट डोक्यावरून काढतो, त्या आधी काढत नाही. एखादा खेळाडू ठराविक क्रमांकाचीच जर्सी घालतो. पायाला pad बांधताना आधी डाव्या पायालाच बांधतो इत्यादी.
 
सिनेसृष्टीत तर अशी उदाहरणे शेकड्याने सापडतील. ठराविक अक्षराने सुरु होणारी चित्रपटाची नावे हे लगेच आठवणारे नेहमीचे उदाहरण म्हणता येईल. तारे तारकांनी आपल्या नावात काही अक्षरे जास्त घालणे हे पण एक नेहमीचे उदाहरण आहे.
 
आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात पण अशा काही वैयक्तिक मान्यता असतात. एखाद्या कृतीनंतर जर एखादी दुखः द किंवा अवांछनिय घटना घडली तर ती कृती हेतुतःच टाळली जाते. एखादा विशिष्ट वार, एखादी तारीख, एखादा क्रमांक, एखादी विशिष्ट व्यक्ती सोबत असणे किंवा नसणे, एखादी व्यक्ती वाटेत भेटणे असं काहीही त्या यादीत असू शकतं.
वर उल्लेखलेल्या कोणत्याही गोष्टी शास्त्रीय कसोटीवर कधीच खऱ्या ठरू शकत नाहीत.पण माणसाच्या वर्तणूक शास्त्रावर मात्र त्या आधारित आहेत. स्वतःला आलेल्या अनुभवांवर आधारित अशा या ‘ करावे – ना करावे ‘ गोष्टी आहेत हे नक्की. एखादी अशी कृती आणि त्यानंतर आलेला बरा वाईट अनुभव आणि नंतर त्याचीच झालेली पुनरावृत्ती, ही घटना मानवी मेंदूत त्याचा एकमेकांशी सहसंबंध स्थापन करत असावी आणि त्यामुळेच या गोष्टींची सांगड घातली जात असावी.
 
यश मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतातच पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टी अनुकूल घडाव्यात अशी सर्वांचीच सुप्त इच्छा असते. आपल्या कार्यात विघ्न येऊ नये असं सर्वांनाच वाटतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी निर्विघ्नतेचा दिलासा मिळत असावा आणि त्यामुळेच पुर्वानुभवानुसार अशा काही गोष्टी करण्याची तर काही हेतुतः टाळण्याची स्वाभाविक प्रवृत्ती होत असावी.
 
जोपर्यंत या गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित असतात तो पर्यंत सामाजिक स्तरावर त्या निरुपद्रवी असतात. पण जेंव्हा या प्रवृत्तीचा अतिरेक होतो तेंव्हा त्या अंधश्रद्धेचं अक्राळविक्राळ रूप धारण करतात. त्यातूनच एखादीला पांढऱ्या पायाची ठरवणं, अपशकुनी ठरवणं, चेटकीण ठरवणं अशा विघातक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या मान्यता जन्म घेतात. आपल्या अपयशाची तर्कसुसंगत कारणमीमांसा करण्या ऐवजी अशा गोष्टींवर खापर फोडण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळेच अशा गोष्टींना किती महत्त्व द्यावं याचं तारतम्य बाळगणं फार आवश्यक आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये!
 
- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@