कलाकार घडवणारा ‘आनंद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018   
Total Views |

 

 
 
 
एखाद्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल, तर त्या कार्यशाळेच्या शुल्काचा आकडा ऐकूनच अनेकांना आपला विचार बदलावा लागतो. परिणामी, अनेक गुणवंत कलाकार इच्छा असूनही अभिनय क्षेत्राकडे कधी वळतच नाहीत. हीच गोष्ट आनंद बच्छाव यांनी हेरली.
 

ज्या गावात कोणे एकेकाळी साधा टीव्हीदेखील पाहिला नव्हता, अशा काळात त्याच गावातील एक व्यक्ती गावाबाहेर जाते आणि एक दिग्दर्शक बनून परत येते. ऐकायला एखाद्या कथेसारखे जरी वाटत असले तरी, अनेक कलाकारांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे मराठी दिग्दर्शक म्हणजे आनंद बच्छाव! नाशिकजवळील माल्हेगाव नावाच्या एका लहानशा खेड्यात आनंद बच्छाव यांचा जन्म झाला. खरेतर लहानपणापासूनच दोन वेळच्या जेवणाचीही शाश्वती नसायची. परंतु, अत्यंत जिद्दीने बिकट अशा आर्थिक परिस्थितीवर मात करून आनंद दिग्दर्शक झाले. आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक उमद्या मनाचा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे.

 

मनोरंजनसृष्टीतील ग्लॅमर अनेकांना आपल्याकडे आकर्षित करते. या ग्लॅमरच्या आकर्षणापोटी अनेकजण पडद्यावर झळकण्याची स्वप्ने पाहू लागतात. परंतु, एखाद्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल, तर त्या कार्यशाळेच्या शुल्काचा आकडा ऐकूनच अनेकांना आपला विचार बदलावा लागतो. परिणामी, अनेक गुणवंत कलाकार इच्छा असूनही अभिनय क्षेत्राकडे कधी वळतच नाहीत. हीच गोष्ट आनंद बच्छाव यांनी हेरली. आनंद यांनी ‘एबीसीएल’ या अभिनय अभिनयाचे धडे देणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अभिनय शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत किरकोळ शुल्क आकारले जाते. त्यातूनही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नसेल, तर त्यांना शुल्कामध्ये सवलत दिली जाते. तसेच वेळप्रसंगी अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आनंद यांच्या संस्थेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. सध्या ‘एबीसीएल’ या संस्थेमधील ८० हून अधिक कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून अनेकजण कलाकार होण्यासाठी शहरात येतात. परंतु, अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातून ग्रामीण भागात जाण्याचा उलटप्रवासही काही कलाकार आज करताना दिसतात. ‘एबीसीएल’मध्ये आज असे अनेक विद्यार्थी पाहायला मिळतील, ज्यांनी हा उलटप्रवास केला आहे.

 

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘निर्भया’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आनंद बच्छाव यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. अत्यंत ज्वलंत असा विषय संवेदनशीलपणे मांडणे ही कला आनंद बच्छाव यांना उत्तमरीत्या अवगत आहे. आनंद सांगतात की, “निव्वळ आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने अनेकजण चित्रपटाची निर्मिती करतात. परंतु, त्यापैकी सामाजिक संदेश देणारे चित्रपट हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात.” आनंद बच्छाव यांनी दिग्दर्शित केलेला ‘घुंगराच्या नादात’ चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री दीपाली सय्यद आणि अभिनेता संजय खापरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

 

मनोरंजन क्षेत्राबद्दल आजच्या काळातही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. यामुळेच अनेक पालक आजही आपल्या मुलींना अभिनय क्षेत्राकडे वळू देत नाहीत. त्यामुळे त्यांचे करिअर इतर क्षेत्रात घडते खरे. परंतु, मनाजोगे करिअर निवडता न आल्याची खंत अशा मुलींना आयुष्यभर बोचत राहते,” असे आनंद यांनी बोलून दाखवले. आनंद स्त्रियांबाबतीत म्हणतात की, “स्त्री ही एक मुलगी, एक बहीण, एक पत्नी, एक आई अशा अनेक भूमिका बजावत असते. त्यामुळे स्त्रियांचा आदर हा करायलाच हवा.” आनंद बच्छाव यांच्या अभिनय संस्थेत आज अनेक मुली अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहेत. या मुलींना रात्री उशीर झाल्यास घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली जाते. आनंद बच्छाव यांच्या या कृतीतूनच आपली मुलगी सुरक्षित ठिकाणी शिकत आहे, याची हमी पालकांना मिळते. परिणामी, पालक आपल्या मुलींना अभिनयासाठी प्रोत्साहन देतात.

 
आजच्या काळातील स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात काम करताना दिसते. परंतु, स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण आधी एक माणूस आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे आणि माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे,” असा संदेश आनंद बच्छाव देतात. आज अनेक ठिकाणांहून विद्यार्थी आनंद बच्छाव यांच्या संस्थेत अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. ‘एबीसीएल’ अंतर्गत दरवर्षी एका विशेष कार्यशाळेचे आयोजनही केले जाते. या कार्यशाळेत ऑडिशन कशी द्यावी, याची सर्व तयारी ते विद्यार्थ्यांकडून करून घेतात. आज ‘एबीसीएल’ नावारुपास येत आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आनंद बच्छाव यांना जाते. कारण, ज्या गावात लोकांना साधा टीव्हीदेखील माहीत नव्हता, त्याच गावात अभिनयाचे प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करण्याचे कठीण काम आनंद बच्छाव यांनी करून दाखविले. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आनंद यांनी स्पॉटबॉयपासून ते प्रोडक्शनपर्यंत अनेक कामे केली. कोणतेही काम कमी नसते, असे मानल्यामुळेच आज ते दिग्दर्शक होऊ शकले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@