दासबोध दर्शन (पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



मूळ दासबोध ग्रंथाची रचना कशी झाली, हा ग्रंथ नेमका कोणत्या ठिकाणी लिहिला गेला किंवा तो वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिला गेला व त्यांचे नंतर संकलन करण्यात आले. यासंबंधी विश्वसनीय कागदोपत्री पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात त्यातील हकिकतीच्या आधारे अनुमानावर भर द्यावा लागतो.


भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ समाजाच्या समोर असतानाही दासबोध ग्रंथ रामदासांना स्वतंत्रपणे सांगावा लागला. दासबोध हा ग्रंथ गीता किंवा भागवत अशा संस्कृत ग्रंथांवर टीका लिहावी, अशा स्वरूपाचा नाही. त्यामुळे दासबोधात अनेक तात्त्विक स्फूट रचना यांची सरभेसळ झाली आहे. रामदासांनी अनेक संस्कृत, प्राकृत ग्रंथांचे वाचन केले होते. तत्संबंधी श्रवण केलेले होते, मनन केले होते, मृत्यू म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील विचारांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली होती, त्यांच्या ग्रंथरचनेची प्रेरणा ही प्रामुख्याने आत्मप्रचिती आहे. हे दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी स्पष्ट केले आहे.

 

नाना ग्रंथांच्या संमती।

उपनिषदें वेदान्त श्रुती।

आणि मुख्य आत्मप्रतिती। शास्त्रेसहीत॥

 

दासबोधाचे तत्कालीन महत्त्व तारतम्याने समजून घेतले पाहिजे. ऐन युद्धप्रसंगी शस्त्रे खाली ठेवणाऱ्या अर्जुनाला महाभारतकाली भगवान श्रीकृष्णांनी भगवतद्गीतेद्वारे उपनिषद, वेदांतील भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा उलगडून दाखवला. अर्जुनाला मोहापासून दूर करून त्याला दुष्ट कौरवांशी युद्ध करण्यास प्रवृत्त केले. अर्जुनाच्या मनात अकाली उत्पन्न झालेला मोह भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे तत्त्वज्ञान सांगून दूर केला. अर्जुनाच्या निमित्ताने निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णांनी तुम्हा-आम्हा सर्वांना सांगितले. तो सर्व खटाटोप, अर्जुनाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला मोह दूर करण्यासाठी केला होता. भगवद्गीतेच्या अखेरीस अर्जुन कबूल करतो की,

 

नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव॥

 

(तुझ्या कृपेने माझा मोह नष्ट झाला, मला माझ्या कर्तव्याची आठवण झाली, माझा संशय संपून मी तुमच्या आज्ञेप्रमाणे वागेन.) भगवान श्रीकृष्णामुळे अर्जुनाला आपल्या कर्तव्याची लख्ख जाणीव झाली. तथापि महाभारत कालखंड आणि समर्थांच्या वेळचा काळ, त्याकाळची परिस्थिती यात खूप अंतर होतेमहाभारतकालीन युद्ध झाले त्यात राजघराण्यातील गृहकलह महत्त्वाचा होता. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही, अशी दर्पोक्ती दुर्योधनाने केली होती. पांडवांच्या न्याय्य हक्कांसाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत केले. महाभारतकालीन युद्धात दोन्ही पक्षं युद्धासाठी समोरासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा धर्म, संस्कृती एक होती. युद्धनीतीचे नियम दोन्ही पक्ष पाळत होते. राज्यसंस्था अस्तित्वात होती. परंतु, रामदासकालीन परिस्थिती यापेक्षा कितीतरी वेगळी होती. म्लेच्छांचे राजकीय आक्रमण सर्व सांस्कृतिक मूल्यांना पायदळी तुडवून चालले होते. राज्यसंस्था भ्रष्ट झाली होती. ती म्लेच्छांच्या हाती होती. हिंदू प्रजेला छळण्यासाठी त्या राज्यसत्तेचा उपयोग होत होता. त्याचबरोबर सांस्कृतिक आक्रमणाचा मोठा धोका होता. लोक बाटवले जात होते. छळाला कंटाळून काही लोक मुसलमान धर्म स्वीकारत होते. हिंदू संस्कृती वाचवणे अगत्याचे होते. एकंदर हिंदू समाज मरगळलेल्या स्थितीत होता. अशा परिस्थितीत लोकांना फक्त निष्काम कर्मयोग किंवा ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या सारखा उपदेश देऊन येणाऱ्या राजकीय, सांस्कृतिक संकटांना तोंड देणे कठीण होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीला ज्या निरुपणाची आवश्यकता होती, त्या भाषेत रामदासांनी आपल्या तत्त्वाज्ञानाची मांडणी दासबोध व इतर ग्रंथांतून केली. रामदासांच्या एकंदर उपदेशात निष्काम कर्मयोगाची शिकवण आहे. पण त्यांची निरुपणाची पद्धत वेगळी होती. त्या शिकवणीत राष्ट्रप्रेमाचा, हिंदू संस्कृती रक्षणाचा आणि क्षात्रतेजाचा उपदेश होता. आपली संस्कृती त्यांना वाचवायची होती.

 

शेकडो वर्षांचा निवृत्तीवादाचा पगडा हिंदू समाजावर पडलेला होता. त्यातून त्यांना बाहेर काढून रामदासांना समाजाला युयुत्सू करायचे होते. त्यांच्यातील ‘आप-पर’ भाव जागृत करायचा होता. निवृत्तीवादामुळे लोक ‘आप-पर’ विसरले होते. त्याचप्रमाणे रामदासांना लोकांतील क्षात्रवृत्ती जागी करायची होती. त्यासाठी आपल्या तत्त्वज्ञानातून कोदंडधारी रामाचा आदर्श समोर ठेवून त्यांनी क्षात्रतेजावर भर दिला. असं असलं तरी, भारतीय तत्त्वज्ञानाच्या संस्कृतीच्या नीतीमानता आणि धर्मस्थापना भक्ती या मूल्यांना त्यांनी कुठेही सोडून दिले नव्हते, दासबोधात त्यांनी हे अधिक स्पष्ट केले आहे. दासबोधातील विचारांबाबत रामदास स्पष्टपणे सांगतात की, ‘भगवद्वाक्याविरहित नसे येथीचे बोलणे.’ दासबोध ग्रंथ हा रामदासी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असल्याने त्या संबंधी काय काय माहिती गोळा करता येईल, याचा शोध घ्यायचा आहे. या दासबोध ग्रंथाचे आकार कसा घेतला हे पाहणे उद्बोधक ठरेल. सध्या आपल्याला उपलब्ध असलेला दासबोध २० दशके व २०० समास असलेला आहे. ही दासबोधाची सुधारित आवृत्ती आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. मूळ दासबोध ग्रंथाची रचना कशी झाली, हा ग्रंथ नेमका कोणत्या ठिकाणी लिहिला गेला किंवा तो वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिला गेला व त्यांचे नंतर संकलन करण्यात आले. यासंबंधी विश्वसनीय कागदोपत्री पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात त्यातील हकिकतीच्या आधारे अनुमानावर भर द्यावा लागतो. दासबोधातील समासांची रचना करताना तो समास कोणत्या तारखेला, तिथीला, कोणत्या स्थानी लिहिला हे रामदासांकडून किंवा त्याचे लेखन करणाऱ्या कल्याणस्वामींकडून अपेक्षित नव्हते. त्या काळच्या पंडितांनी रामदासांसारख्या महान विभूतींची त्यांच्या कार्याची वाङ्मयीन दखल घ्यायला हवी होती. असाही एक विचार मनात येतो की, कदाचित समकालीन पंडितांनी रामदासांच्या वाङ्मयीन कार्याचा गौरव केला असेल, त्या संबंधी लिहिले असेल. पण, नंतरच्या काळातील राजकीय पडझडीत हे पुरावे शिल्लक राहिले नसतील. इतिहास सांगतो की, इ.स.१२०६ मध्ये बख्त्यार खिलजीने बंगाल व बिहार प्रांत जिंकून घेतले. त्यावेळी त्याने येथील विहारातील बुद्धभिक्षूंची व सापडतील त्या ब्राह्मणांची विनाकारण हत्या केली. हे बुद्धभिक्षू व ब्राह्मण राजकीयद़ृष्ट्या निरुपद्रवी होते. या खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावून दिली. तेथील ग्रंथसंपदा सहा महिने जळत होती. तेथील विद्वत्ता, सदाचरण, वैराग्य या मूल्यांना रानटी व हिंस्र आक्रमणांमुळे काहीही किंमत राहिली नाही. या घटना रामदासांच्या ४०० वर्ष पूर्वीच्या असल्या तरी, नंतरच्या काळात या अत्याचारांचे प्रमाण वाढतच गेले. रामदासानंतरच्या काळातही त्यांनी हिंदुस्थानावर स्थापन केलेल्या ११०० मठांपैकी काही अपवाद वगळता, बहुतेक सारे नष्ट झाले. त्या मठांतून जतन केलेले कागदपत्र-साहित्यही काळाच्या ओघात नाश पावले, हे आमच्या दृष्टीने मोठे दुर्दैव होय. असो. उपलब्ध पुराव्यातून दासबोध निर्मिती कशी, कुठे, केव्हा झाली हे पुढील लेखात पाहू.

 

-सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@