राजस्थान : गटबाजीचा कॉंग्रेसला फटका बसणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून 200 जागांसाठी शुक्रवार 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये भाजपा आपली सत्ता कायम राखणार की राज्यातील परंपरेनुसार कॉंग्रेस सत्ता हस्तगत करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाला यावेळी बहुमत मिळाले तर वसुंधरा राजे यांना एकूण तिसर्यांदा आणि सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे. सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी राजस्थानमध्ये याआधी भाजपाचे भैरोसिंह शेखावत यांना मिळाली होती. शेखावत यांनी एकूण तीनदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. यापैकी एकदा जनता पक्षाचे नेते म्हणून तर दोनदा भाजपाचे नेते म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. रालोआच्या काळात देशाचे उपराष्ट्रपती होण्याचा बहुमानही भैरोसिंह शेखावत यांना मिळाला होता. कॉंग्रेसचे मोहनलाल सुखाडिया यांनी सलग चारवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. सर्वाधिक काळ राजस्थानचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही सुखाडिया यांच्या नावावर आहे. सुखाडिया आपल्या चार कार्यकाळात 6038 दिवस राजस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांचा हा विक्रम अजूनतरी अबाधित आहे. कॉंग्रेसचे सी. एस. वेंकटचारी सर्वात कमी काळ म्हणजे फक्त 110 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते.
 
 
मोहनलाल सुखाडिया यांच्या खालोखाल भैरोसिंह शेखावत यांनी तीन कार्यकाळ मिळून 3808 दिवस राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले. मात्र मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांना एकदाच पूर्ण करता आला. जनता पक्षाच्या कार्यकाळात भैरोसिंह शेखावत पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 22 जून 1977 ते 16 फेब्रुवारी 1980 या काळात शेखावत मुख्यमंत्री होते. शेखावत यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ 970 दिवसांचा होता. 4 मार्च 1990 ला शेखावत दुसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 15 डिसेंबर 1992 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. शेखावत यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ 1017 दिवसांचा होता. 4 डिसेंबर 1993 ला शेखावत तिसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 29 नोव्हेंबर 1998 पर्यंत म्हणजे 1821 दिवस ते मुख्यमंत्री होते. भैरोसिंह शेखावत यांचे सरकार दोनदा बरखास्त करण्यात येऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे पतन होत केंद्रात इंदिरा गांधी यांची सत्ता आली. इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. यात राजस्थानमधील भैरोसिंह शेखावत यांचे सरकार 16 फेब्रुवारी 1980 ला बरखास्त करण्यात आले. 16 फेब्रुवारी ते 6 जून 1980 या काळात राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट होती.
 
 
1992 मध्ये अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्यात आल्यानंतर भैरोसिंह शेखावत यांचे सरकार दुसर्यांदा बरखास्त करण्यात आले. 15 डिसेंबर 1992 ते 4 डिसेंबर 1993 या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट होती. मात्र यानंतर झालेल्या निवडणुकीत भैरोसिंह शेखावत यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आणि शेखावत तिसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 29 नोव्हेंबर 1998 पयर्र्ंत शेखावत राज्याचे मुख्यमंत्री होते. 1998 पासून मात्र राजस्थानच्या जनतेने सलग दुसर्यांदा कोणत्याच राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. 1998 ते 2013 या चार निवडणुकीत राज्यात आलटून पालटून कॉंग्रेस आणि भाजपा यांना जनतेचा कौल मिळाला आहे. 1998 आणि 2008 मध्ये राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती, तर 2003 आणि 2013 मध्ये भाजपाची. हीच परंपरा जनतेने यावेळीही कायम ठेवली तर यावेळी कॉंग्रेसला सत्ता मिळायला पाहिजे. मात्र राजकारणात कधी काय होईल, मतदार कसा विचार करतील, हे कोणीच सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू राहात नाही, तसेच जनतेच्या कौलाचेही होऊ शकते.
 
यावेळी तिसर्यांदा वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर त्या भैरोसिंह शेखावत यांचे दोन विक्रम मोडू शकतात. शेखावत यांचा पहिला विक्रम सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याचा तर दुसरा विक्रम मोहनलाल सुखाडिया यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात वसुंधरा राजे 1831 दिवस मुख्यमंत्री होत्या. राजे यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ तेवढाच आहे. त्यामुळे शेखावत यांचा 3808 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्या सहज मोडू शकतात. विशेष म्हणजे राजे यांनी दोनदा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, ज्याची शक्यता अतिशय कमी आहे, ते सुद्धा शेखावत यांचा विक्रम मोडू शकतात. मात्र सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मोहनलाल सुखाडिया यांचा विक्रम गहलोत यांना कधीच मोडता येणार नाही. कारण त्यासाठी चारवेळा गहलोत यांना मुख्यमंत्री व्हावे लागणार आहे. गहलोत तिसर्यांदाच मुख्यमंत्री व्हायची शक्यता नसल्यामुळे ते चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
 
 
राजस्थानमध्ये भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे, विशेष म्हणजे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. बसपा, आप, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, भारतवाहिनी पार्टी आणि अन्य राजकीय पक्षांनीही राजस्थानमध्ये पूर्ण ताकद पणाला लावल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दिल्लीव्यतिरिक्त कुठेच ताकद नसलेली दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी राजस्थानमध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. केजरीवाल यांच्या आपने याआधी पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते. राजस्थानमध्ये सुद्धा आपच्या बाबतीत यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही. राजस्थानमध्ये भाजपाला सुरुवातीला असलेले प्रतिकूल वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी झंझावाती प्रचार सभांनी बदलले आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही प्रचारातून जनतेची नाराजी दूर केली. उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर भाजपात काही प्रमाणात बंडखोरी झाली होती. उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे अनेक मंत्र्यांनी तसेच आमदारांनी भाजपाविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले होते. पण यातील अनेकांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावण्यात भाजपाचे राज्यातील नेते यशस्वी झाले. भाजपाचे नेते आपसातील मतभेद विसरून एकदिलाने प्रचारात सहभागी झाल्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसला बंडखोरीची लागण उमेदवार निश्चित केल्याच्या दिवसापासूनच झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसला आपले उमेदवारही निश्चित करता येत नव्हते. कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर तर कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. आपल्या बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यात कॉंग्रेसचे नेते यशस्वी झाले नाहीत. कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी असलेले अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोन दावेदार आणि त्यांच्यातील शहकाटशह यामुळे कॉंग्रेसची बाजू कमजोर झाली. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सचिन पायलट अशा दोन गटात राज्यातील कॉंग्रेस विभाजित झाली. त्यांचा फटका कॉंग्रेसला निश्चितच बसणार आहे. सत्ता मिळण्याची दूरदूरपर्यंत कोणतीच शक्यता नसताना मुख्यमंत्रिपदासाठी गहलोत आणि पायलट यांच्यातील मतभेद आणि संघर्ष म्हणजे ‘बाजारात तुरी आणि ...’ यासारखा आहे. कॉंग्रेसच कॉंग्रेसला पराभूत करत असते, कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी दुसर्या कोणाची गरज नाही, असे म्हटले जाते, याचे प्रत्यंतर राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीतून येणार आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@