
मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या १६ टक्के आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर रहावे लागेल, असे निर्देश बुधवारी न्यायालयाने दिले आहेत.
मराठा आरक्षण विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी बुधवारी सकाळी न्यायालयात न्यायाधीश नरेश पाटील यांच्यासमोर अॅड. जयश्री पाटील यांनी या याचिकेचा उल्लेख केला. मात्र, याचिकेकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख असल्याने न्यायालयामध्ये बाजू मांडताना त्यांची उपस्थिती आवश्यक आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले. दरम्यान, जयश्री पाटील या गुणवर्ते यांच्या पत्नी सुनावणीवेळी हजर होत्या.
न्यायालयाने त्यांच्या उल्लेखावर आक्षेप घेतला याचिकादाराने स्वतः न्यायालयात येऊन बाजू मांडावी, असे स्पष्ट केले. आता दुपारच्या सत्रात अॅड. सदावर्ते येऊन याचिकेचा उल्लेख करतील, अशी शक्यता आहे. त्यांना धमक्या येत असल्यामुळे ते उपस्थित नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, जी न्यायालयीन तरतूद आहे. त्यानुसार काम होणे आवश्यक आहे, असे मुख्य न्यायमूर्तींनी सांगितले.
मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांत १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनलीस्ट कॉन्सिलच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आता सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/