सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन

    30-Dec-2018
Total Views |

 


 
 
कोलकाता : ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचे आज सकाळी १०: ३० वाजता राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मृणाल सेन यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व हरपले. त्यामुळे सिनेसृष्टीतील एका युगाचा आज अंत झाला. अशी भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
 

सध्या बांगलादेशात असलेल्या फरीदपूरमध्ये १४ मे १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. १९५५ साली रात भोर या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. १९६० साली प्रदर्शित झालेल्या नील आकाशेर नीचे’ या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख प्राप्त झाली. ‘बाइशे श्रावण’ या सिनेमामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. ‘मृगया’ या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. अभिनेता मिथुन चक्रवती यांनी या सिनेमातून पदार्पण केले होते.

 
 
 

दिग्दर्शक मृणाल सेन यांना आजवर तब्बल २० राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मृणाल सेन यांच्या सिनेमांची दखल घेण्यात आली होती. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना १९७९ साली नेहरू-सोव्हिएत लँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००२ साली मृणाल सेन यांनी आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी ‘अमर भुवान’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच सिनेसृष्टीतील मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

 
 
 

७०-८० च्या दशकामध्ये सुरु झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मृणाल सेन विद्यार्थी असताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघनेच्या सांस्कृतिक आघाडीवर मृणाल सेन सक्रिय होते. परंतु त्यांनी कधीही डाव्या पक्षाचे सभासदस्यत्व स्वीकारले नाही. ‘इप्टा’ या सांस्कृतिक संघटनेत दिग्दर्शक मृणाल सेन सक्रिय होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिग्दर्शक मृणाल सेन यांना श्रद्धांजली वाहिली.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/