वर्षाअखेर स्वप्नपूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
पाश्चिमात्त्य देशांमध्ये नाताळ आणि त्यानंतर येणाऱ्या नववर्षाला विशेष महत्त्व. त्यामुळे नाताळनंतरचा दुसरा दिवस हा या देशांमध्ये ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवसात होणारे कोणत्याही खेळाचे सामने हे खास मानले जातात आणि या दिवसातला पराभव हा पाश्चिमात्त्य खेळाडूंच्या जास्त जिव्हारी लागतो. जवळजवळ ३४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मैदानावर यजमानांना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशीच हरवत विराटसेनेने वर्षाअखेर स्वप्नपूर्ती केली. ऑस्ट्रेलियावर १३७ धावांनी मात केल्यानंतर भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत झालेला हा पराभव ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला. हा सामना खऱ्या अर्थाने ‘काँटे की टक्कर’ असा काहीसा झाला. भारत हा सामना चौथ्याच दिवशी जिंकेल, असे जरी वाटत असले तरी, ऑस्ट्रेलियांच्या पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन या गोलंदाजांनी चिवट फलंदाजी करत भारताचा विजय लांबवला. अखेरच्या दिवशी पहिलं सत्र पावसामुळे वाया गेलं, मात्र सामना सुरू झाल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला पुन्हा डोकं वर काढण्याची संधी न देताच सामन्यावर शिक्कामोर्तब केले. या संपूर्ण मालिकेत भारतासाठी चेतेश्वर पुजारा महत्त्वाचे आकर्षण ठरत असला तरी, या सामन्यात निवड समितीने केलेल्या यशस्वी बदलांमुळे मयंक अग्रवाल आणि हनुमान विहारी यांनी भारताला दोन्ही सत्रांत चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्याच सत्रात भारताने ४०० डावांचा डोंगर उभा केला, जो पार करणे ऑस्ट्रेलियाला जमले नाही. भारताच्या फलंदाजांनी आपले यशस्वी प्रयत्न केले असले, तरी या सामन्याचे खरे मानकरी ठरले ते मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ असं आपण म्हणतो, पण या तिघाडीनेच भारताला अगदी सहज विजयाच्या दारात नेऊन ठेवले. या सामन्यात अनेक विक्रम, पराक्रमांची नोंद झाली असली तरी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चिडीचा डाव खेळण्याच्या सवयीमुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाची खेळाडू वृत्ती दिसली नाही. असो, पुढचा सामना सिडनीमध्ये होत असला तरी, भारत ही कसोटी मालिका जिंकत नववर्षाची सुरुवात करण्यास नक्कीच उत्सुक असेल.
 

बुडत्याचा पाय खोलात...

 

सर्वात श्रीमंत आणि बक्कळ पैसे असलेलं एकमेव क्रिकेट बोर्ड म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय). मात्र, तरी नेहमी अडचणीत येणारे हे बोर्ड सदैव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला पाचारण करत असते. मात्र, यावेळी आयसीसीनेच बीसीसीआयला अडचणीत टाकले आहे. याआधी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात झालेल्या वादात आयसीसीच्या तंटा निवारण लवादाने बीसीसीआयच्या पारड्यात आपले वजन टाकले. मात्र, यानंतरही २०२३ साली होणाऱ्या क्रिकेट यजमानपदाचे हक्क बीसीसीआयला गमवावे लागणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. कारण, २०१६ साली भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान आयसीसीने बीसीसीआयकडे १३१ कोटी करमुक्तीची भरपाई करण्याची मागणी केली आहे आणि हे पैसे बीसीसीआयने न भरल्यास अर्थातच बीसीसीआयला कोणत्याही सामन्याचे यजमानपद भूषविता येणार नाही, असे ठरले. २०१९ चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असून भारताने, २०२३ चा विश्वचषक भारतात व्हावा म्हणून आधीच आयसीसीकडे तगादा लावला होता. मात्र, यावेळी आयसीसीने कोणतीही सबब न देता, २०२१ चे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ साली होणारा विश्वचषक यांचं यजमानपद भारताला न देण्याची जणू धमकीच दिली आहे. करमुक्तीच्या भरपाईसाठी आयसीसीकडून ३१ डिसेंबर ही तारीख बीसीसीआयला देण्यात आली होती. अर्थातच, ही तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. या सगळ्या अडचणीत बीसीसीआय असताना आता उच्च न्यायालयानेही बीसीसीआयला फटकारले, त्यामुळे बुडत्याचा पाय आणखी खोलात गेल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयात बीसीसीआयची नोंदणी रद्द करण्यात यावी, याकरिता एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना विभागीय खंडपीठाने बीसीसीआयला नोटीस बजावली आणि बीसीसीआयला भारतीय क्रिकेटचं प्रतिनिधित्व करायचा अधिकार कुणी दिला, असे विचारत बीसीसीआयची पार पिसंच काढली. परंतु, बीसीसीआयने नेहमीच खाजगी संस्था असल्याचा दावा केला. त्यामुळे बीसीसीआयने आपली मक्तेदारी करू नये, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. त्यामुळे चहूबाजूंनी कोंडी झालेल्या या भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी येणारे वर्ष नक्कीच संकटात जाण्याची शक्यता आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@