बांगलादेशची बेगम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2018   
Total Views |



 
 
कालच्या रविवारीच बांगलादेशमध्ये मतदान झाले आणि निवडणूक मतचाचण्यांनीही चौथ्यांदा शेख हसीनाच बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार, असे भाकीत वर्तविले आहे. खरंतर, बांगलादेशची सद्यस्थिती पाहता, शेख हसीनांचा विरोधी दावेदार म्हणून दुसरा चेहराच नाही.
 
 
राजकारणाच्या जागतिक नकाशावर नजर टाकली असता, वर्तमानात एक गोष्ट प्रामुख्याने दखलपात्र ठरते. ती म्हणजे, हल्लीचा काळ हा राजकीय पक्षांचा नसून तो पक्षनिष्ठेकडून व्यक्तिनिष्ठेकडे झुकलेला दिसतो. याचा प्रत्यय खरंतर २०१४ साली भारतीय निवडणुकांच्या निकालांतून प्रतिबिंबित झाला. त्यानंतर झालेल्या जागतिक निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली असता, हे अगदी सहज लक्षात येते की, मतदारांनी अतिशय खमक्या, त्यांचा विकास, त्यांची प्रगती साधू शकेल, अशाच उमेदवारांना सत्तेच्या चाव्या सोपवल्या. रशियातले पुतीन, अमेरिकेचे ट्रम्प, फ्रान्सचे मॅक्रोन, जर्मनीच्या अँजेला मर्केल आणि नाही म्हटले तरी शेजारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान. थोडक्यात, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम रोजगारांच्या संधींसाठी आणि आपल्या देशात शांतता प्रस्थापित व्हावी, या तीन मुद्द्यांवर सर्वाधिक भर देत मतदारांनी आपला वेळोवेळी कौल दिला. तेव्हा, जागतिक स्तरावरील मतदानाचा हा ‘युवा पॅटर्न’ बांगलादेशमध्येही दिसून येतो. कालच्या रविवारीच बांगलादेशमध्ये मतदान झाले आणि निवडणूक मतचाचण्यांनीही चौथ्यांदा शेख हसीनाच बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार, असे भाकीत वर्तविले आहे. खरंतर, बांगलादेशची सद्यस्थिती पाहता, शेख हसीनांचा विरोधी दावेदार म्हणून दुसरा चेहराच नाही. कारण, हसीनाबाईंच्या कडव्या विरोधक आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया या सध्या भ्रष्टाचारप्रकरणी ढाका तुरुंगात पाच वर्षांची शिक्षा भोगताहेत. झियांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला हसीनांच्या अवामी लिगचे तगडे आव्हान निवडणुकीपूर्वीही मोडीत काढता आले नाही.
 

हसीनांच्या लोकप्रियतेची, सुशासनाची चर्चा करण्यापूर्वी कोणे एकेकाळी हसीनांना कडवी झुंज देणाऱ्या खलिदा झिया यांच्या राजकीय अस्ताची थोडक्यात कारणमीमांसा करणे उचित ठरेल. खलिदा झिया १९९१-१९९६ आणि नंतर २००१-२००६ अशा दोनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होत्या. पण, त्यांच्या काळात घडलेल्या जातीय हिंसाचार, राजकीय कुरघोडींवर त्या मात करू शकल्या नाहीत. त्याचबरोबर सरकारी व्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी या देशाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दलही झिया यांची भूमिका ही अकार्यक्षम राहिली. झियांची दोन्ही मुलंही भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगून आली. त्यांच्या एका मुलाचा नंतर बँकॉकमध्ये मृत्यू झाला, तर सध्या दुसरा मुलगा लंडनहून पक्षाची सूत्रे हलवत असल्याची माहिती आहे. परिणामी, विरोधी अवामी लीगची ताकद प्रचंड वाढली आणि शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या आणि एकप्रकारे झिया यांच्या राजकीय अस्ताचा प्रारंभ तेव्हाच सुरू झाला.

 

सलग तिसऱ्यांदा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या हसीना बांगलादेशच्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या. हसीना यांच्या काळातही राजकीय हिंसाचार उफाळून आले. पण, चाणाक्ष, कणखर हसीनांनी या राजकीय हेतूने प्रेरित, देशविघातक हिंसाचारांना पुरते चिरडून टाकले. २०१८ मध्येच सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यासाठी बांगलादेशी तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. देशात पुन्हा जाळपोळ, हिंसाचाराची लाट उफाळून आली. पण, त्याही परिस्थितीत न डगमगता हसीनांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला. म्यानमारमधून बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्यांचा प्रश्नही हसीना यांनी गांभीर्याने हाताळल्यामुळे परिस्थिती आटोक्यात राहिली. त्यामुळे एक नेतृत्वकुशल, विकासाचे व्हिजन असलेल्या, राष्ट्रीय अस्मिता जागरूक असलेल्या हसीनाच चौथ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, यात शंका नसावी. जवळपास १० कोटी बांगलादेशी मतदारांनी मतपेटीत आपल्या भावी पंतप्रधानांचे भवितव्य सुनिश्चित केले आहेच, तेव्हा आता प्रतीक्षा आहे ती निकालाची... भारताबरोबरही शेख हसीना यांचे संबंध नेहमीच सौहार्दाचेच राहिले आहेत. त्यामुळे शेजारी देशात शेख हसीना यांच्या रूपात एक स्थिर, निरुपद्रवी, भारत-बांगलादेश संबंध अधिक बळकट करणारे सरकार नवीन वर्षात सत्तापदावर आरुढ होणे, चीनचा वाढता प्रभाव पाहाता कधीही द. आशियाई प्रदेशात अधिक हितावहच!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@