चहा एवढा कडू का लागतोय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018   
Total Views |



 

चहा... भारतीय भावविश्वाशी एकरूप झालेले एक हवेहवेसे पेय. गल्लोगल्ली, टपरीटपरीवर मिळणारा चहा चर्चांना तोंड फोडणारा... मनातील भावनांना वाट मोकळी करून देणारा... २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी या चहाला अधिकच उकळी आली. लहानपणी मोदी गुजरातमध्ये चहा विकायचे. ते चहावाले होते आणि पुढे हाच वारंवार ‘चायवाला’ म्हणून हिणवला गेलेला माणूस भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला. त्यामुळे चहा आणि मोदी हे जणू समानार्थी शब्द म्हणून रूढ झाले. मोदींचा ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रमही नंतर गाजला. एकूणच, या चहावाल्या मोदींनी समस्त भारतीयांचे मन जिंकले. हा चहावाला पंतप्रधान सर्वांना आपलासा वाटला. मोदी आणि भारतीयांची मने जोडणाऱ्या या चहारूपी दुव्याची पुन्हा एकदा खिल्ली उडविण्याचे काम ओवेसी बंधूंपैकी अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. तेलंगणमधील एका प्रचारसभेदरम्यान ओवेसी म्हणाले की, “मोदी चहावाले होते, आता नाहीत. आता ते पंतप्रधान आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखे वागावे.” ओवेसी बंधूंना मोदींची ही सर्वसामान्यांना भावणारी चहावाल्याची उपमा बोचणे तसे अगदी स्वाभाविक. कारण, मोदी या रझाकारांच्या वंशवल्लीला साहजिकच डोळ्यात खुपतात. पण, ओवेसी बंधूंनी एक बाब ध्यानात घ्यावी की, कोणाचाही भूतकाळ असा सहज पुसता येत नाही. मोदी आज चहावाले नसले तरी चहावाल्यांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे दु:ख त्यांनी ओवेसींच्या ऐशआरामी जीवनापेक्षा अधिक जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. गरिबीच्या झळा सोसत अपरिमित श्रम आणि स्वकर्तृत्वावर एक चहावाला आज पंतप्रधानपदी विराजमान आहे. हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद. पण, रझाकारांच्या या वंशजांना त्याचे मोल काय कळणार म्हणा... पण, ओवेसी असोत वा इतर विरोधक, त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की, मोदींच्या सर्वसामान्यतेवर जेवढे हे लोक चिखलफेक करतील, तेवढीच त्यांची प्रतिमा लोकमानसांत अधिक दृढ होईल. तेव्हा, मोदींचे आई-बाप काढणे, चहावाला म्हणून त्यांची सतत निंदा करणे यांसारख्या गोष्टी मतदारांनाही रुचणाऱ्या नाहीत. ‘मेरे मा-बाप पे मत जा, काम पे मत जाही भावना अजूनही जनमानसात तीव्र असल्यामुळे त्यांनी निवडून दिलेल्या पंतप्रधानालाही जर कोणी अशी दूषणे लावणार असेल, तर ते निश्चितच राजकीय वादावादीतही भारतीय मतदारांना रुचणारे कदापि नाही, ही बाब त्यांनी ध्यानात घ्यावी.

 

‘रागा’चा हिंदू राग...

 

वडणुका जवळ आल्या की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मंदिरवारी सुरू होते. आताही ज्या राज्यात ते प्रचारासाठी दाखल होतील, तिथल्या सुप्रसिद्ध मंदिरांत जाऊन देवदर्शनाची त्यांची लगबग माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद होतेच, मात्र मतदारांच्या हृदयात अजूनही राहुल गांधींच्या या ‘टेम्पल रन’ विषयी साशंकता आहेत. एरवी कधीही मंदिरात न जाणारी व्यक्ती निवडणुका येताच मंदिरात वारंवार कशी दिसते? मंदिरात गेल्याने खरंच हिंदूंची मने जिंकून त्यांची मते खिशात पाडता येतात का? हिंदू मतदारांसाठी त्यांचा आमदार, खासदार, नेता मंदिरात जाऊन देवासमोर नतमस्तक असणारा सश्रद्ध लोकप्रतिनिधीच हवा, अशी अट कुणी घातली आहे का? तर या सगळ्यांची उत्तरे साहजिकच ‘नाही’ अशी देता येतील. पण, तरीही ‘रागा’चा हा आटापिटा. पण, या प्रश्नांची उत्तरं खुद्द गांधी परिवाराच्या वारसाने दिली नसली तरी वाय आय एम हिंदू’ म्हणून पुस्तकी अक्कल पाजळलेल्या शशी थरूरने ‘रागा’च्या या देववाऱ्यांची कारणमीमांसा केली आहे. “मतांसाठी नाही, तर हिंदू धर्माचा आम्हाला आदर आहे, म्हणून राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात,” ही गांधी परिवाराच्या भक्ताची थरूरवाणी. म्हणजे, काँग्रेसवाल्यांवर आता इतकी वाईट वेळ ओढवलीय की, हिंदू धर्माचा आदर करतो याचा जणू आता दिखावा करण्यासाठी राहुलला मंदिरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. थरूर म्हणतात, त्यानुसार काँग्रेस नेतेही आधीपासून धार्मिक हिंदू होते. पण, नेहरूंच्या सेक्युलरनीतीमुळे त्यांनी कधीही हिंदूपणाचे राजकारण केले नाही. म्हणूनच म्हणे, मग या काँग्रेसींची प्रतिमा हिंदूंविरोधी रंगवली गेली. पण, या थरूरांना कोणी हेही सांगा की, मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी याच हिंदू काँग्रेसींनी केलेले लांगूलचालनच हिंदू मतदारांना त्यांच्यापासून तोडणारे ठरले. खरं तर हे सत्य पचविण्याची काँग्रेसींची मानसिक कुवत नाहीच, म्हणून रागाच्या मंदिरभेटींचा हा मुलामा... शशी थरूर दावा करतात की, राहुल गांधींना हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, हिंदू दर्शन यांचे म्हणे सर्व ज्ञान आहे. त्यांच्या दृष्टीने ‘रागा’ म्हणजे जणू हिंदू धर्मपंडितच. असे असेल तर मंदिरभेटींऐवजी ‘रागा’ची हिंदू धर्मावरील प्रवचने, भजन-कीर्तनेच आता काँग्रेसनेच आयोजित करावी. ‘विश्वेश्वरैय्या’ यांच्या शब्दाचे साधे उच्चारणही न जमणाऱ्या या काँग्रेस अध्यक्षाचे हिंदू धर्माचे ज्ञान किती गहन, अगाध असेल, याची कल्पना करूनच ‘रागा’चा हिंदू राग न ऐकलेलाच बरा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@