पाकिस्तानातच जायला का सांगतात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
विख्यात चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या वादग्रस्त विधानाची, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दखल घेतली आणि भारतातील मुसलमानांबद्दल कळवळा व्यक्त करून, अल्पसंख्यकांशी कसे वागायचे हे पाकिस्तान भारताला शिकवेल, असे त्यांनी म्हटले. त्यावर नसिरुद्दीन व अससुद्दीन ओवैसी यांनी इम्रान खानला चांगलेच ठणकावले. ही अत्यंत स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. भारताच्या अंतर्गत कारभारात पाकिस्तानने नाक खुपसणे कुणीही भारतीय सहन करणार नाही. नसिरुद्दीन आणि ओवैसी यांनी एक भारतीय म्हणून आपले कर्तव्यच पार पाडले आहे. या दोघांच्या ठाम भूमिकेमुळे, पत्रकारितेला कलंक असणार्या बरखा दत्त फारच आनंदित झाल्या. त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, आता तरी हिंदू लोक मुसलमानांना पाकिस्तानात जा असे म्हणणार नाहीत, अशी आशा आहे. तसेही बरखा दत्त यांची विचार व तर्कशक्ती विकली गेली असल्यामुळे, त्यांच्या विधानाची दखल घेणे म्हणजे वेळेचा अपव्ययच आहे. परंतु, आणखी एकाची जी प्रतिक्रिया आली, तिची मात्र दखल घ्यावी लागेल. ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध राष्ट्रवादी कवी डॉ. कुमार विश्वास. कुमार विश्वास यांनी टि्वट केले आहे की, भारतातील मुसलमानांना पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात येते. पाकिस्तानातच का? श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ इत्यादी देशांमध्ये जा, असे का सांगण्यात येत नाही?
 
 
 
कुमार विश्वास यांचा प्रश्न योग्यच आहे. भारतात कुठेही एखाद्या मुसलमानाकडून राष्ट्रविरोधी कृत्य घडले की, काही लोक त्याला पाकिस्तानात जा म्हणून चिथवतात. हिंदुस्थानातील कायदे-कानून मान्य नसतील तर त्या व्यक्तीने पाकिस्तानात जावे, असा त्याचा अर्थ असतो. या देशात राहायचे आणि पाकिस्तानशी इमान ठेवायचे, हे कुणीही भारतीय सहन करू शकत नाही. अशा देशविरोधी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसे कायदे भारतात आहेतही. परंतु, अशी मागणी न करता, त्या मुसलमानाला किंवा व्यक्तीला, पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो. ही बाब बरखा दत्त आणि त्यांच्या जमातीतल्या विचारवंत/पत्रकारांना खटकत असेल तर त्यात नवल नाही. परंतु, डॉ. कुमार विश्वाससारखा राष्ट्रीय वृत्तीचा कवीदेखील जेव्हा असा प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा त्याचे स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे.
 
‘पाकिस्तानात जा’ हे म्हणण्यामागे काय मानसिकता असेल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकवायला हवे. मुस्लिम लीगच्या अट्टहासी मागणीमुळे भारताची फाळणी झाली, हे सर्वश्रुत आहे. या देशातून ब्रिटिश निघून गेल्यावर आपले (म्हणजे मुसलमानांचे) कसे होणार, याची त्यांना चिंता वाटणे स्वाभाविक होते. मुस्लिम शासकांच्या काळात हिंदूंवर करण्यात आलेले विविध प्रकारचे अत्याचार, छळ मुसलमान विसरले नव्हते. आता हिंदूंचे राज्य आले तर (आणि ते येणारच होते कारण हिंदू बहुसंख्य होते) हे हिंदू आपलीही गत अशीच करतील का, हा प्रश्न त्यांना छळत असावा आणि म्हणून मुसलमानांसाठी वेगळा देश तयार केला, तर हिंदूंच्या देशात मुसलमानांचा छळ होण्याचा प्रश्नच उरणार नाही, असा त्यांनी विचार केला असावा. हे माझे मत आहे व ते या संदर्भातील बरेच साहित्य वाचून तयार झाले आहे. बहुसंख्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारी कॉंग्रेस, अखंड भारताच्या बाजूची होती. मुस्लिम लीगने मात्र मुसलमानांसाठी वेगळ्या देशाची मागणी लावून धरली होती. निर्णय ब्रिटिशांना करायचा होता. या देशाचे एक काय, दहा तुकडे करण्यात ब्रिटिशांच्या बापाचे काहीही जाणार नव्हते. उलट, भारत जितका अधिक खंडित होईल, तितके त्यांच्याच सोयीचे होते. स्वातंत्र्यपूर्वीचे भारतातील वातावरण फाळणीच्या प्रश्नावरून ढवळून निघाले होते. सार्या भारताचे नेते महात्मा गांधी होते आणि त्यांनी- या देशाची फाळणी होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील, अशी घोषणा दिली असल्यामुळे, सारे हिंदू व अखंड भारताचे समर्थक आश्वस्त होते. अशातच 1945 सालची प्रांतीय निवडणूक आली. त्यात दोनच प्रमुख पक्ष होते. कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग. ही निवडणूक एकाच मुद्यावर लढली गेली. अखंड भारत की भारताची फाळणी. कॉंग्रेस अखंड भारताच्या बाजूला, तर मुस्लिम लीग फाळणी करून मुसलमानांसाठी वेगळ्या देशाच्या बाजूने.
 
निवडणुकीचे निकाल वैशिष्ट्यपूर्ण होते. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत या भागात मुस्लिम लीगला बहुमत मिळाले नव्हते. परंतु, हा भाग पाकिस्तानात गेला. फाळणीनंतर राहिलेल्या भारतातील मुसलमानांनी बहुमताने मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता. मुस्लिमबहुल असलेल्या सर्वच मतदारसंघात मुस्लिम लीग निवडून आली होती. विशेषत: उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल. परंतु, हा भाग पाकिस्तानात गेला नाही. भारतातच राहिला. म्हणजे ज्यांना पाकिस्तान नको होता ते पाकिस्तानात गेले आणि ज्यांना पाकिस्तान हवा होता ते भारतात राहिले. कॅनडानिवासी पत्रकार व स्तंभलेखक तारेक फतेह मूळ अविभाजित पंजाबमधील आहेत. ते स्वत:ची ओळख ‘पाकिस्तानात जन्मलेला भारतीय’ अशी करून देतात. ते म्हणतात, आम्हाला पाकिस्तान नकोच होता. तो आमच्यावर लादला गेला आहे. आमचे बापजादे काही कारणांमुळे मुसलमान झाले असतील, पण आम्ही भारतीयच आहोत. फतेह साहेब कॅनडात असल्याने स्पष्ट बोलू शकत असतील. पाकिस्तानातील या अशा विचारांच्या लोकांना तिथल्या दडपशाहीमुळे बोलता येत नसावे. सांगण्याचा मुद्दा हा की, भारतातील बहुसंख्य (काही अपवाद सोडता) मुसलमानांना आजही पाकिस्तानबद्दल प्रेम वाटत असावे, अशी शंका हिंदूंना आली तर त्यात काय चुकले? भारताची फाळणी हवी, अशी मागणी करून या मुद्यावर निवडणूक लढविणार्या मुस्लिम लीगला भरघोस समर्थन देणारा मुसलमान, आपला प्रदेश पाकिस्तानात जाऊ शकला नाही म्हणून खंतावत असतो, ही भावना हिंदूंच्या मनात आहे व ती अगदीच चूक आहे असे मानता येणार नाही.
 
या सर्व पृष्ठभूमीवर, जेव्हा एखादा भारतीय मुसलमान देशविरोधी कृत्य करतो किंवा बोलतो, तेव्हा साहजिकच इतर लोक त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगतात. यात त्यांचे काय चुकले? तुझी पाकिस्तानात जायची इच्छा होती; परंतु काही कारणास्तव (किंवा व्यूहरचना म्हणून) तू तिथे गेला नाही आणि इथे भारतात राहून तू भारतविरोधी कृत्य करीत आहेस, तर थेट पाकिस्तानातच जाऊन का राहात नाहीस? असेच इथल्या हिंदूंना म्हणायचे असते. मनातले अभिव्यक्त करण्याची रीत प्रत्येकाची वेगवेगळी राहू शकते, परंतु मनातील भाव मात्र असाच असतो, असे मला वाटते.
 
मुसलमानांनी पाकिस्तानात जावे, असे सुचविणार्यांच्या मनातील हा भाव सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आपल्या हट्टापायी या देशाची फाळणी झाली, फाळणीनंतर लाखो लोकांच्या कत्तली, बलात्कार, जाळपोळ झाली. याच्या हिंदूंच्या मनावरील जखमा आपल्या प्रेममय व पश्चात्तापाने दग्ध झालेल्या वागणुकीने मुसलमानांनी भरून काढायला हव्या होत्या. परंतु, झाले उलटेच. पंडित नेहरूंच्या धोरणांमुळे, निवडणुकीसाठी हमखास व्होटबँक करण्याच्या प्रयत्नांमुळे, मुसलमानांमध्ये फाळणीबाबत अपराधीपणाची भावनाच निर्माण होऊ शकली नाही. त्यांना अपराधीपणाची बोच असती, तर त्यांच्या हातून ही असली कृत्ये कधीच घडली नसती. परंतु, ‘लढ के लिया पाकिस्तान, हँस के लेंगे हिंदुस्थान’वाली मानसिकता, कॉंग्रेसच्या गोंजारण्याने दृढतर होत गेली आणि म्हणूनच देशाला आज भेडसावत असलेल्या दहशतवादी कारस्थानात, जे आरोपी सापडतात त्यातील बहुसंख्य या हिंदीभाषी पट्ट्यातीलच असतात. भारतातील बहुसंख्य मुसलमानांची ही मानसिकता, त्यांच्या सहवासात असलेल्या हिंदूंशिवाय अधिक कुणाला अनुभवायला येणार? दिल्लीतील पंचतारांकित पत्रकार किंवा विचारवंतांना ही धग कधीच जाणवणार नाही. परंतु, या लोकांच्या शेजारी राहणारा हिंदू, हे सर्व भोगत असतो आणि म्हणूनच, जेव्हा एखादा मुसलमान देशविरोधी कृत्य करतो तेव्हा त्याच्या तोंडातून अनायास बाहेर पडते की, ‘‘बाबा रे, त्यापेक्षा तू पाकिस्तानातच का नाही जात?’’ कुमार विश्वास हे समजून घेतील, अशी आशा आहे.
@@AUTHORINFO_V1@@