पाकिस्तानी इथेही पुढेच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018   
Total Views |


 


 
"ब्रिटनमध्ये बालकांवर संघटितपणे अत्याचार करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे लोकच जास्त आहेत." ब्रिटिश गृहसचिव 
 

जगाच्या पाठीवर भारत असो की पाकिस्तान, अमेरिका असो की आफ्रिका आणि चीन असो की ब्रिटन, सगळीकडेच लहान मुलं देवाघरची फुलं मानली जातात. अगदी निष्पाप, निर्व्याज. जगरहाटीच्या क्रौर्यापासून दूर, स्वार्थापासून दूर. जगात चालणाऱ्या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टींपासून अनभिज्ञ. लहान बालक म्हणजे कोमळ कळ्याच. लहान बालकांवर कुणी कसा अत्याचार करू शकेल? असा विचार सज्जनशक्ती असलेल्या व्यक्तींना पडू शकतो. मात्र, दुर्दैव असे की, जगाच्या पाठीवर अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये लहान बालकांची संख्या सर्वाधिक आहे. बालकांवर अन्याय करणाऱ्या नराधमांना माहिती असते की, बालक प्रतिकार करू शकणार नाहीत. म्हणून त्यांच्यावर अत्याचार करणे, गोड बोलून त्यांना फसवणेही सोपे असते. त्यामुळे बालकांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. लहान मुलांचे अपहरण करणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यांना बालमजूर म्हणून कामाला लावणे. चोरी, घरफोडी किंवा अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये त्यांचा मदतनीस म्हणून वापर करणे, अशा एक ना अनेक गोष्टी. पीडित बालकांच्या प्रश्नांना अंत नाही. हे प्रश्न जगाच्या कानाकोपऱ्यात समान रूपातच उभे आहेत.

 

या परिप्रेक्ष्यात बालकांवर अत्याचार करणाऱ्या दुष्टांसाठी जगभरात विविध देशांत विविध आणि योग्य कायदेही आहेत. आपल्या देशातलाच ‘पॉक्सो’ कायदा. नुकताच भारतामध्ये ‘पोक्सो’ कायद्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला. १२ वर्षांखालील बालक-बालिकांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होणार, हा तो महत्त्वाचा बदल. या कायद्यामुळे १२ वर्षांखालील बालकांवर अत्याचार केला तर आता फाशीची शिक्षाच होणार, या विचाराने गुन्हेगार बालकांवर अत्याचार करण्यास धजावणार नाहीत, असे आता तरी आशादायक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जगाच्या कानाकोपऱ्यातही विविध प्रयोग होत असतात आणि आवाज उठत असतात. आशियाई देशांची संस्कृती आणि पाश्चिमात्त्य संस्कृती यामध्ये भरपूर अंतर आहे. भौतिक आणि ऐहिक या दोन तत्त्वांवर ढोबळमानाने विभागणी झालेल्या पूर्व-पश्चिम संस्कृतीचे पडसाद बालकांवरील होणाऱ्या अत्याचारावर उमटत असतील का? याचा शोध घेतला तर स्पष्टच जाणवते की, पूर्व आणि पश्चिम या संस्कृतीमध्ये अंतर आहेच. त्यातही पूर्व प्रदेशातील संस्कृतीही वर कितीही एकजिनसी असली तरी पूर्वेतील देशांच्या भौगोलिक, राजकीय आणि धार्मिक मानसिकतेचा पगडा हा त्या त्या संस्कृतीवर असतोच असतो. हाच पगडा गुन्हेगारांच्या मानसिकतेवरही प्रभाव टाकतो. नेमके हेच बालकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या मानसिकतेमध्येही उमटते.

 

या भौगोलिक स्तरावर बदलणाऱ्या मानसिकतेचे प्रतिबिंब पाकिस्तानी मूळ असणाऱ्या व्यक्तींमध्येही आढळते. याचे उदाहरण म्हणून ब्रिटिश गृहसचिवांच्या वक्तव्याकडे पाहता येईल. गुरुवारी बीबीसी रेडिओ ४ वर ब्रिटनमध्ये बालकांवर होणाऱ्या अत्याचारांसंबंधी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, “ब्रिटनमध्ये बालकांवर संघटितपणे अत्याचार करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे लोकच जास्त आहेत.” अर्थात, काही लोक म्हणतील की, साजिद जाविद हे वर्णद्वेषी, धर्मद्वेषी किंवा पाकिस्तानद्वेषी असतील. मूळ देश पाकिस्तान असलेले नागरिक मुस्लीम असतील म्हणून आणि म्हणूनच ब्रिटनच्या गृहसचिवाने अशी वर्णद्वेषी गरळ ओकली असेल. पण तसे नाही. मूळचे पाकिस्तानी असलेले असे ब्रिटनवासी नागरिक हे बालकांवर संघटित अत्याचार करण्यात अग्रेसर आहेत, हे विधान पुराव्यासकट सादर केले आहे ते ब्रिटनच्या गृहसचिवांनी. ते स्वतः मुस्लीमधर्मीय तर आहेतच, त्याशिवाय ते स्वत: मूळचा पाकिस्तानी वंशाचे आहेत. त्यामुळे कुणीतरी कुणावर द्वेष, चीड व्यक्त करण्यासाठी उठाठेव केली आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही. साजिद जाविद यांनी आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ अनेक पैलू सादर केले आहेत. हे सगळे ऐकून वाटते की, भारतापासून वेगळा झालेला भूभाग पाकिस्तान बनला. पण, पाकिस्तान झाल्यावर त्या मातीत असे काय निर्माण झाले की हिंसा, अत्याचार, दहशत याचा रंग घेऊन या मातीतले बरेच जण गुन्हेगारीचा वसा घेऊन आज जगभर वावरत आहेत आणि जगाची डोकेदुखी ठरत आहेत. पाकिस्तानी इथेही पुढेच...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@