डॉक्टरच्या रुपातील देवमाणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


‘देवमाणूस’ ते अगदी रुग्णांची लुटमार करणारे डॉक्टर, अशी डॉक्टरांची विविध रूपे ऐकण्यात, वाचनात येतात. त्यामुळे ‘डॉक्टरी’ हाही एक पेशाच झालेला सर्रास पाहायला मिळतो. ‘विकाऊ’ डॉक्टरांच्या चलतीमुळे गलोगल्ली ‘एम.बी.बी.एस.’ अशा पाट्या लटकवलेले दवाखानेही आले. परंतु, सत्तर-ऐंशीच्या दशकात अशी परिस्थिती नव्हती. बरेचदा तर एका शहरातही एखादाच डॉक्टर असायचा. गावांमध्ये तर त्या काळात वैद्याकडून जडीबुटी घेतली की, आपण बरे होणार असा एक भाबडा समज प्रचलित होता. त्यामुळे गावात डॉक्टरचे महती कळायला बराचसा काळ लोटला. म्हणूनच मग शहरातील डॉक्टर नेहमीच ‘ऑन डिमांड.’ मग ते मागतील तेवढे तपासणी शुल्क त्यांना दिले जायचे. तेव्हा थोडी माणुसकी तरी होती, पण आता असेही डॉक्टर आपल्याला दिसतात, जे फक्त पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळायलाही मागे-पुढे पाहात नाही. पण, या सगळ्यातही तामिळनाडूतील एका गावात रुग्णांसाठी एक आरोग्यदूत अविश्रांतपणे कार्यरत आहे आणि तो देवमाणूस म्हणजे डॉ. थीरुवेंगडम वीराराघवन. ‘डॉक्टरच्या रुपातील साक्षात देव’ म्हणूनच त्यांना चेन्नईमध्ये ओळखले जाते. चेन्नईतील एरुकांचेरी परिसरात डॉ. थीरुवेंगडम यांचा गेली ४० वर्षे दवाखाना आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत ते रुग्णांकडून केवळ दोनच रुपये घेतात. ७० वर्षांतील काही सुरुवातीच्या काळात डॉ. थीरुवेंगडम यांनी अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले. मात्र, शहरातील इतर डॉक्टरांकडून धमक्या येऊ लागल्यामुळे त्यांनी दोन रुपये आकारण्यास सुरुवात केली. अशा या डॉ. थीरुवेंगडम यांच्या या विचारामागची कहाणी थोडी वेगळी आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आकस्मितपणे काही घडामोडी घडतात. त्याचे त्याच्या जीवनावर बरेवाईट परिणाम होत असतात.

 

१९६८ मध्ये डॉ. थीरुवेंगडम हे चेन्नईतील नावाजलेल्या स्टेनली वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण घेऊ लागले. थीरुवेंगडम यांनी त्या काळात एक हजार विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या घरातच त्यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले. त्यामुळे समाजसेवेच्या कार्यात त्यांच्या घरच्यांनीही त्यांना साथ दिली. मात्र, महाविद्यालयामध्ये शिकत असताना, त्यांनी डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळे एका रुग्णाचे जीव गेल्याचे पाहिले होते. या प्रसंगामुळे डॉ. थीरुवेंगडम खडबडून जागे झाले आणि त्यांना आपण काय केले पाहिजे हे उमजले. परंतु, मधील काळात घरची परिस्थिती बिघडल्यामुळे डॉ. थीरुवेंगडम यांनी एका औषधाच्या दुकानात काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. थीरुवेंगडम यांच्या घरातील सर्व मंडळी रुग्णवाहिका चालवण्याचे काम करत. त्यामुळे त्यांच्या घराचे दरवाजे नेहमीच सर्वांसाठी खुले असायचे. हाच वारसा पुढे नेत थीरुवेंगडम यांनी समाजसेवेचा विडा उचलला. मात्र, थीरुवेंगडम यांच्या मते, “डॉक्टरकी हा असा पेशा आहे, जिथे तुम्हाला सर्वज्ञात असावे लागते. तिथे तुमच्या चुका या कधीच ग्राह्य धरल्या जात नाही. म्हणून माझा नेहमी सल्ला असतो, जे कुणी डॉक्टरी पेशात प्रवेश करत असतील, त्यांनी वैद्यकीय क्षेत्राध्ये एका तरी विषयात पारंगत व्हावे.” या विचारामुळे एम.बी.बी.एस. झाल्यानंतरही थीरुवेंगडम यांना आणखी शिकायचे होते.

 

मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मध्यंतरीच्या काळात शिक्षण घेता आले नाही. या कालावधीत थीरुवेंगडम यांनी काही काळ इतर डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. या वेळी डॉक्टरकी ही सेवा राहिलेली नसून तो व्यवसाय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी एरुकांचेरी परिसरात स्वत:चा दवाखाना सुरू केला. त्यांनी रुग्णांना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. “माझ्यासाठी पैसे दुय्यम स्थानी आहेत. त्या काळात माझ्या घरच्यांनी मला एवढे पैसे मिळालेचं पाहिजे, अशी सक्ती केली नाही. त्यामुळे मी सुरुवातीला मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. मात्र, इतर डॉक्टरांना कदाचित ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी माझी खोटी तक्रार केली.” एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला केवळ आपला व्यवसाय होत नाही म्हणून खाली खेचत आहे, या सगळ्या प्रकारामुळे थीरुवेंगडम व्यथित झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या रुग्णांकडून नाममात्र फी म्हणून दोन रुपये घेण्यास सुरुवात केली.

 

२००३ नंतर थीरुवेंगडम यांचे नाव चेन्नईत सर्वश्रुत झाले आणि स्टेनली वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते संशोधनाकरिता रुजू झाले. त्यानंतर मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी काही काळ काम केले. मात्र, रोज संध्याकाळी न चुकता ते स्वत:च्या दवाखान्यात जातात. हा दिनक्रम ते कधीच चुकवत नाही. गेली ४४ वर्षे आपली सेवा ते अविरतपणे पार पाडत आहेत. त्यांच्या याच महान कार्याची ‘मरसल’ या तामिळ चित्रपटात दखल घेण्यात आली. यात अभिनेता विजयने थीरुवेंगडम यांची भूमिका साकारली आहे. थीरुवेंगडम आजही वयाच्या ७०व्या वर्षी सकाळी धावायला जातात आणि संध्याकाळी ठरल्याप्रमाणे दवाखान्यात, “हा माझा दिनक्रम करत मी माझे प्राण सोडू इच्छितो,” असं म्हणणारा हा ‘देवमाणूस’ प्रत्येक डॉक्टरसाठी प्रेरणादायी आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@