'आप' एक फसलेली क्रांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018   
Total Views |



'आप'च्या चळवळीत प्रारंभापासून राहिलेले आणि एकेकाळी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले मयांक गांधी यांनी 'आप'चा हा सर्व प्रवास 'AAP & DOWN - An Insider's Story of India's Most Controversial Party' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. एखादी चळवळ कशी निर्माण होते, कशी वाढते आणि त्याचा अस्त कसा होतो, याचा अभ्यास करण्याकरिता राजकीय अभ्यासकाला उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे.


प्रत्येक देशात पिढीनुसार नवनवे परिवर्तनाचे प्रवाह निर्माण होत असतात आणि त्या प्रवाहातून नवे नेतृत्व प्रस्थापित होत असते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जे नेतृत्व तयार झाले होते, त्याचा प्रभाव स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या २५ वर्षांवर होता. हे नेतृत्व प्रामुख्याने काँग्रेस चळवळीतून आले होते. परंतु, १९६७च्या निवडणुकीपासूनच या नेतृत्वाविरुद्धच्या असंतोषाबाबत सुरुवात झाली होती. त्याची परिणिती जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात झाली. या आंदोलनातून मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, पासवान आदी नवे नेतृत्व निर्माण झाले. याच आंदोलनामुळे इंदिरा गांधींना आणीबाणी पुकारावी लागली. त्याच्या विरोधात जनसंघाने जो संघर्ष केला, त्याचा परिणाम म्हणून अटलजी आणि अडवाणी यांचे राष्ट्रीय नेतृत्व प्रस्थापित झाले. त्यानंतर १९९०च्या सुमारास श्रीरामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले आणि त्याचबरोबर काशीराम यांची बहुजन समाज चळवळ ही प्रभावशाली बनू लागली. श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या नव्या नेतृत्वाची फळी पुढे आली आणि काशीराम यांच्या चळवळीतून मायावती यांचे नेतृत्व राजकीय क्षितिजावर प्रकट झाले.

 

२०१० पासून परिवर्तनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे, असे वातावरण निर्माण होत गेले. नागरिकांच्या हक्कांचे सक्षमीकरण हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता आणि अण्णा हजारे या आंदोलनाची प्रतिमा बनले होते. हळूहळू अनेक अराजकीय शक्ती अण्णा हजारेंच्या नेतृत्वाभोवती जमा होऊ लागल्या. या आंदोलनाचा प्रभाव मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात वाढत गेला. या काळात केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे लोकांमधील असंतोष वाढत होता. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात लोकांना आशेचा किरण दिसत होता. 'आप' या राजकीय पक्षाची स्थापना हे त्याचेच एक अपत्य होते. अण्णा हजारे यांच्याप्रमाणेच अरविंद केजरीवाल हे 'आप' या राजकीय चळवळीचे प्रतीक बनले आणि देशभरात 'आप'च्या चळवळीने परिवर्तनाचे वातावरण निर्माण केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने आश्चर्यजनक विजय मिळवला. वेगवेगळ्या राज्यातील 'आप'ला व्यापक समर्थन मिळत असल्याच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्या. या यशामुळे अरविंद केजरीवाल यांच्या महत्त्वाकांक्षा एवढ्या वाढल्या की, भावी काळात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय बनू शकतो, असा विश्वास त्यांना वाटू लागला. त्या विश्वासातून त्यांनी मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात ते अपयशी ठरले. तरी पंजाबमधून 'आप'चे चार खासदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' ने एवढा प्रचंड विजय मिळवला की, अरविंद केजरीवाल यांचा वाराणसीतील पराभव विस्मरणात गेला. परंतु, त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका येत असताना 'आप'चे पर्यायी पक्ष बनण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्यात जमा आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळेल असे 'आप'ला वाटत होते. तिथे त्या पक्षाचा भ्रमनिरास झाला. गुजरात, गोवा या राज्यांत या पक्षाचा प्रभाव अत्यंत नगण्य होता. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत हा पक्ष कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. अवघ्या पाच वर्षांत असे काय घडले की, देशव्यापी परिवर्तन घडवणारा हा पक्ष आता दिल्ली विधानसभेपुरताच मर्यादित राहिला आहे?

 

'आप'च्या चळवळीत प्रारंभापासून राहिलेले आणि एकेकाळी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले मयांक गांधी यांनी 'आप'चा हा सर्व प्रवास 'AAP & DOWN - An Insiders Story of India's Most Controversial Party' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. एखादी चळवळ कशी निर्माण होते, कशी वाढते आणि त्याचा अस्त कसा होतो, याचा अभ्यास करण्याकरिता राजकीय अभ्यासकाला उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या प्रारंभी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या परस्पर संबंधांची हकीगत मयांक गांधी यांनी दिली आहे. हे दोघेही एका उदात्त कारणाने एकत्र आले आहेत, अशी लोकभावना होती, परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती नव्हती. अरविंद केजरीवाल यांना आपला प्रभाव राष्ट्रव्यापी करण्याकरिता अण्णा हजारेंच्या प्रतिमेचा उपयोग करून घ्यायचा होता, तर राष्ट्रीय स्तरावर आपले आंदोलन चालविण्याकरिता अण्णांना कोणत्या ना कोणत्या संघटनेची आवश्यकता होती. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर त्यातून एक प्रचंड जनशक्ती निर्माण झाल्याचे चित्र लोकांसमोर आले. वास्तविक पाहता, अण्णांच्या या आंदोलनात रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर अशा अनेक राजकीय शक्ती समिल्लीत झाल्या होत्या, परंतु अण्णांना ही स्वतःची एकट्याची लोकप्रियता आहे, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत जे होते त्यांच्याबद्दल उपेक्षाभाव दाखवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम हे सर्व घटक आंदोलनापासून दूर गेले आणि मुंबईला अण्णांचे जे उपोषण झाले त्याचा फज्जा उडाला. त्यानंतर अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये मत्सराचे आणि परस्पर संशयाचे वातावरण तयार झाले आणि अण्णा 'आप' पासून वेगळे झाले. 'आप' आणि केजरीवाल यांच्याशी आपला कोणताही संबंध नाही, हे अण्णांनी जाहीर केले. 'आप'ला भारतातील राजकीय पक्षांची संस्कृती बदलायची होती. जी प्रचलित नेतृत्वाधिष्ठित पद्धती होती, ती बदलून विकेंद्रित व कार्यकर्ताधिष्ठित पक्षपद्धती निर्माण करायची होती. परंतु, एकदा यश मिळाल्यानंतर ते यश अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात कसे गेले, त्यातून त्यांच्या मनात हुकूमशाही प्रवृत्ती कशी निर्माण झाली, याचा परिणाम म्हणून अरविंद केजरीवाल यांनी स्वतःभोवती होयबाचं कडं कसे निर्माण केलं आणि कार्यकर्ता केंद्रित पक्ष संस्कृतीचा कसा ऱ्हास होत गेला, हा प्रवास मयांक गांधी या पुस्तकातून वर्णन केला आहे. प्रचलित राजकीय संस्कृती म्हणजे पैसा, नेतागिरी, हितसंबंधाचे राजकारण भ्रष्टाचार असून अशा गोष्टीपासून राजकारण मुक्त करण्यासाठी 'आप'चा जन्म झाला असे सांगितले गेले आणि आज 'आप' त्याच संस्कृतीचा वाहक बनला आहे. या पक्षावर केजरीवाल यांची एकाधिकारशाही आहे. त्यांच्या विरोधात निर्णय घेणे तर सोडाच, कोणी बोलूही शकत नाही. मयांक गांधी यांनी या एकाधिकारशाहीविरोधात बोलण्याचाच प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून त्यांना या पक्षातून बाहेर पडावे लागले.

 

समाजातील अनेक बुद्धिमान माणसे अशा देखाव्याला भुलतात आणि एखाद्या स्वप्नामागे धावत जातात हे पाहून वाचकाला आश्चर्यचकित व्हायला होते. मयांक गांधी यांनी आपली निरीक्षणे नोंदवत असताना “आप'चे कार्यकर्ते व्यवस्थेला विरोध करण्यातले तज्ज्ञ होते. परंतु, नवी व्यवस्था निर्माण करू शकत नव्हते,” असे निरीक्षण नोंदवले आहे. अनेक वर्षे विरोधी पक्षाचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांची यापेक्षा वेगळी मानसिकता नसते. वास्तविक पाहता, एखाद्या पक्षासाठी किंवा चळवळीसाठी आयुष्यातील इतकी महत्त्वाची वर्षे खर्च केल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला वैफल्य यायला हवे होते. परंतु, मयांक गांधी अत्यंत तटस्थपणे आणि अधूनमधून प्रसन्न विनोदाची पखरण करीत निवेदन करीत जातात. स्वाभाविकच या पुस्तकात अनेक परस्परांत चालणाऱ्या चर्चांचाही उल्लेख आला आहे. 'ध्येयनिष्ठा कागदावर ठीक असते, पण व्यवहारात काही गोष्टींशी तडजोड करणे भाग असते, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे महत्त्वाचे नसून प्रसारमाध्यमांत आपली प्रतिमा कशी दिसेल याचा विचार केला पाहिजे,' हे विधान किंवा 'जर आपल्या बाजूने निर्णय लागणार असेल, तरच लोकांचा कौल घेऊ' हे विधान या सर्व गोष्टी जशा व्यवहारी राजकारणाला लागू आहेत, त्याच पद्धतीने विचार 'आप'चे नेतेही करत होते. मग यातून परिवर्तन कसे होणार? गेल्या सात-आठ वर्षांचा भारताचा राजकीय इतिहास ज्यांना आठवत असेल त्यांना आपण वाचत असलेल्या प्रत्येक बातमीमागची पृष्ठभूमी कळण्यास या पुस्तकाची मदत होईल. यात वर्णन केलेले अनेक प्रसंग आपणाला बातम्यांमधून आधीच माहीत झालेले आहेत. पण, त्यामागच्या घडामोडी सर्वसामान्य वाचकांपुढे या पुस्तकामुळे आल्या आहेत. आधुनिक राजकारणाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी वाचावेच असे हे पुस्तक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@