रुजवू संस्कृती वाचनाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018   
Total Views |

 


 
 
डोंबिवली ग्रंथसंग्रहालय

ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ

 

श्रीपाद उर्फ आबासाहेब पटवारी (अध्यक्ष), विष्णू सोमण (कार्याध्यक्ष), वसंत चौधरी (कोषाध्यक्ष), सुभाष मुंदडा (सचिव), प्रमोद जोशी (सहसचिव), सदस्य - दत्तात्रय मुतालिक, गिरीश टिळक, सतीश कुलकर्णी, श्रीनिधी गोसावी, डॉ. वृंदा कौजलगीकर, शीतल दिवेकर.

 

नामवंत साहित्यिकांच्या या डोंबिवलीत काही निवृत्त मंडळी मोठ्या अभिमानाने डोंबिवली ग्रंथालय चालवित आहेत. डोंबिवली शहराला कल्याणप्रमाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. परंतु, या शहराला सांस्कृतिक चळवळीचा एक इतिहास आहे. पुण्यानंतर सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवलीची एक वेगळी ओळख आहे. दिग्गज साहित्यिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये वाचनसंस्कृती, वेगाने फोफावली आहे. ही चळवळ व्यापक करण्यामागे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा मोठा वाटा आहे.

 

१९७० च्या दशकात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी डोंबिवली हे एक शहर. भात शेती, खाचर व पडिक जमिनींची जागा चाळी व गृहसंकुलांनी घेतली. डोंबिवली पूर्वेला पूरक असा संदर्भविभाग पश्चिमेला असावा, या उद्देशाने प्रेरित होऊन यासाठी प्रयत्न सुरू झाले. पश्चिमेतील वाचकांसाठी वाचानालय आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याची गरज होती. डोंबिवली पश्चिमेला स्थानक परिसरातील महात्मा फुले वाचनालयाची वास्तू पाडून त्या जागी नवीन तीन मजल्यांची इमारत तत्कालीन नगरपरिषदेच्या कार्यकाळात बांधण्यात आली. आज वाचनाची आवड जोपासणारे सर्व वयोगटातील वाचक या ग्रंथालयाचे सदस्य आहेत. सद्यस्थितीला डोंबिवली पूर्व-पश्चिम भागात सुमारे २० हून अधिक ग्रंथालये आहेत. या इमारतीतील पहिले दोन मजले विष्णूनगर पोलीस ठाण्याला नाममात्र भाड्याने देण्यात आले. उर्वरित ७०० चौ. फुटांचा हॉल केवळ वृत्तपत्र वाचनासाठी ठेवून त्याच्या समोरील १० बाय १२ चौरस फुटांची एक खोली तलाठी कार्यालयास देण्यात आली. नंतर हे कार्यालय पश्चिमेतील पु. भा. भावे सभागृहात हलविण्यात आले. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयास ही जागा देण्यात आली. मार्च १९८९ साली पाडव्याच्या मुहूर्तावर हे ग्रंथालय सुरू करण्यात आले. ‘मुंबई मराठी ग्रंथालया’ने या संस्थेला ३०० पुस्तके व संदर्भग्रंथ भेट म्हणून दिले. तसेच कल्याण महापालिकेने world book encyclopedia चा पूर्ण संच भेट दिला. डोंबिवलीतील सुजाण नागरिकांनी कपाटे, पुस्तके, देणगीदेखील दिली. खाली पोलीस स्थानकासमोर मासळी बाजार आणि एका बाजूला रेल्वे स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणी हे संदर्भ ग्रंथालय सुरू झाले.

 

वसंत सबनीस, गोविंद तळवलकर, प्रभाकर अत्रे, ल. ना भावे, रमाकांत कुळकर्णी, विश्वास मेहंदळे, विजय तेंडूलकर व महाराष्ट्राचे भूषण असलेले शं. ना. नवरे, पु. भा. भावे असे नामवंत साहित्यिक या शहराला लाभले. डोंबिवलीतील साहित्यिकांस व वाचक वर्गास पुस्तकांचे खाद्य देण्यासाठी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाने आपली प्रमुख भूमिका बजावली. या ग्रंथालयात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या सेवानिवृत्त असून स्वेच्छेने या ठिकाणी कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात फक्त १,५०० पुस्तके या ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध होती. मात्र, जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतशी पुस्तकांची संख्या वाढत गेली. ग्रंथालयाची वेळ सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ अशी करण्यात आली. वाचकांना नुसते संदर्भ नव्हे, तर इतर ललित साहित्य हवे असे ध्यानात आल्यावर, ललित साहित्य - कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र पुस्तके घेण्याचे ठरविण्यात आले. याच प्रकारे नवनवीन पुस्तके घेण्याचे हे सत्र अजूनही सुरू आहे.

 

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी व्यक्तींवर लक्ष केंद्रित न करता कुटुंब हा घटक ठरविण्यात आला. एका छोटेखानी कुटुंबाची बौद्धिक गरज म्हणजे निदान दोन पुस्तके. एका सभासद तत्त्वावर दोन पुस्तके त्याच वर्गणीत द्यायची असे ठरले व त्याचा परिणाम उत्तम झाला. शेजारच्या मोठ्या खोलीत, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे वृत्तपत्र वाचनालय सुरू होते. जुने लाकडी फर्निचर, काही वृत्तपत्रे व भली मोठी खोली, त्यामुळे त्याला आधुनिक स्वरूप नव्हते. शिवाय एवढ्या मोठ्या जागेचा योग्य वापर केल्यास वाचकांना अधिक सुविधा देता येतील, असा विचार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने दुसरा मजला १५ वर्षांच्या भाडे तत्त्वावर नाममात्र भाड्याने दिला. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात आली. या अभ्यासिकेत कसारा ते ठाण्यापर्यंतचे विद्यार्थी येतात. रेल्वे स्थानकाच्या नजीक असणाऱ्या या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. संस्थेच्या या कामामुळे २००४-०५ साली या संस्थेला शासन मान्यता मिळून ‘ड’ वर्गात समविष्ट करण्यात आले. २००६ -०७ साली ‘क’ वर्गात प्रवेश देण्यात आला. २००७ -०८ साली ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचा ‘प्राचार्य नारायण गोविंद जाधव उत्कृष्ट ग्रंथालय’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शासनातर्फे दिला जाणारा ‘क’ वर्ग ग्रंथालयासाठीचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर ही घोडदौड सुरूच राहिली व संस्थेला ‘ब’ दर्जा मिळाला.

 

ग्रंथालय म्हणजे नुसती पुस्तके देण्या-घेण्याची जागा नव्हे, अशी या संस्थेची धारणा आहे. त्यामुळे ज्ञान-संस्कृती व माहिती या त्रिसूत्रीवर संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी संस्थेचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. ‘गावोगावी ग्रंथालय मित्रमंडळे’ या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. www.dombivli-grnthalaya.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘विद्यार्थी प्रबोधन समिती’ स्थापन करण्यात आली. या शिवाय सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घेतली जातात. महाविद्यालयीनस्तरावर विविध प्राचार्यांच्या सहकार्याने त्यांचे सातही कार्यक्रम आखले जातात. करिअर कौन्सिलिंग अशा प्रकारचे उपक्रम प्राधान्याने घेतले जातात. डोंबिवलीतील नागरिक, देणगीदार, हितचिंतक यांचा पाठिंबा या संस्थेसाठी मोलाचा ठरला. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘२६/११ चा थरार’ हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विविध माध्यमातील पत्रकारांच्या समावेश करण्यात आला. लेखक आपल्या भेटीला, दिवाळी अंक प्रकाशन असे कार्यक्रम करण्यात आले. याशिवाय डोंबिवलीतील मूक-बधिर विद्यालय व वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थिनी यांनाही नि:शुल्क पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. २००९ साली विसाव्या संस्थेचे संगणीकिकरण पूर्ण झाले. कामकाजासाठी संगणकाबरोबर वाचक व अभ्यासकांना अशी संगणक सुविधा देता यावी, असा संस्थेचा मानस आहे. ‘catch them young’ या युक्तीप्रमाणे वाचन संस्कृती वाढवायची असेल, तर मुलापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेत मुक्तदार असते. तसेच विविध कार्यक्रम केले जातात. महाविद्यालयीनस्तरावर विविध प्राचार्यांच्या सहकार्याने त्यांच्यासाठी करिअर कौन्सिलिंगचे उपक्रम घेतले जातात. तरुणाईसाठी ‘तरुणाई कट्टा’ किंवा ‘युथ एज्युकेशन सपोर्ट’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. एक असाच वेगळा कार्यक्रम म्हणजे ‘मात्रा-गण-वृत्ते’ हा कार्यक्रमही करण्यात आला. याशिवाय गणित, वैदिक गणित, पर्जन्य भाकिते, ज्योतिष, ज्ञानेश्वरी, वाल्मिकी रामायण असे विषय श्रोत्यांसमोर आले. कविसंमेलनाचे आयोजन तर बऱ्याच वेळा होते. पुस्तक संख्या आणि वाचकसंख्याही वाढतच चालली आहे. असे या संस्थेच्या ज्येष्ठ व्यक्तींचे मत आहे. संस्थेचे कर्मचारीही अतिशय उत्साहाने आणि मनापासून काम करतात. डोंबिवलीतील नागरिक, देणगीदार, हितचिंतक यांचाही या संस्थेला पाठिंबा असतो. या ग्रंथालयाचे व्यापक काम लक्षात घेत या ग्रंथालयाला वाढीव जागा कल्याण-डोंबिवली महापालिकेने द्यावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@