आदिवासी हे ’हिंदूच’, संभ्रम निर्माण करणार्‍यांचे कारस्थान हाणून पाडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

नंदुरबार येथील जनजाती चेतना परिषदेत लक्ष्मणसिंह मरकाम यांचे परखड आवाहन

 
 
नंदुरबार : 
 
आदिवासी हे हिंदूच आहे. त्यांच्या प्रथा, रितीरिवाज, कुलदेवता हे चिरंतन आहेत पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करून देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत.
 
त्यातूनच रावण आमचा पूर्वज होता, महिषासूर हाही आमचा पूर्वज होता, असे प्रवाद निर्माण केले जात आहेत. हे सारे भारतीय आम जनजातीमध्ये फूट पडणे, परस्परात कलह आणि संभ्रम निर्माण करणे यासाठी केले जात आहेत, हे प्रयत्न हाणून पाडा. असे परखड आणि आवेशपूर्ण आवाहनपर प्रतिपादन भारतीय नौसेनेतील आयुध सेवेतील लक्ष्मणसिंह मरकाम (विशापट्टणम्) यांनी आज येथे केले.
 
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संलग्न देवगिरी प्रांत वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित नंदुरबार येथील जनजाती चेतना परिषदेत ते बोलत होते.
 
 
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात रविवारी ही एकदिवसीय जनजाती चेतना परिषद झाली, जनजाती बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदुरबार येथे आयोजित परिषदेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सुमारे दीड हजार प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
मंचावर केंद्रिय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित, शहादा-तळोदा विधानसभेचे आमदार उदेसिंग पाडवी, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ठाकरे, वनवासी कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ नीलिमा पट्टे (नागपूर), आश्रमाच्या जनजाती सुरक्षा मंचचे डॉ. राजकिशोर हासदा यांच्यासह डॉ. विशाल वळवी, प्रा. डी के वसावे, देवगिरी कल्याण समितीचे उपाध्यक्ष डॉ. पुष्पा गावित, देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष चैत्राम पवार, सहसचिव विरेंद्र वळवी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष जत्र्याबाबा पावरा, देवगिरी प्रांत सह-सचिव गणेश गावित आदी मान्यवर मंचावर होते.
 
 
’जन्मभूमी यह कर्मभूमी यह’ या सामूहिक गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नंतर स्वागत आणि प्रास्ताविक झाले. 2 मार्च 1943 रोजी रावलापाणी येथे झालेना स्वातंत्र्यसंग्राम या संबंधीच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी प्रा.डॉ. पुष्पाताई गावित यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील उपेक्षित गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याची गरज व्यक्त केली. भिल्ल समाजात 1937 मध्ये सुरू केलेल्या समाजकार्याची आणि स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीची दखल घेत आप श्री गुलाम महाराज यांची प्रतिमा देखिल मंचावर असावी, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
 
 
प्रारंभी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ठाकरे यांनी आयोजनामागची भूमिका मांडली, नंतर आयोजन समितीच्या सदस्यांचे स्वागत झाले. सकाळच्या सत्राचे संचालन आणि मान्यवरांचा परिचय डॉ. विशाल वळवी यांनी करुन दिला. देवगिरी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते अशोक पाडवी यांनीही सूत्रसंचालन केले. निवृत्त आयपीएस अधिकारी मधुकर गावित, डॉ. सुहास नटावदकर, सुहासिनी नटावदकर, ’योजकचे’ डॉ. गजानन डांगे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, विश्व हिंदू परिषदचे जिल्हामंत्री विजय सोनवणे, प्रांत धर्मप्रसारप्रमुख धोंडीराम शिनगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ङ संजय पुराणिक, रतिलाल कोकणी, डॉ. भरत वळवी, वनवासी कल्याण आश्रमचे प्रांत संघटन मंत्री गणेश गावित, आर. आर. नवले, गिरीश कुबेर आदींसह संघ परिवारातील अनेक पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. सुमारे तीन आठवडे पन्नास कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
 
 
क्षणचित्रे :-
 
 
-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर सुंदर पध्दतीने सुशोभित करण्यात आले होते. आकर्षक स्वागत कक्ष लक्ष वेधून घेत होता.
-नाट्यमंदीराच्या प्रवेशव्दाराजवळ जिल्ह्यातील तालुकाश: प्रतिनिधींची नोंदणी केली जात होती, प्रत्येक प्रतिनिधीला एका फोल्डरमध्ये जनजाती संस्कृती रक्षा मंचची भूमिका आणि आवाहन पर पत्रक, जनजाती चेतना परिषदेचे गीत, ’रावलापाणी’ स्वांतत्र्यसंग्राम पुस्तिका आणि तरुण भारतचा नवचेतना हा विशषांक देण्यात येत होता.
 
 
-प्रवेशव्दाराजवळ आदिवासी जनजीवनातील वैशिष्ट्ये तसेच बारीपाडा आणि कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील विविध उपक्रमांची माहिती देणारी चित्र प्रदर्शनी होती. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
 
 
- प्रदर्शनीच्या अग्रभागी प्रभू रामचंद्र आणि शबरी माता यांच्या भेटीचे सप्तरंगी कटआऊट होते. सोबतच वीर एकलव्याची सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती. शोभायात्रेपुर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनीचे उदघाटन झाले.
 
 
-आदिवासी पारंपारिक संस्कृतीचे नृत्यमय दर्शन घडविणारी शोभायात्रा काढण्यात आली. मान्यवरांसह दिनदयाळ चौकापर्यंत आणि मूळस्थानी परत असा शोभायात्रेचा मार्ग होता.
 
 
- परिषदेतील नियोजित सर्व कार्यक्रम शिस्तीने पण आटोपशिर स्वरुपात पार पडले. विद्वत्ता व अभ्यासपूर्ण चिंतनाने सर्वच व्यक्त्यांनी श्रोत्यांना जागीच खिळवून ठेवले. आणि मातीशी, संस्कृतीशी इमान राखणार्‍या काटकसरी कष्टाळू जनजातीचे देशाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्यात किती महत्व आहे हे पटवून दिले.
 
 
रावलापाणीच्या पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना सर्व सभागृहाने काही क्षण उभे राहून, स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी ’भारत माता की जय’ च्या घोषणा देण्यात आला. यावेळी ’रावलापाणी’ स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रत्यक्ष साक्षीदार स्व. माधव फत्तु नाईक यांचे जावाई डॉ. भरत वळवी, संपादन मंडळातील जितेंद्र महाराज पाडवी यांना सन्मानित करण्यात आले.
 
लक्ष्मणसिंह मरकाम यांनी पाचवी अनुसूची या विषयावरील सत्रात देशातील जनगणनांचा आढावा घेत जनजाती याच मूळवासी असल्याचे स्पष्ट केले, अखंड भारताचे आणि या भूमितील खनिदांचे संरक्षणही याच समाज बांधवानी केले आहे, सिकंदराला भारतात प्रवेश करायला चौदा महिने लागले अन्य आक्रमकांनाही थोपवून धरले ते याच बांधवांनी, नंतर अकबराने जनजातींशी समजोता केल्याने त्याच्या राज्याच्या विस्तार होत गेला. पुढे इंग्रजांनी जनजातीच्या शौर्याचा धसका घेत धर्मांतर, खनिजाची लूट करण्यासाठी अनेक पध्दतीने प्रशासन आणि कायद्यांमध्ये बदल केले, 1793 पासून इंग्रज स्थिर होत गेले आणि देश गरीब होवू लागला. असेही त्यांनी विस्ताराने आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नमूद केले.
 
 
पेसा कायद्याबद्दल ही त्यांनी विस्ताराने विवेचन केले, पेसा आणि पाचवी सूची यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी जनजातींमध्ये कलह निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गोत्रावर आधारित समाज व्यवस्था असतांनाही सार्‍या जनजातीमध्ये रावण, महिषासूर यांना विशिष्ट जनजातीचे ते असल्याचा खोडसाळ प्रचार केला जात आहे. भिल्लीस्थान, गोंडवन, झारखंड आदी स्वतंत्र्य राज्यांची मागणी व्हावी, हा त्या मागचा देशविघातक शक्तींचा कुटील हेतू आहे. त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही मरकाम यांनी केले.
सारे जनजाती बांधव शिव आणि शक्तीचे उपासक आहेत. रावणाचे कुठेही मंदीर नाही, त्या नावाचा कोणीही राजा नाही,
 
आदिवासी हे हिंदूच आहेत, असा मुद्दाही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला, आम्ही स्वतंत्र आहोत, जनजातीच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक शैक्षणिक, आरोग्य विषयक , विकासात्मक परियोजना आहेत त्या सरकार अनेक सुविधांसह देत आहे ते जाणून घ्या, धर्म सोडण्याची गरज आहे का ? असा विचारही त्यांनी मांडला. हे जनजाती बांधवांनी आपल्या आस्था, परंपरा, जपून ठेवाव्यात. देशाची अखंडता आणि ऐक्य कायम ठेवण्यासाठी देश वाचविण्यासाठी आपण सक्षम आहोत. देशाचा एक इंचही भूभाग तोडू देणार नाही, असा संकल्प करण्याचे आवेशपूर्ण आवाहनही मरकाम यांनी आपल्या आवेशपूर्ण, परखड, मुद्देसूद व्यक्तव्यात केले. त्यांच्या संस्कृतप्रचूर भाषणाने श्रोत्यांची वारंवार दाद मिळवली.
@@AUTHORINFO_V1@@