बीड : अभिनेता सिद्धार्थ जाधव याने बीड येथील ‘सहारा’ या अनाथआश्रमातील निराधार मुलांना आर्थिक मदत करून सामाजिक भान जपले आहे. ‘सहारा’ या अनाथआश्रमात एकूण ८५ अनाथ मुले राहतात. संतोष गर्जे यांनी १४ वर्षांपूर्वी ‘सहारा’ या अनाथ आश्रमाची स्थापना केली होती. सहारा या अनाथ आश्रमाद्वारे संतोष गर्जे यांनी अनेक वंचित मुलांची मदत केली.
“बीडमधील पाटसरा या दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगाराच्या घरात जन्माला आलेल्या संतोष गर्जे याचा मला अत्यंत अभिमान वाटत आहे. आपल्या वयाच्या १९ व्या वर्षापासून संतोष अनाथ मुलांसाठी काम करतो. सहारामध्ये ८५ निराधार मुले आहेत. या अनाथ मुलांसाठी मी माझा खारीचा वाटा उचलतो. मी जी आर्थिक मदत केली, ती संतोषने केलेल्या कार्यापुढे फार लहान आहे.