प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्यांच्या हक्कांवर गदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

शासनाचा तुघलकी प्रकार, सदस्यांना केले हाताखालचे बाहुले

जळगाव : 
 
शासनाच्या प्रयोग परिनिरीक्षण मंंडळातर्फे मंडळ सदस्यांकडून सगळे हक्क काढून घेण्यात आल्याने याचा त्रास सादरीकरण करणार्‍या संस्थांना तसेच सदस्यांनाही होत असल्याची माहिती मिळाली आहे.
 
गेल्या वर्षी कोणत्याही संहितेला सादरीकरण करण्याची परवानगी देण्याचे हक्क हे महाराष्ट्रात नेमून दिलेल्या मंडळ सदस्यांना देण्यात आले होते.
 
मात्र, ते सगळे हक्क काढून आपल्या अखत्यारीत आणण्याचा तुघलकी प्रकार सध्या प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून होत असल्याने याचा सबंध महाराष्ट्रातील संस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
दरम्यान, जर सादरीकरण करण्याची परवानगी देण्याची शासनाच्या परिनिरीक्षण मंडळालाच हौस असेल तर मग महाराष्ट्रात सदस्य नेमण्याचा काय संबंध? असाही सवाल काही संस्थांकडून करण्यात येत आहे.
 
 
दरम्यान, सगळी प्रक्रिया केल्यानंतर जर काही संस्था कागदपत्रांची पूर्तता करण्यास कमी पडल्या अथवा विसरल्यास तर त्यांना या विभागाकडून कोणताही फोन, अथवा उत्तर मिळत नाही.
 
 
ज्या संस्थांकडे या विभागाचा नंबर असतो, त्यांनी फोन केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे किंवा अडून पाहिले जाते. यावेळी विभागाकडून काहीही मदत करण्यास सपशेल नकार देण्यात येत असल्याची उदाहरणे काही तरुण कलाकारांनी स्पर्धेदरम्यान होत असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. यावर लवकरात लवकर उपाययोजना करून संस्थांना दिलासा देण्याची मागणी काही कलाकारांनी व्यक्त केली आहे.
 
काय होते सदस्यांकडील हक्क?
 
 
कोणतीही संहिता वाचून त्यांना एका प्रयोगाची परवानगी देण्याचा हक्क हा सदस्यांकडे राखीव ठेवण्यात आला होता, जो संस्थांनाही सोईस्कर होता. त्यांना दोन दिवसात या प्रक्रियेमुळे परवानगी मिळत असल्याने सादरीकरणात व्यत्यय येत नसे. परंतु, मुंबई प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने सगळी कागदपत्रे आणि संहिता आपल्याकडे पाठवण्याचा आग्रह करून संस्थांना जेरीस धरले आहे. तसेच संस्थांना दोन दिवसात काय, तर दोन महिने झाल्यानंतरही परवानगी मिळत नसल्याने रसिकांना चांगल्या प्रयोगांपासून तर संस्थांना आपल्या कलाकृतींपासून वंचित राहावे लागत आहे.
 
 
काय आहे आताची प्रक्रिया?
 
 
आय नावाचा फॉर्म घेऊन त्यावर आपले नाव, पत्ता टाकून 5 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा. नाटक असेल तर 250 किंवा एकांकिका असेल तर 100 रुपयांची पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नावाने मनी ऑर्डर करावी. तसेच तीन संहितेच्या प्रती या सुवाच्य अक्षरात अथवा डीटीपी करून प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे पाठवाव्या. त्यानंतर दोन महिन्यांनंतर आपल्या घरी त्यांचे उत्तर मिळते. हा किचकट प्रकार असल्याने आधीसारखे अधिकार सदस्यांकडे देण्यात यावे, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@