स्पर्धा परीक्षांची तयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच करावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 
 
 
धुळे :
 
स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू करावी, असे प्रतिपादन नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी येथे केले.
 
 
धुळे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणार्‍या तरुण- तरुणींना स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध विषयांच्या अभ्यासाची पध्दती, पेपर सोडविण्याची पध्दत, मुलाखतीची पध्दत आदींबाबतची सखोल माहिती व्हावी, म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनपर शिबिर प्रत्येक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.
 
या उपक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवारी शिबीर झाले. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, राजेंद्र पाटील, नवापूरचे अपर तहसीलदार प्रदीप पवार, तहसीलदार सुचेता चव्हाण यांच्यासह तरुण-तरुणी पालकांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वान्मती सी. म्हणाल्या, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय विदेश सेवेसह विविध पदांसाठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा घेतली जाते.
 
या परीक्षेसाठी देशभरातून गेल्या वर्षी सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच लाख विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिली. या सेवेतून नेतृत्वाची संधी उपलब्ध होते. तसेच सामाजिक जबाबदारी निभवावी लागते.
 
स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी इंटरनेट सुविधेमुळे संदर्भ साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, आपल्याला परीक्षेसाठी पूरक संदर्भ साहित्य निवडता आले पाहिजे. त्यासाठी एनसीईआरटीची पुस्तके महत्त्वपूर्ण ठरू शकतील.
 
 
तसेच प्रश्न पत्रिका सोडविण्याचा सराव केला पाहिजे. आपला जिल्हा यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वृत्तपत्रे, मासिकांचे वाचन करावे, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वान्मती सी. यांनी सांगितले.
 
 
अपर तहसीलदार पवार म्हणाले, स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन सर्वांत महत्त्वाचे आहे. एका वेळेस एका परीक्षेचा अभ्यास केल्यास यशाची खात्री वाढते. स्पर्धा परीक्षांचे विश्लेषण करुन चुका दुरुस्त कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आपण स्पर्धा परीक्षा का देत आहोत हे प्रथम समजून घेतले पाहिजे. धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण, तरुणी, शिक्षक, पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,
 
असेही आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
@@AUTHORINFO_V1@@