शेतकऱ्यांसाठी झगडणारी जानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018   
Total Views |



काही सर्वसामान्य माणसे, संस्था, संघटना आपल्या अन्नदात्याच्या मदतीसाठी धावून येतात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हातभार लावतात. जानी विश्वनाथ यादेखील अशांपैकीच एक...


शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडी-अडचणी, समस्या यांची चर्चा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालूच असते. शेतकरी अडला की, तो आत्महत्या करतो आणि या आत्महत्या होऊ नये अशा उदार हेतूने सरकार कर्जमाफीचा वरवरचा उपाय योजून स्वतःला धन्य मानते. पण, शेतकरी प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याचे प्रयत्न मात्र कोणीही आखत नाहीत, राबवत नाहीत, ही खरी तर शोकांतिकाच. पण, अशावेळी समाजातील सर्वसामान्य माणसे, संस्था, संघटना आपल्या अन्नदात्याच्या मदतीसाठी धावून येतात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जेवढा हातभार लावणे शक्य आहे, तेवढा लावतात. जानी विश्वनाथ यादेखील अशांपैकीच एक. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकूणच कामाबद्दल... काही वर्षांपासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न चांगलाच पेटला होता. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची झालेली वाईट अवस्था, त्याच्या पत्नीला जगण्यासाठी शरीरविक्रयाचा पत्करावा लागलेला मार्ग पाहून, ऐकून जानी विश्वनाथ यांना धक्काच बसला. या गोष्टीवर कित्येक दिवस विचार केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीतरी करण्याचा त्यांनी निश्चय केला.

 

दक्षिण भारतातल्या कोईम्बतूर शहरात जन्मलेल्या जानी विश्वनाथ यांचे आयुष्य जगभरात गेले, घडले. कारण, मूळच्या भारतीय असलेल्या जानी विश्वनाथ अफगाणिस्तानमध्ये वाढल्या, लंडन आणि इंडोनेशियात काही वर्ष राहिल्या. एका व्यापारी कुटुंबाशी संबंध असलेल्या जानी विश्वनाथ यांनी १२ वर्षांपूर्वी ‘हीलिंग लाईव्ज’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात आफ्रिकेतील केनियातून केली. केनियाच्या ग्रामीण भागातील गरीब जनता, वनवासी समाज आणि मसाईमारा परिसरातील लोकांसाठी जानी विश्वनाथ यांनी आरोग्य व शिक्षणविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. दारिद्य्रात खितपत पडलेल्या केनियायी जनतेत अनेक हुशार आणि कुशल विद्यार्थी त्यांना दिसले. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात तर इथली मुले प्रवेश घेताना दिसतात, पण काही महिन्यांनंतर गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागते. परिणामी, डॉक्टरकीची स्वप्ने घेऊन आलेल्या युवकावर मजुरीकाम करण्याची वेळ येते. अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च ‘हीलिंग लाईव्ज’ संस्थेने उचलला. स्थानिक सरकार आणि विद्यापीठांनीही याकामी संस्थेची मदत केली. याचवेळी जानी विश्वनाथ यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा समजली आणि त्यांनी त्यांच्यासाठी काम चालू केले. शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. दुष्काळामुळे मात्र शेतीसाठी पाणी उपलब्धच होत नाही तर कधी टंचाई जाणवते, म्हणून जानी विश्वनाथ यांनी बोअरवेल रिचार्ज प्रकल्पाची आखणी व उभारणी केली. हा प्रकल्प भरपूर यशस्वी झाला. यात त्यांच्या संस्थेला ‘सेव्ह इंडियन फार्मर’ या संस्थेची मदत झाली. ‘बोअरवेल रिचार्जप्रकल्पाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले व नंतर हेच पाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी वापरायला मिळू लागले. जानी यांनी असे प्रकल्प पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि नंतर उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्येही चालू केले. दरम्यानच्या काळात त्यांना महिलांच्या बेरोजगारीवरही काम करावेसे वाटले आणि त्यांनी महिलांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

 

एक ग्लोबल सिटिझन असलेल्या जानी विश्वनाथ यांना आपल्या भारतीयत्वाचा नेहमीच अभिमान वाटतो. “मी जगात कुठेही राहत असले तरी माझ्या हृदयात आणि मेंदूत भारतच वसतो,” असे त्या सांगतात. आपल्या समाजसेवेचा विचार आणि लोकांसाठी काम करण्याच्या प्रेरणेमागे आपल्या वडिलांचे विचार व त्यांनी दिलेले संस्कार असल्याचेही जानी विश्वनाथ म्हणतात. दुसऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे हे खरेच, पण त्याचा अर्थ हा नाही की, समोरच्या कोणा गरीबाकडे जाऊन त्याला एकदा पैसे वा अन्न-वस्त्र दिले म्हणजे काम झाले. तर असे न करता त्यांना शिक्षण दिले पाहिजे, त्यांना भविष्यात पुन्हा कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही, असे काम केले पाहिजे. याच विचाराचा वसा घेऊन जानी विश्वनाथ व त्यांची ‘हीलिंग लाईव्ज’ संस्था ही काम करते. शिवाय प्रत्येकवेळी गरजवंताला आर्थिक मदतीचीच आवश्यकता असते असे नाही, त्यांच्याबरोबर राहणे, वेळ घालवणे, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची रुजवण करणेदेखील महत्त्वाचे. जानी विश्वनाथ आणि ‘हीलिंग लाईव्ज’ अशाप्रकारचे कामही करते. केनियातील एड्सपीडित रुग्ण, गरीब, शेतकरी, वनवासी समाजाबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे जानी विश्वनाथ यांना महत्त्वाचे वाटते. केवळ भारतच नव्हे तर नेपाळ, बांगलादेशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, अशीही त्यांची इच्छा आहे. “कृषिक्षेत्रात खूप काही करण्याची गरज आहे. विशेषत्वाने लोकांची विचारदृष्टी बदलली पाहिजे. पाण्याची समस्या असेल तर ड्रिप इरिगेशनसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजे. बेरोजगार महिलांना घरगुती व्यवसाय करता आले पाहिजेत. आपल्याला ज्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे दोन वेळचे अन्न मिळते, त्यांना आपण आपापल्या पात्रतेप्रमाणे शक्य ती मदत केली पाहिजे,” असे मतही त्या व्यक्त करतात. अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या जानी विश्वनाथ यांना त्यांच्या आगामी योजनांबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@